जल, जंगल, जमीन यावर वनवासी समाज पिढ्यान्पिढ्या हक्क सांगत आला आहे, तसेच तो समाज जल, जंगल, जमीन याची उपासना करणारा. त्यामुळे वनवासींच्या जीवनातील पावन असलेल्या अनेक दिवसांपैकी आत्ताचे सण म्हणजे दसाय व वाघबारस. आपण (शहरवासी) जाणून घेऊ यांची माहिती.
आपले जनजाती बंधू (वनवासी), वनात डोंगर-दर्यात राहणारे भिल्ल, वारली, कातकरी, कोरकू, कोंकणा, गोंड तसेच दक्षिण गुजरातच्या गोदिया, चौधरी, गामित, वसावा इत्यादी आणि गुजरात, महाराष्ट्र या राज्यांसह अन्य सर्व राज्यात आढळणार्या अनेक जमातींचे लोक यात मोडतात. त्यांची आपापली भाषा, त्यांचे रीतीरिवाज आणि सण साजरे करण्याच्या पद्धती असतात. दसरा-दिवाळी हे सण आपण सर्व जण धुमधडाक्यात साजरे करतो. हिंदुस्थान हा वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा यांनी नटलेला देश म्हणून ओळखला जातो. त्याचमुळे काही किलोमीटरवर प्रांत बदलतो, तशा त्यांच्या भाषा, परंपरा बदलतात. त्यात वनवासी समाज तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या परंपरांचे आकर्षण देश विदेशातील पर्यटकांनादेखील पडते. वनवासींमध्ये विविध सण-परंपरा साजर्या केल्या जातात.
होळीसारख्या सणांसारखाच शारदीय नवरात्रातील दुर्गापूजा व दसरा जनजाती समाजात साजरा केला. दसरा म्हणजे विजयादशमी. भारतात ‘दसै’ असा एक शब्द आहे. संस्कृत भाषेतील दशमी या शब्दाला हिंदी भाषेत ‘दसई’ हा शब्द अनेक प्रांतात प्रचलित आहे. भारत-नेपाळ सीमेवरील, विशेषतः बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी, तसेच पोर्ट ब्लेअर, अंदमान-निकोबारसारख्या ठिकाणी हे ‘दसई’ प्रसिद्ध आहे. काही जनजाती समाजातील पंचांगात दसाई मास म्हणूनही प्रचलित आहे. जनजाती संस्कृतीमधील ‘दसाय नृत्य’ हे पर्व या समाजाने दिवाळीच्या आधी शारदीय नवरात्रीत साजरे केले. या पर्वाचा प्रारंभ दुर्गापूजेच्या सप्तमीपासून होतो आणि दशमीला त्याची समाप्ती होते. हा सण झारखंडसारख्या परिसरातील जनजाती समाजानेदेखील गावो-गावी जात, नाचत, गाणी गात आनंदात साजरा केला. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आढळते. आजच्या काळातदेखील ही प्रथा टिकवून ठेवण्यास त्यांचा आग्रह असतो.
आपल्या इष्ट देवी-देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या वडिलधार्यांकडे यातील युवक आपल्या ज्येष्ठांकडून वनौषधीचे, मंत्रतंत्राचे, शिक्षणाचे मागणे मागतात. समस्त समाजातील रोगराई नाहिशी करण्यास आपले योगदान देण्यात यशस्वी होण्याचे मागणेही ते मागतात. या पर्वात ‘दसाय नृत्य’ केले जाते. ही नृत्यशैली आई आदिशक्ती दुर्गेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या बाबतीत अनेक कथा आहेत. काहींच्या मते, महिषासुर वधाशी याचा संबंध जोडलाय, तर काहीजणांनी त्याचा संबंध जनजातीय संथाल या जमातीमध्ये असलेल्या एका आचार्यांशी जोडला आहे. त्या हुदड नावाच्या आचार्यांच्या कथेत सांगीतले जाते की, त्या आचार्यांचे, कट्टर पुरुषविरोधी असलेल्या एका दुष्ट महिलेने अपहरण केले होते. तेव्हा आचार्यांना शोधणार्या पुरुषांनी स्वतःचे वेषांतर केले आणि आचार्यांची सुटका केली होती. आजतागायत तसेच वेषांतर करुन हे जनजातीय नाचगाणे आणि तसाच उत्सव साजरा करतात. या नृत्यात मध्यभागात वाद्यवृंद असतो आणि बाजूने गोल फेर धरून स्त्री-पुरुष असे सगळे हे नृत्य सादर करतात. यात सहभागी महिला पुरुषांचा पेहेराव करतात, तर पुरुष-स्त्री वेशातील पेहेराव धारण करतात.
