रामसेतू : बॉलिवूडची एक नवीन चूक

31 Oct 2022 16:12:54

ramsetu
 
 
याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या रामसेतू या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाचं कथानक अफगाणिस्थानातील एका बुद्ध लेण्यापासून सुरु होतं आणि न्यायालयात येऊन थांबतं. रामसेतू निसर्गनिर्मित की मानवनिर्मित या प्रश्नाच्या उत्तराभोवती चित्रपटाचे कथानक फिरत राहते.
 
 
चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार आर्यनची भूमिका करत आहे तर जॅकलिन फर्नांडिस सॅन्ड्राची भूमिका करत आहे. आर्यन एक पुरातत्वीय संशोधक दाखवला आहे. तो त्याच्या पत्नी आणि मुलासह राहत असतो. भारतातून नास्तिक घोषित केल्यानंतर रामसेतूची केस त्याच्याकडे सोपवली जाते. कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता रामसेतू निसर्गनिर्मित आहे असे विधान आर्यन त्यावेळी करतो. पुढे एका धनाड्य व्यावसायिकाच्या कृपाछत्राखाली रामसेतू पुरातत्वीय अभ्यास मोहिमेसाठी आर्यनला तरंगत्या नौकेतल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येते.
 
या वेळेपर्यंत अक्षय कुमारच्या चेहेऱ्याला काळे फासले जाते, त्याच्या मुलाचा शाळेतून अपमान होतो, शाळेतील मुख्याध्यापिकाही आर्यनला तोडून बोलतात. या काळात त्याचे आपल्या पत्नीशी नातेसंबंध थोडे बिघडतात असे दिसत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाचा काही भाग मुंबईत तसेच काही भाग श्रीलंकेतसुद्धा झाला आहे. रामसेतूचे काही ड्रोन शॉट्स घेतले आहेत. हे सर्व शॉट्स डोळ्यांना सुखावणारे आहेत. आर्यनचे विमान रामसेतूवरून उडू लागले की चित्तवृत्ती प्रसन्न होतात. यानंतरही पुढचा बहुतेक भाग ऍनिमेटेड आहे.
 
 
मी हिंदू आहे पण धर्म बंधनं मला मान्य नाहीत, असा काहीसा अविर्भाव आर्यनच्या म्हणजेच अक्षय कुमारच्या बोलण्यातून सतत जाणवत असतो. भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात एक अतूट नातं आहे हे तो अफगाणिस्तानच्या पुरातत्वीय उत्खनन चालू असलेल्या एका भागात काम करत असताना म्हणतो. तसेच भारत पाकिस्तान यांच्यात काहीही वैर नाही पण तालिबान विरुद्ध आपण एकत्र येऊन लढायला हवं अशा आशयाची सुरुवात असल्याने भारतातून त्याला जाहीरपणे नास्तिक असे घोषित केल्याचे दाखवले आहे. त्यानंतर आर्यन भारतात परततो. इथून सुरु होतो रामसेतू रामानेच बनवला आहे हे सिद्ध करण्याचा विनाकारण अट्टाहास. मुळात संशोधन न करता, कोणतेही पुरावे नसताना फक्त आपल्या नावाच्या आधारावर प्रकाशित केलेला रामसेतूचा पहिला अहवाल अक्षय कुमारची म्हणजेच आर्यनची पुरातत्वीय संशोधक म्हणून असलेली विश्वासार्हता गमावून बसतो. पुढे जे घडत जातं तो शुद्ध नाटकीपणा आहे हे प्रेक्षकांना दाखवून देण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.
 
 
कलाकारांची वेशभूषा बॉलिवूड संस्कृतीला साजेशी आहे. तांत्रिक बाजू उत्तम सांभाळल्या असल्या तरी काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. तरंगत्या प्रयोगशाळेत पोहचल्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अत्यंत अकल्पित आणि खोट्या वाटतील अशा गोष्टी दाखवून सिनेमा हास्यास्पद केलेला आहे. सिनेमा हास्यस्पद आहे की रामसेतू ही संकल्पनाच हास्यास्पद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. आर्यनने सुरुवातीला घेतलेले काही निर्णय पाहून आणि कथानकाचा एकंदर प्रवास पाहून असे लक्षात येते की आर्यन हे पात्र अत्यंत्य अविचारी आहे.
चित्रपटाला दहा पैकी ५.२ इतके आयएमडीवर रेटींग मिळाल्याचे समजते. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवशीच रामसेतूचे सर्व शोला हाऊसफुल प्रतिसाद मिळाला परंतु दुसऱ्याच दिवशी मात्र सगळीच चित्रपटगृहे ओस पडलेली आढळली. पहिल्या दिवशी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कमाई १५.२५ कोटी इतकी होती. लागोपाठ अनेक फ्लॉप चित्रपट आल्यानंतर या चित्रपटाची मात्र बरीच चर्चा समाज माध्यमांवरून झाल्याचे आढळते. चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी त्याच दिवशी रिलीज झालेल्या थँक गॉड चित्रपटापेक्षा रामसेतूला प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे लक्षात येते.
  
रविवारी या चित्रपटाने 7.75 कोटी रुपयांची कमाई केली. सहा दिवसांनंतर आठवड्याच्या शेवटी, 'राम सेतू' ने 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात, ‘राम सेतू’ ने गुजरात/सौराष्ट्र सर्किट्समध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे, ज्याने चित्रपटाच्या एकूण 11 कोटी रुपयांचे नेटचे योगदान दिले आहे, तर राजस्थानने 4.20 कोटी रुपये आणि CI ने 2.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच्या स्पर्धक ‘थँक गॉड’ने पहिल्या विस्तारित वीकेंडच्या शेवटी केवळ २६ कोटी रुपये कमावले आहेत
 
 
अक्षय कुमार आणि टीम यांनी वेळ घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण केले असते तर चित्रपट उत्तम झाला असता असे वाटते. मध्यंतरानंतर दुसऱ्या भागातील चित्रीकरणात घाई घाईत चित्रपटाचे शूटिंग आटोपले आहे असे वाटते. चित्रपटासाठी हनुमानाची उडी, व तत्सम अशक्य घटना दाखवल्या नसत्या व तथ्यांच्या आधारे चित्रपट तयार केला असता तर चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडला असता असे वाटते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0