पंचतुंड नररुंडमाल घर, पार्वतीश आधी नमितो।
विघ्नवर्ग नग भग्न कराया,
विघ्नेश्वर गणपती मग तो॥
संगीत, नृत्य, नाट्य यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली संस्कृती म्हणजे रंगभूमी! याच रंगभूमीचं तेजस्वी रुप म्हणजे आपली मराठी संगीत नाट्य परंपरा! रंगमंदिरातील निःशब्द शांतता, भारावून टाकणारं वातावरण, मंद होत जाणारे दिवे, मखमली पडदा, धुपाचा गंध आणि ऑर्गनच्या साथीनं येणारे नांदीचे सूर. सगळच भव्यदिव्य! दि. 31 ऑक्टोबर, 1880 या दिवशी बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाद्वारे ही देदीप्यमान परंपरा सुरू केली. त्याविषयी...
तसं पाहिलं तर दि. 5 नोव्हेंबर, 1843 या दिवशी ’सीता स्वयंवर’ या संगीत नाटकाद्वारे विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीची जणू प्राणप्रतिष्ठाच केली. परंतु, भावे प्रणित संगीत नाटकं आख्यानाच्या स्वरुपात सादर होत असत. संगीताची पूर्ण बाजू एकटा सूत्रधारच सांभाळत असे. हा सूत्रधार वेगवेगळ्या प्रसंगातली गाणी स्वतःच सादर करत असे. रंगमंचावरची पात्रं त्या गाण्याला अनुसरून फक्त हावभाव करत असत. अण्णासाहेबांनी या सूत्रधारी पद्धतीत आमूलाग्र बदल करत आखीवरेखीव गद्यपद्यात्मक संगीत नाटकांची रचना केली आणि ‘संगीत शाकुंतल’च्या रुपात पहिलं परिपूर्ण संगीत नाटक रचलं.
पार्शी गद्यपद्यात्मक ’इंद्रसभा’ हे नाटक पाहून अण्णासाहेबांना ही कल्पना स्फुरली, असं म्हटलं जातं. पण, त्याच्या ही आधी साधारण 1875च्या सुमारास अण्णासाहेब पणजी इथे सरकारी नोकरीत असताना डोंगरी भागातल्या कृष्णभट बांदकर यांनी रामनवमी उत्सवात सादर केलेल्या संगीत नाटकाने ते जास्त प्रभावित झाले. नाटक म्हणजे साहित्याचा मानबिंदू हे ध्यानात घेऊन त्यांनी साहित्य आणि नाट्य या दोन्हीचा डोळसपणे अभ्यास केला. बरीच आख्यानं, कथानकं, पदरचनेसहीत विविध नाटक मंडळींना लिहून देताना त्यांनी या क्षेत्राचा सर्वांगीण अभ्यास केला, व्यवसायाचं गणित पक्क करून मगच रंगभूमीचा शास्त्रशुद्ध पाया रचला. या सर्व पार्श्वभूमीवर अण्णासाहेबांनी महाकवी कालिदास यांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्’चं मराठीत भाषांतर करून ‘सं. शाकुंतल’ हे पहिलं संगीत नाटक महाराष्ट्राच्या रंगभूमीवर आणलं!
दि. 31 ऑक्टोबर, 1880 या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या नाटकाच्या पहिल्या चार अंकांचं सादरीकरण पुण्याच्या भांग्या मारुतीसमोरील आनंदोद्भव थिएटरमध्ये झालं. या पहिल्या प्रयोगात मोरोबा वाघोलीकर दुष्यंत, बाळकोबा नाटेकर कण्वऋषी, तर शंकरराव मुजुमदार शकुंतलेच्या भूमिकेत होते. ‘शाकुंतल’ नाटकाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सूत्रधार नटीचा प्रवेश झाला की, सूत्रधार रंगपटात जाई आणि पुन: रंगमंचावर येत नसे. अशा प्रकारे अण्णासाहेबांनी सूत्रधाराकडून संगीताचा मक्ता काढून घेतला आणि सर्व पात्रं आपापली पदं गाऊ लागली. ‘शाकुंतल’मध्ये तब्बल 200 पदं होती, पण त्यातली शकुंतला मात्र सुरुवातीला (जवळपास दोन वर्षांत नव्हती. कारण, शकुंतलेची भूमिका करणारे शंकरराव मुजुमदार गायक नव्हते. पण, मोहक रुप आणि उत्कृष्ट अभिनय या गुणांमुळे त्यांनी सादर केलेली शकुंतला त्या काळी प्रेक्षकांना आवडली.
