स्त्री-पुरुषांचं भावविश्व् उलगडणाऱ्या चारचौघी

28 Oct 2022 14:03:01


charchaughi

 
 

स्त्री व पुरुष मनाचे सामाजिक आणि मानसशास्त्रीय कंगोरे उलगडणाऱ्या चारचौघी

महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा फार पूर्वीपासून लाभली आहे. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःखं जशी वेगळी तशीच तिची सुखं सुद्धा अनाकलनीय. या अशाच इतरांसारख्या चारचौघी. प्रत्येकीची स्वप्न वेगळी, प्रत्येकीची कथा वेगळी आणि जगही वेगळं. पण एकमेकींसोबतचं नातं मात्र एकदम घट्ट.
 
१९८४ च्या काळात गाजलेलं महिला दिनाचं नाटक म्हणून त्याला मिळालेली लोकप्रियता आता स्त्री भावविश्वाची तरल मांडणी म्हणून प्रसिद्ध होते आहे. स्त्री समजून घेण्यासाठी प्रथम पुरुष समजून घ्यावा लागतो, हे दाखवण्यासाठी पडद्यामागचे दोन तर त्या स्त्रियांच्या आयुष्यात सध्या असणारे तीन पुरुष रंगमंचावर पुरुषाचे स्त्रीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन उलगडून दाखवतात.
 
१९८५ साली थिएटर अकॅडमीच्या फोर्ड फाऊंडेशन पुरस्कृत नाटककार योजनेत महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या सहा नाटकांपैकी हे नाटक होतं. प्रशांत दळवी लिखित चिंतामणी संस्थेचं लता नार्वेकरांनी निर्माण केलेलं हे नाटक त्या काळातही प्रेक्षकांच्या तेवढंच पसंतीस उतरलं, जेवढी आज चारचौघीची वाहवा होते आहे. लेखकांच्या मनात चालणाऱ्या विचारांचा आवेग कलाकारांनी समर्थपणे रंगमंचावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.
 
स्त्रीमनाचा आणि एकूणच समाज मानसिकतेचा वेध घेताना काळाशी त्याचा फारसा संबंध नसतो हे त्यातून अधोरेखित होते. या सामाजिक आणि मानसशास्त्रीय विचारांचा गाभा असलेल्या नाटकात इतर गोष्टींचीही तेवढीच काळजी घेतलेली आहे. पडदा उघडल्यापासून समोर असलेल्या विनी सोबतच संपूर्ण घरावर नजर फिरते. रंगमंचावर चारखणी घर व्यवस्थित मांडलेलं आहे. अगदी स्वयंपाकघराच्या सर्व्हिस विंडोमधून डायनिंग रूमच्या खोलीत चहाचे कप देण्याइतका सहजपणा कलाकारांच्या वागण्याबोलण्यातही जाणवतो.
 
अगदी शेवटच्या अंकात सातही पात्रं बैठकीच्या खोलीत एकत्र असतानाही जागेची कमतरता मुळीच जाणवत नाही. एका जागी बसून नाही, तर रंगमंचावर फिरत असतानासुद्धा कुणालाही कुणाचाही अडथळा होत नाही. वंदना गुप्ते, दीपा श्रीराम, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोंकरने जेवढं नाटक जीवंत केलं होतं तेवढीच मेहनत मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे यांनी घेतलेली दिसते. तसंच निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर यांनीही आपापल्या व्यक्तिरेखांतून सहज व्यक्त होऊन बहार आणली आहे.
 
संगीताची उत्तम जोड त्याचबरोबर अप्रतिम प्रकाशयोजना कलाकारांचे भाव टिपण्यासाठी योग्य होती. मुक्ताच्या प्रदीर्घ टेलिफोनिक संवादात मंद व प्रखर होणारे दिवे तिच्या मनात होणारी चलबिचल आणि भावनांची आवर्तनं चपखल मांडत होते. टेलिफोन एक्स्टेन्शनचा उत्तम वापर त्या संवादात दिसला. बैठकीच्या खोलीतून बोलताना विद्याचा चढलेला आवाज आशिषवरचा आणि आईवरचासुद्धा. बेडरूममध्ये गेल्यावर त्या बोलण्यात येणारे कोमल भाव, ते प्रणयाचे आर्त क्षण व त्यांच्या आठवणी, पुन्हा बैठकीत गेल्यावर बोलून दाखवलेला तो कठोर निर्णय आणि मिनूची(मुलीची) आठवण होताच ठाम निर्णय सांगणारी ती आई झोपाळ्यावर जाऊन बसते. दोलायमान मनाची गोष्ट त्या झोपाळ्यातून अधोरेखित होते. सर्वच कलाकारांची संवादफेक अतिशय उत्कृष्ट आहे. आईच्या समजावणीत, ठामपणा, निर्णय आणि प्रेम दिसतं, विद्याचा राग तिच्या मोठ्या आवाजातून सतत जाणवत असतो.
 
मुळात हळूवार असलेले वैजूचं पात्रही असहाय्य आई व्हायची जबरदस्ती झाल्यावर घेतलेला निर्णय बोलून दाखवताना कठोर होते. पर्णच्या सळसळणाऱ्या तारुण्यातले सतत बदलते भाव तिच्या क्षणात कोमल तर क्षणात आग्रही होणाऱ्या आईशी होत असलेल्या संवादातून स्पष्टपणे जाणवतात. प्रत्येक पात्राला साजेशी वेशभूषा तर कलाकारांनी केली आहेच परंतु त्याबरोबर विद्या अवतारात राहू नको, नीट कपडे घाल या आईच्या सूचनांतून नवऱ्याने नाकारलेल्या पण स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या असलेल्या स्त्रीची मानसिकता दाखवून देते.
 
नाटक पाहताना कथेत व संवादात आपण इतके वाहून जातो की, पाठांतरात झालेल्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष होतं. शब्दांना मुळात विचारांची आणि मानवाच्या सोशिक मानसिकतेची धार असल्याने संवाद मनाला भिडतात. श्रीकांतचं पात्र टाळ्या घेऊन जातं, हशाही पिकतो. कारण, आज ते पात्र समाजात आपल्याला जागोजागी पाहायला मिळतं. पण ते विनोदी पात्र नाही. या समाजातील पुरुषांची अगतिकता श्रीकांत वैजूच्या नात्यातून समाजातील भीषण वास्तवाची जाणीव करून देते. एकंदरीत नाटक उत्तम असल्याचे प्रेक्षकांच्या "हाऊसफुल" प्रतिसादावरूनच दिसून येतं.
 
 
Powered By Sangraha 9.0