दुसर्या एका कहाणीत याचा संबंध क्रांतिकारकांशी जोडलेला आढळतो. क्रांतिकारकांना शोधण्याशी याचा संबंध जोडलाय. विदेशी आक्रमकांनी वनवासी क्रांतिकारकांना पकडून बंदिवासात टाकण्यास जे तंत्र वापरले, ते याच्याशी मिळतेजुळते आहे. वनवासी पुरुषांना शोधून हद्दपार करण्यात येत होते, तेव्हा आपली ओळख झाकली जावी, म्हणून जनजातीय वनवासी पुरुष हे स्त्री वेषात नाचगाणी करत टोळक्यांनी पसार होत. या दसाई नृत्यात ‘हायऽऽ रे हायऽऽ..’ अशा गाण्यांनी आपले दुःख, आपल्या मनातील द्वेष आपला विरोध हे आदिवासी क्रांतिकारक प्रकट करत. त्या नाचण्यात त्यांच्या भाषेतले ‘देहेल देहेल’ हे शब्द आहेत, त्या शब्दार्थात विजयाचे प्रतीक आढळते. विदेशी आक्रमणकर्त्यांवर विजय प्राप्त करण्याचा संकल्प त्या गाण्यात आढळतो. जुन्या पिढीतील हे वनवासी ‘पूर्वीसारखे आता राहिले नाही’ अशी खंत व्यक्त करताना आढळतात. असे असले, तरी हा नृत्य-गायन प्रकार हिंदुस्थानाच्या सीमेवरील काही वनवासी पाड्यांवर आढळून येतो. आजच्या युगातील ‘डिजे’मुळे हे जनजातींचे विजयादशमीचे ‘दसाय’ नृत्य गायन बिघडत चालले आहे, यात बदल होत वेशांतरही दिसून येईनासे झाले आहे. सगळेच बदलत चालले आहे. असो. यानंतरचा वनवासी समाजातील लाडका सण म्हणजे ‘वाघबारस’, त्याचा आता आढावा घेऊ.
वाघबारस
दिवाळीचा सण आपल्यातील शहरवासी जसा साजरा करतात, तसाच तो दिवाळीचा सण, किंबहुना त्याहूनही अधिक उत्साहात, काहीशा अनोख्या प्रकारे वनवासी बांधव साजरा करतात. दिवाळीतल्या चतुर्दशीच्या दोन दिवस आधी ‘वाघबारस’ हा सण वनवासी साजरा करतात. ‘बारस’ म्हणजे बारावी तिथी म्हणजे द्वादशी. वनवासींमध्ये त्या दिवशी वाघबारस ही व्याघ्रदेवतेची तिथी निष्ठेने मानली जाते. त्या दिवशी वनवासी वाघदेवाचे म्हणजे वाघोबाचे मनोभावे पूजन करतात. दिनदर्शिकेत वसुबारस : निज अश्विन कृष्ण एकादशी- शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022, असे सर्वसामान्यतः दाखवले जाते. वनवासी समाजातील काहीजण जे गोधन पाळतात, ते ‘वसुबारस’ साजरा करतात. काहीजण, जे जंगलात राहणारे असतात ते ‘वाघबारस’ साजरी करतात. वाघ दिसणे किंवा त्याचा आपल्या परिसरात वावर असणे, हे वनवासी बांधव शुभलक्षण मानतात. ज्या भागात वाघाचे वास्तव्य आहे त्या भागात अवर्षण परिस्थिती कधीही निर्माण होत नाही, अशा भागात नेहमी सुबत्ता असते; अशी वनवासी बांधवांची भावना आहे. म्हणून वनवासी बांधव ‘वसुबारस’ऐवजी ‘वाघबारस’ साजरी करतात. निसर्गपूजक म्हणून ओळखल्या जाणार्या वनवासींमध्ये प्रत्येक सणात निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. अर्थात, त्यात निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला जातोच, शिवाय स्वसंरक्षणासाठीही निसर्गाला साकडं घातलं जातं. वाघाने आपल्यावर हल्ला करु नये म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघाचे पूजन केले जाते. या सणाला ‘वाघबारस’ म्हणतात. इतरत्र ‘वसुबारस’ सण साजरा होत असताना वनवासी पाड्यांवर ‘वाघबारस’ साजरी होते. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा मोठा दिवस.
