मोरोपंत पिंगळे संघाचे प्रेरणास्थान

31 Oct 2022 15:57:06
 
moropant pingle
 
 
 पुणे : ”मोरोपंत पिंगळे यांनी खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या घरोघरी, कानाकोपर्‍यात पोहोचवले, मोरोपंत हे संघाचे प्रेरणास्थान आहेत”, असे प्रतिपादन ’साप्ताहिक विवेक’चे निवृत्त संपादक आणि मोरोपंत यांचे निकटवर्तीय रमेश पतंगे यांनी केले.
 
 
‘गोविज्ञान संशोधन संस्थे’तर्फे श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील भावे स्कूलमधील प्र. ल. गावडे सभागृह येथे पिंगळे यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. ”मोरोपंतांचा शब्द हा प्रत्येक संघ कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाचा होता. त्यांनी सांगितलेले काम कार्यकर्त्यांना शिरोधार्य होते. प्रत्येकाने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहावे, हेच त्यांचे खर्‍या अर्थाने स्मरण होईल”, असे रमेश पतंगे यावेळी बोलताना म्हणाले.
 
 
या व्याख्यानात त्यांनी मोरोपंत यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाला गोविज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, पश्चिम महाराष्ट्र गोसेवा प्रमुख रवींद्र रबडे, ’टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म’चे व्यवस्थापक कपिल वरदळ आदी उपस्थित होते. यावेळी ‘टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म’चे वरदळ यांनी देशी गाईंचे महत्व स्पष्ट केले. ‘टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म’चे मालक अजिंक्य हंगे यांची यशोगाथा त्यांनी सांगितली.
 
 
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”गीर गाई शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असून, प्रत्येक शेतकर्‍याकडे गीर गाय असावी, यादृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत. या माध्यमातून आतापर्यंत आठ हजार शेतकरी आम्ही जोडले आहेत. नैसर्गिक शेतींचे उत्पादन 52 देशांमध्ये पोहचवित आहोत.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू कुलकर्णी यांनी करुन आभार व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0