मोरोबांच्या सुरेल गायनाला शंकरराव अभिनयातून जो उत्तम प्रतिसाद देत, त्यामुळे शकुंतला गात नाही, याबद्दल रसिकांची तक्रार नसे. पुढे हे चारअंकी नाटक सातअंकी करून ’साग्रसंगीत शाकुंतल’ या स्वरुपात रंगमंचावर आलं. ते इतकं मोठं झालं की, कधी कधी दोन भागांमध्ये दोन रात्रीतून सादर होत आणि प्रेक्षकही तेवढ्याच उत्साहाने दोन्ही रात्री प्रयोगाला गर्दी करत. पुढे दोन वर्षांनी भाऊराव कोल्हटकर या अलौकीक गायक नटाचं किर्लोस्कर नाटक मंडळीत आगमन झालं आणि शकुंतला गाती झाली! पूर्ण रचलेल्या नाटकात नव्याने पदं घालणं हे खरं तर खूप अवघड काम, पण अण्णासाहेबांनी आपले पट्टशिष्य गोविंद बल्लाळ देवल यांच्यावर ‘शकुंतले’साठीची पदं लिहिण्याची जबाबदारी सोपवली आणि देवलांनी सुद्धा अर्थपूर्ण, नाजूक भाव दर्शवणारी पदं, ती अण्णासाहेबांचीच वाटावीत इतक्या कुशलतेने लिहिली. देवलांच्या रुपात अण्णासाहेबांनी जणुकाही आपला वारसदारच नेमला. कथाभाग पुढे सरकण्यापुरतीच पदरचना आणि गायन व्हावं, याबाबत अण्णासाहेबांनी दक्षता घेतली. त्यांनी साक्या-दिंड्या वापरल्या. पण, नाटकाला कीर्तनाचं स्वरुप येऊन दिलं नाही. लावणी ढंग घेतला, पण तमाशाचं रुप आणलं नाही. रागदारी संगीतामुळे त्याचा जलसा केला नाही किंवा पारशी नाटकातील संगीताचा भडकपणा आणला नाही. उच्च अभिरुचीचं दर्शन त्यांनी ‘शाकुंतल’द्वारे घडवलं. याला ‘किर्लोस्करी संगीत’ अशीच ओळख मिळाली. एक प्रसंग अभिमानाने सांगावा असाच आहे.
शाकुंतलच्या रंगीत तालमीला उपस्थित असलेले ब्रिटिश अधिकारी जनरल हेवेट ते नाटक पाहून अत्यंत सुखावले आणि त्यांनी अण्णासाहेबांकडे पत्राद्वारे आपला आनंद व्यक्त केला. एवढंच नव्हे, तर पुनः एखादी रंगीत तालीम असेल, तर मला यायला नक्की आवडेल, असंही ते म्हणाले. थोडक्यात, युरोपियन रसिकांनाही या नाटकाने भारावून टाकलं. अण्णासाहेबांनी शाकुंतलला संगीत नाटकांच्या महिरपीत बसवून रंगमंचीय अंबारीतून मिरवलं, त्याला दि. 31 ऑक्टोबरला 142 वर्ष पूर्ण होतील. पुढे अण्णासाहेबांनी ‘सं. सौभद्र’ या नाटकाद्वारे आणखी एक अजरामर कलाकृती सादर केली. हे नाटक म्हणजे त्यांचा स्वतंत्र कलाविष्कार होता आणि त्याचं सौंदर्य कालातीत आहे. त्याचप्रमाणे अतिशय वेगळ्या शैलीतलं ‘सं. रामराज्यवियोग’ (अपूर्ण) या नाटकाचे तीन अंक लिहून सादर केले. या तिन्ही नाटकांनी संगीत रंगभूमीवर विलक्षण क्रांती घडवली.
अण्णासाहेबांनी संगीत रंगभूमी नामक केवळ एक ’सृष्टी’ उभी केली नाही, तर कलाकार आणि रसिकांना नवी दृष्टीसुद्धा दिली. कथानक पौराणिक असो अथवा काल्पनिक, ते सामान्य माणसाच्या आयुष्याशी ताळमेळ साधत रंगमंचावर आल्यास योग्य परिणाम साधतं हेच त्यांनी दाखवून दिलं. ते म्हणत, “आमचं मराठी नाटक म्हणजे केशराचं शेत आणि आमची मराठी रंगभूमी म्हणजे केशराचा मळा.” या केशराचा गंध ‘शाकुंतल’पासूनसुरू झाला आणि त्याचा दरवळ आजही मराठी रसिकांना मोहवतो आहे. या अलौकिक प्रतिभेच्या कलावंताचा अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांचा दि. 2 नोव्हेंबरला स्मृतिदिन! त्यांनी फुलवलेला हा केशराचा मळा आधुनिक काळातही बहरत ठेवणं हीच असेल त्यांना आणि रंगभूमीला खरी मानवंदना!
(लेखिका या आकाशवाणी पुणे येथे निवेदिका असून ‘संगीत मदनाची मंजिरी’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारली आहे. तसेच संगीत रंगभूमीचा मागोवा घेणार्या ’स्वरनाट्य रसगंगा’ या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.)
- अर्चना साने