तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी काहीतरी तयार करण्यासाठी या पृथ्वीतलावर आलेले आहात. तुम्ही तुमच्या सभोवतालचा आनंद वाढवण्यासाठी आहात. आपण विश्वाच्या सौंदर्याची निर्मिती आणि आनंद घेण्यासाठी आहात. हीच मानव असण्याची जादू आहे..
आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींच्या परिणामाने दाबले जातो, त्रस्त होतो. अशा समयी जगातील आपल्याला त्रस्त करणार्या समस्यांच्या विशालतेचा समतोल कसा साधू शकतो? आपण एक संतुष्ट प्रभावी जीवन कसे तयार करू शकतो?
‘होप इन द डार्क’ या पुस्तकाच्या लेखिका रेबेका सोलनिट लिहितात, “आशा म्हणजे अज्ञात आणि अजाण गोष्टींचे एकमेकांना आलिंगन, आशावादी आणि निराशावादी या दोघांच्याही निश्चिततेचा एक पर्याय म्हणायला हवा.” आशावादी विचार करतात की, आम्ही काही विशेष भाग घेतला नाही, तरीही या जगात सर्व काही ठीक होईल. निराशावादी अगदी या उलट कोलांटउडी घेतात की, आपण काहीही केले तरी काहीच ठीक होणार नाही.
दोघेही शेवटी आपले करायला पाहिजे ते कर्म करण्यास नकार देतात. आपण जे काय करतो, हे महत्त्वाचेच आहे, तरीही ते कसे आणि केव्हा महत्त्वाचे ठरणार आहे. कोणावर आणि कशावर त्याचा काय परिणाम होऊ शकणार आहे, या गोष्टी आपल्याला कधी आधीपासून माहीत नसतात. तुम्हाला प्रत्यक्ष नुकसान झाले असले, तरीही बाह्य परिस्थितीची पर्वा न करता, तुम्हाला एक सुंदर जीवन निर्माण करण्यासाठी मदत करणार्या छोट्या-मोठ्या बदलांना स्वीकारत पुढे जाता यायला पाहिजे. माणसाचे जीवन हा एक जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे, असे म्हणायला हरकत नाही.
तुम्ही या जगात स्वतःसाठी आणि इतरांसाठी काहीतरी मौलिक करण्यासाठी या जगात आलेले आहात. तुम्ही तुमच्या सभोवतालचा आनंद वर्धित करण्यासाठी आलेले आहात. आपण सगळेच या अवाढव्य विश्वाच्या सौंदर्याची निर्मिती आहोत आणि त्यातून जगण्याचे सौख्य घेण्यासाठी आलेले आहोत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला जे घडत आहे, आपण जे पाहात आहोत व अनुभवत आहोत, त्यासाठी खरोखर आपण जबाबदार आहोत. हीच मानव असण्याची किमया आहे आणि आपल्या जगण्याची सर्व ऊर्जा आणि चैतन्य शेवटी आपल्याच हातात आहे. अवतीभोवतीच्या परिस्थितीचा आपल्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा काहीच संबंध नाही, असे मानणारे सगळेच स्वतःची फसवणूक करत या भ्रामक जगात जगात असतात.
मला असे वाटते की, आपल्यापैकी बर्याच जणांसाठी, आपल्या जीवनात आपण अपेक्षित केलेला निरागस आनंद आणि प्रौढ झाल्यावर अनेक जबाबदार्यांची खांद्यावर आलेली विवेकी स्वीकृती यांच्यामध्ये कधीतरी आपण एका अनावधानाने अवचेतन मानसिकतेत गुरफटतो, ज्यामुळे नकळत का होईना, आपल्या मनात अनेक नकारात्मक आत्मचर्चेला उत्तेजन मिळत जाते. तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे की, हे सर्व एक दिवस नाहीसे होईल. हे सर्व कुठे गेले? वर्षे कशी गेली? मी सर्व गोष्टीत समाधानी आहे का? मला पाहिजे तसे जगलो का? आणि असे बरेच प्रश्न. म्हणून फक्त तुमचे अंतर्मन जे सांगेल ते सर्व करा.
