रायगडावर ‘श्री शिवचैतन्य सोहळा’ जल्लोषात

25 Oct 2022 15:23:31

raigad
 
 
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्यावतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री किल्ले रायगडावर ‘श्री शिवचैतन्य सोहळा’ मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
 
 
 
सर्व प्रथम पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी जाऊन तेथे पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पाचाड येथील राजवाडा, गडावरील चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, महादरवाजा या ठिकाणी विधिवत पूजन करून दिवे लावून रांगोळी काढण्यात आली. श्री शिरकाई देवी, भवानी कडा या देवींच्या पूजा करून ओटी भरण्यात आली. व्याडेश्वर आणि श्री जगदीश्वर मंदिरात पूजा आरती करण्यात आली. यावेळी संपूर्ण जगदीश्वर प्रासाद दिव्यांच्या उजेडात उजळून निघाला होता.
 
 
दिपावलीचे औचित्य साधून समितीतर्फे गडावरील रहिवासी आणि पोलिसांना फराळ वाटप तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या शिवभक्तांनी मशालीच्या उजेडात श्री शिर्काई मंदिर ते राजसदर अशी छत्रपति शिवरायांची वाजत गाजत पालखी काढली. नंतर राजदरबारात छत्रपती शिवरायांना मशालींनी मानवंदना देऊन विधिवत पूजा आरती केली.
 
 
“ज्या राजामुळे आज आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करू शकतो त्या राजाचे घर मात्र दिवाळीत अंधारात असते म्हणून समितीच्यावतीने 2012 सालापासून हा सोहळा, किल्ले रायगडावर साजरा करण्यात येतो. गडावरील अनावश्यक नियमामुळे हा सोहळा साजरा करताना समितीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून, महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हा सोहळा साजरा करण्यासाठी समितीला सहकार्य करावे,” असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी केले. त्यांनी उपस्थित सर्व शिवभक्तांचे आभार मानत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी आम्ही मावळे (बोरिवली), आपला कट्टा (ऐरोली) आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठान (विक्रोळी) या संस्थांचे सहकार्य लाभले.
Powered By Sangraha 9.0