धारावीकरांना फक्त एक रुपयांत पणती बनवणं कसं शक्य होतं?

25 Oct 2022 12:50:43

kumbharwada
धारावीतला कुंभारवाडा आहे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक...
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात साधारण दोन चौरस किलोमीटरच्या अंतरात धारावी वसलेली आहे. या एवढ्या परिसरात जवळपास एक कोटी इतकी लोकसंख्या आहे. या गर्दीतही इथले हिंदू लोक मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतात. धारावीतील कुंभारवाड्यात या दिवाळीची तयारी तर ४ महिने पूर्वीपासूनच केली जाते. घरातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण दिवे बनवण्याच्या कार्यात हिरीरीने भाग घेतात. प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतली असतात. संपूर्ण मुंबईला उजळून टाकण्यासाठी कुंभारवाडा कामाला लागलेला असतो.
रस्त्यांवर मांडलेली दुकानं आणि त्यातून वाट काढत गळ्यातून आत शिरलो की वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं.
सर्वत्र मातीचं बांधकाम, एकमेकांवर रचून ठेवलेली सारख्या आकाराची मातीची मडकी, वेगवेगळ्या आकारातली मातीची भांडी, एका कोपऱ्यात उपयोगशून्य झालेल्या मातीच्या वस्तू आणि खापऱ्यांचा ढीग. समोरच्या चिंचोळ्या गल्लीत अगदी चार फुटांत दाटीवाटीने बांधलेल्या विटांच्या भट्ट्या. घरात, अंगणात, अगदी दारातल्या उंबरठ्यावर सुद्धा जागा मिळेल तिथे बसून पणत्यांना रंग देणाऱ्या स्त्रिया दिसून येत होत्या. प्रत्येक दारासमोर एका खोलगट भांड्यात भिजवलेली माती दिसून येत होती. ही माती गुजरातवरून मागवली जाते. मोठ्या पसरट पाट्यावर ती मळून भिजवून ठेवली जाते. त्यानंतर काही घरात पारंपरिक पद्धतीने हाताने मळून मातीचा गोळा बनवला जातो तर घरी घरांतून विजेवर चालणारी माती मळून देणारी यंत्र दिसून येतात. या यंत्रांच्या वापरामुळे वेळेची बचत होते.
प्रत्येक माणूस साधारणपणे १०० ते २०० भांडी दिवसाला बनवतो. संपूर्ण घराची मिळून जवळपास १ हजार भांडी एका दिवसात तयार होतात. तयार झाल्यावर उन्हात सुकवून भट्टीतून पक्की करवून घेतली जातात. त्यानंतर रंगकाम करून विक्रीसाठी दुकानात ठेवली जातात. या धारावीच्या गल्ल्यांमधून केवढी तरी कलात्मक वृत्तीची माणसे दिसून येतात. याच निमुळत्या गल्ल्यांतून दर दिवसाला हजारो कलाकृती जन्म घेतात. लहान सहान, नेहेमीच्या वापरातल्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येथे होते. खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत इथे पाहायला मिळतो.
 
 
Powered By Sangraha 9.0