तुम्हाला जी स्वप्ने जगायची आहेत, त्या सर्वांसाठी प्रयत्न करा, फक्त तुम्हाला हवे ते जीवन जगा आणि फक्त भविष्यासाठी आनंद घेण्याचा नादात आजच्या आनंदाला मुकू नका. काहीवेळा तुम्हाला फक्त प्रत्येक श्वास पूर्ण जगणे व अनुभवणे आवश्यक आहे. तुम्हाला हे समजले आहे का की, सुरू होणार्या प्रत्येक श्वासाचा जसा शेवट आहे, तसेच नवीन श्वास आयुष्याची आठवण देण्यासाठी येणारही आहे. अगदी तसेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचे आहे. एक क्षण आपल्या समोर निसटून जात असतो, तेव्हा दुसरा अलगद पाठोपाठ येतच असतो. भूतकाळात तुमचे जगण्याचे निकष चुकले आहे, असे तुम्हाला कधीकाळी वाटले तर हे नक्की लक्षात ठेवा की, तुमचा वर्तमान येणार आहे.
तुमची जगाशी संवाद साधण्याची पद्धत बदलण्याकरिता एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, तुमच्या मूल्यांनुसार तुम्हाला जगायला शिकण्याची गरज आहे. तुमच्या जीवनातील परिस्थिती काहीही असो, हिताची असो व नुकसानाची असो. तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या निवडलेल्या मूल्यांनुसार जगू शकता. हा सराव तुम्हाला तुमच्या जीवनाच्या उद्देशाचा मार्ग शोधण्यात मदत करण्यासाठीदेखील महत्त्वाचा आहे. आपण स्वत:ची टीका करण्यात इतका वेळ घालवतो की, आपण अनेकदा आपल्या सकारात्मक गुणांचा आदर करणे किंवा जीवन कठीण असताना स्वतःला दयाळूपणा देण्यास विसरतो. कोणत्याही नकारात्मक आत्मचर्चांबद्दल जागरूक राहा. आत्मकरुणेची कला शिकणे, आत्मस्वीकृती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी खूप पुढे नेईल.
अखेरीस आपल्यापैकी बहुतेकजण आपल्या आयुष्याच्या काही कप्प्यांत स्थायिक होतात. जीवनपथावरून चालत चालत आपण काही आदर्श आणि स्वप्ने सोडून देतो, आपण अनावश्यक आणि अनैच्छिक तडजोड करतो, आपण व्यवहार करतो. आपण हळूहळू शिकतो की आपल्याला पाहिजे असलेले सर्वकाही आपल्याजवळ असू शकत नाही. कारण, जीवनातील प्रत्येक परिणाम पूर्णपणे नियंत्रित केला जाऊ शकत नाही. परंतु, जर बारकाईने लक्ष दिले, तर आपण हेदेखील शिकतो की, आपण प्रत्येक परिणामांचा सर्वोत्तम उपयोग करू शकतो आणि तरीही आपला वेळ, शक्ती आणि वृत्ती योग्यरित्या व्यवस्थापित केल्यास आपल्याला जीवनात जे हवे आहे ते मिळवू शकतो.
आयुष्यात तुम्ही कधी तोडगा काढावा, या प्रश्नाचे कोणतेही आदर्श एकसमान उत्तर नाही, परंतु, जेव्हा तुम्हाला अशी परिस्थिती येते जी तुम्हाला तडजोड आणि विरोधाविरूद्ध लढा यांपैकी काय निवडावे, हा प्रश्न समोर उभा टाकतो, तेव्हा स्वतःशी असलेला नितांत प्रामाणिकपणादेखील मदत करू शकतो. जीवन हा सर्वात मोठा चमत्कार आहे. तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी काहीतरी तयार करण्यासाठी या पृथ्वीतलावर आलेले आहात. तुम्ही तुमच्या सभोवतालचा आनंद वाढवण्यासाठी आहात. आपण विश्वाच्या सौंदर्याची निर्मिती आणि आनंद घेण्यासाठी आहात. हीच मानव असण्याची जादू आहे आणि यासाठी लागणारी सर्व प्रेरणा तुमच्यात आहे.
डॉ.शुभांगी पारकर