पांडव पंचमी का साजरी केली जाते?

28 Oct 2022 19:10:27

pandav panchami
 
 
दिवाळी झाल्यावर, म्हणजेच कार्तिक महिन्यातील पाचव्या दिवशी आपण पांडव पंचमी साजरी करतो. आता पांडव पंचमी का साजरी केली जाते? तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस आपण पांडव पंचमी म्हणून साजरा करतो. लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे पाच पांडव मांडतात. प्रत्येक पांडवाची पूजा करून त्यांच्यासारखं गुणी बाळ व्हावं म्हणून आराधना करतात. पांडव पंचमीचे विधी आणि महत्व आपण जाणून घेऊया.
 
व्यासकृत महाभारतानुसार, हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव व पांडवांमध्ये युद्ध झाले, हे सर्वज्ञात आहेच. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली. राहायला छप्पर नाही, वडिलांचे छत्र नाही, पुरेसे मनुष्यबळ नाही. युद्धासाठी लागणारी दौलत नाही अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून हस्तिनावतीत आपले स्थान निर्माण केले.
आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थाचे राज्य उभे केले. तसेच वनवासात व अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावतीसारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतले. भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला. आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले. अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडवपंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी, आज्ञाधारक व बलवान मुलांनी आपली कूस उजळावी अशी प्रार्थना करते.
पांडवांची पूजा कशी मांडतात? पहाटे सूर्योदयानंतर दारात रांगोळी समोर पाट किंवा चौरंग मांडून त्यावर पाच पाने मांडली जातात. त्यावर सकाळच्या ताज्या शेणाचे पाच गोळे मांडले जातात. त्यांच्यावर निवडुंगाच्या झाडाचे दिवे रोवून एक दिवा विहिरीजवळ किंवा जवळच्या जलस्थानाजवळ ठेवला जातो. तुमच्या घरी पांडव पंचमीच्या दिवशी काय विधी केले जातात आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये जरूर कळवा.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0