धुवा हुवा केजरीवाल

    25-Oct-2022   
Total Views |
 
केजरीवाल
 
 
 
 
दिवाळीचे फटाके म्हणजेच जणू वायूप्रदूषण, हे समीकरण अलीकडे इतके बिंबवले गेले की, फटाके फोडणे म्हणजे जणू पापच, असे एक नकारात्मक चित्र समाजात निर्माण झाले. दिल्लीसारख्या राज्यात जिथे आधीच हवेचा दर्जा खालावलेला असतो, तिथेही गेली काही वर्षं दिवाळीत केजरीवाल सरकारने फटाक्यांवर बंदीचा तुघलकी निर्णय घेतला. म्हणजे फटाक्यांचे उत्पादनही करायचे नाही, त्यांची साठवणूक, विक्री सगळे काही बंद.
 
 
 
पण, तरीही दिल्लीकरांनी दीपोत्सवातील आतषबाजीला सुरुंग न लावता, यंदाही फटाक्यांचा वर्षाव केला. त्यामुळे दिल्लीत फटाके फोडलेत, तर 200 रुपये दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास हा केजरीवाल सरकारचा निर्णयही दिल्लीच्या हवेत कुणीकडे विरुन गेला. एवढेच नाही, तर दिल्लीकरांनी हिंदूद्वेष्ट्या केजरीवालांना डिवचण्यासाठी मुद्दाम फटाके फोडतानाचे व्हिडिओ ट्विटरसह समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ही केले आणि तिथे ‘हॅशटॅग’ वापरला गेला ’ञ्च्धुवा हुवा केजरीवाल!’ कारण, केजरीवालांचा ढोंगीपणा गेली कित्येक वर्षे दिल्लीची जनता अनुभवते आहेच. दरवर्षी दिवाळी तोंडावर आली की, दिल्लीतील फटाक्यांची बंदीची चर्चा होते. फटाक्यांचे प्रमाणही कमी झाले, काहींनी तर पर्यावरणपूरक फटाके फोडण्याचा मार्गही पत्करला, पण दिल्लीचे प्रदूषण काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे दिल्लीच्या वायूप्रदूषणाला फटाक्यांचा धूर नव्हे, तर शेजारच्या पंजाब-हरियाणा राज्यात शेतकरी पाचट, पेंढ्या जाळत असल्यामुळे राजधानीची हवा प्रदूषित होते. यावर ‘आयआयटी’च्या एक संशोधनानेही शिक्कामोर्तब केले.
 
 
 
पण, केजरीवालांचा जीव घुसमटतो तो केवळ फटाक्यांमुळेच! आता तर शेजारी पंजाबमध्येही ‘आप’चे सरकार. परंतु, तरीही तेथील मुख्यमंत्री या समस्येवर तोडगा काढण्यास असमर्थच ठरलेले दिसतात. एकूणच काय तर प्रदूषणाच्या नावाचा हिरवा मुलामा देत हिंदूंच्या सणांना विरोध करायचा, फटाके फोडले म्हणून हिंदूंच्या मुलांना तुरुंगात टाकायच्या धमक्या द्यायच्या! पण, अशा फुटकळ धमक्यांना दिल्लीतील हिंदू बांधवांनी भीक घातलेली दिसत नाही. कारण, केजरीवालांचा हिंदूविरोधी चेहरा या आणि अशा अनेक प्रसंगांतून गेली काही वर्षे जनतेसमोर आला आहेच. त्यामुळे दिल्लीच्या खुर्चीत बसून गुजरात जिंकायचे स्वप्नरंजन करणार्‍या केजरीवालांना दिल्लीतीतील जनतेने धुवा धुवा करून धुतले ते योग्यच!
 
 
अजान, फटाके आणि आवाज
 
 
 
मुंबई आणि परिसरात काल पुन्हा एकदा अजानवरील भोंगे आणि फटाक्यांचा आवाज यावरून ट्विटरवर वाद उफाळून आला. त्याचे झाले असे की, सलमान खान नामक एका व्यक्तीने रात्री उशिरापर्यंत फटाके वाजत असल्याची तक्रार ट्विटरवरून मुंबई पोलिसांकडे केली. त्यावर मुंबई पोलिसांनीही संबंधित पोलीस स्थानकाला याबाबत कळविण्यात येईल, असेही आश्वासन दिले. परंतु, मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि अमेय खोपकर यांनी अशा तक्रारदारांचे कान टोचले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेने भोंग्यांच्या विरोधात आंदोेलन केले होते. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवले नाही, तर मशिदीसमोरच हनुमान चालीसा वाजवून जशास तसे उत्तराची भाषा मनसेने केली होती. राज ठाकरे यांच्या यासंदर्भातील आवाहनानंतर मनसैनिकांनीही लगोलग राज्यभरात मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर काही ठिकाणी पोलिसांनी मशिदींवरील भोंगे उतरवलेही, पण अजूनही मोठ्या संख्येने याच भोंग्यांवरून अजान अगदी पहाटेपासून दिवसभर सुरूही असते. त्यामुळे “फटाक्यांच्या आवाजाचा एक-दोन दिवस तुम्हाला त्रास होतोय, पण विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही. मात्र, तुमची अजान अजूनही भोंग्यांवर अनेक ठिकाणी सुरू आहे. थोडं सहन करा, कारण दिवाळी आहे,” या शब्दांत चव्हाण यांनीही तक्रारदारांना खडे बोल सुनावले.
 
 
 
 
चव्हाण यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. कारण, अजूनही अजानच्या आवाजाने पहाटेची कित्येकांची झोपमोड तर होतेच, शिवाय या मशिदींच्या भोंग्यांच्या एकदमच जवळ ज्यांची घरं आहेत, त्यांना या त्रासाची तीव्रता अधिक जाणवते. पण, मुकाट्याने ते हा सगळा प्रकार धर्माच्या नावाखाली गपचूप सहनही करतात. मग असे असेल तर फटाक्यांचा एक-दोन दिवस दिवाळीदरम्यान आवाज झालाच, तर मग अशा मंडळांची सहनशक्ती एकाएकी कुठे जाते? याचा अर्थ, रात्री अगदी उशिरापर्यंत फटाके वाजवावेत, असे मुळीच नाही. फटाके वाजवताना नियमानुसार वेळेचे भान हे हवेच. पण, याचा अर्थ अजानचे पहाटेचे स्वर गोड वाटणार्‍यांनी लगोलग फटाक्यांच्या आवाजाच्या तक्रारी करून त्रागा करणेही अयोग्य. तेव्हा तुम्हीही जरा सहिष्णूतेने घ्या की!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची