आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अनधिकृत दारुविक्री ? भाजपचा आरोप

31 Oct 2022 21:09:27
 
Loar Parel Party
 
 
आदित्य ठाकरे
 
मुंबई : माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात अनधिकृत प्रकार समोर आला आहे. वरळीच्या लोअर परेल भागातील एक मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अनधिकृतपणे दारुसाची सरेआम विक्री होत झाल्याचा दावा स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी केला आहे. तसेच याबाबतचा एक व्हिडीओ देखील भाजपचे पदाधिकारी दीपक सावंत यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला आहे. यापूर्वीही मुंबईत अनधिकृत दारू विक्री, कोरोनाकाळात आयोजित करण्यात आलेला बांद्रा ख्रिसमस फेस्टिवल आणि वरळीतील पबमधील पार्टी या पूर्वइतिहासावरून वरळीत पुन्हा एकदा अनधिकृत प्रकार सुरु झालेत का ? हा सवाल उपस्थित झाला आहे.
 
 
नेमका प्रकार काय ?
 
भाजपने केलेल्या आरोपांनुसार, 'वरळी मतदारसंघातील लोअरपरेल भागातील एका पबमध्ये शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर ते रविवार, दि. ३० ऑक्टोबरच्या दरम्यान 'हॅलोविन फेस्टिवल'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन मुलामुलींचा देखील सहभाग होता. तसेच या अल्पवयीनांना खुलेआम दारूची विक्री देखील करण्यात आली होती. मुळात दारूची अनधिकृत विक्री हा बेकायदेशीर प्रकार असून त्यातही अल्पवयीनांना त्याचे वाटप करणे देखील गैर आहे,' असे आक्षेप दक्षिण मुंबई भाजपतर्फे घेण्यात आले आहेत.
 
 
आयोजकांवर कारवाईची मागणी
 
'अशाप्रकारे तीन दिवस फेस्टिवल आयोजित करण्यात आलेल्या आणि भविष्यात आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात यावी. जेणेकरून या गैरप्रकारांना आला घालणे शक्य होईल. हॅलोविन फेस्टिव्हल आणि त्याच्या आयोजकांकडून महाराष्ट्र दारूबंदीच्या तरतुदींचे, कायद्याचे आणि भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. त्यामुळे 'हॅलोविन फेस्टिव्हल'च्या आयोजकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ६५ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २९३ अंतर्गत 'एफआयआर' नोंदवण्यात यावी' अशी मागणी दीपक सावंत यांनी स्थानिक पोलिसांकडे केली आहे.
 
 
पालिका प्रशासनाच्या उत्तराची अपेक्षा !
 
दरम्यान, लोअर परेलमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर 'त्या' पबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला देण्यात आलेल्या परवानगीची माहिती प्राप्त करण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करत एक अर्ज करण्यात आला आहे. त्यात पार्टीला देण्यात आलेली परवानगी, दारूविक्रीच्या संदर्भातील बाबी आणि इतर गोष्टींवर पालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका आता यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0