काही गावांमध्ये गाई-गुरांचे रक्षण व्हावे म्हणून वाघाच्या मंदिरात कोंबड्याचा बळी दिला जातो. तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो. काही ठिकाणी व्याघ्रचित्राचे कोरीव काम करुन त्यावर शेंदूर लावतात. व्याघ्रचित्राचे पूजन करून त्या व्याघ्रदेवतेचा सन्मान करण्यात येतो असा हा ‘वाघबारसे’चा सण साजरा होत असतो. ‘वाघबारस’च्या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने वाघाच्या जंगलातून लाकूडफाटा आणला, तर त्याला तो वाघोबा काहीतरी शिक्षा म्हणून त्याच्या दारात येऊन गुरगुरतो किंवा त्याच्या पाळीव पशु-पक्ष्यांवर हल्ला करतो; अशा आख्यायिका जुन्याजाणत्या लोकांकडून आजही सांगितल्या जातात. अशाच काही आख्यायिकांनुसार, सणाच्या एक महिना आधी वनवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात ते ‘वाघबारसे’ला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला वनवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. ‘वाघबारसे’च्या निमित्ताने लोक शेतातली कामे बंद ठेवतात. पूर्वी बहुसंख्य वनवासी कुटुंबात 50पेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांना सांभाळण्यासाठी स्वतंत्र गुराखी असत. नवीन कपडे परिधान करुन हे गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आजही गुराखी ‘वाघबारसे’ला नवीन कपडे परिधान करतात. तसेच प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे असा थोडाथोडा निधी ते गोळा करुन संध्याकाळी गावातील सर्व गुरे-ढोरे व्याघ्रदेवतेच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले-मुली एकत्र येतात. व्याघ्रमंदिराच्या संपूर्ण परिसरात गोमय व गोमूत्र शिंपडले जाते. रात्री येथे कोणीही थांबत नाही. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटवली जाते. सगळे तेथे जमतात. गुराखी मुले हे वाघ, अस्वल, कोल्हा अशी बहुरुपे घेऊन खेळ मांडतात. त्यातल्या एकाला वाघोबा बनवले जाते. या वाघाला पळायला लावून ‘आमच्या शिवारी येशील का’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणातो.
अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर व्याघ्रमंदिरे आहेत. वेशीवरील व्याघ्रमंदिरात जाऊन पूजा केली जाते. तेथे सर्वजण गावकरी एकत्र येऊन नवस फेडतात. वनातील हिंस्र श्वापदांपासून पाळीव प्राण्यांचे गाई-गुरांचे रक्षण व्हावे, यासाठी कोंबडा, बोकड यांचा नैवैद्य दाखवला जातो. काही भागात डांगर, तांदळाची खीर यांचाही नैवद्य दाखवला जातो. वनवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर नारळ फोडून पूजा करत व्याघ्रदेवाच्या पाया पडून आराधना करतात. ‘आमचे, गव्हार्यांचे, गोरा-ढोरांचे खाड्या, जनावरांपासून रक्षण कर, आम्हाला चांगले पीकपाणी दे, आजारांना दूर पळव’ असे मागणे मागितले जाते. एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. रात्रीच्या व पहाटेच्या मंगलमयी वातावरणात ते सर्व बांधव तालासुरात ‘दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी..!’ अशी गीते तालासुरात म्हणत प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात. गोठ्याबाहेर रांगोळी काढतात. तेला-तुपाचा दिवा लावतात. सर्व प्राण्यांची पूजा करतात, त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांना गोडाधोड चारले जाते. वनवासी तरुण-तरुणी विविधरंगी वस्त्रे परिधान करून, एकत्र जमून तालासुरात नाचण्यासाठी त्यांच्या वाडीवस्तीत जमतात. त्यांच्या-त्यांच्या प्रत्येक चालीचा नाच वेगवेगळा असतो. त्या चाली वेगवेगळ्या नावाने परिचित आहेत. असे एका ठिकाणी त्या चालींबद्दल सांगीतले आहे की, मोराचा = मुर्हा चाली, बदक्या चाली, लावरी चाली बायांची, देवांची, रानोडी, टाळ्यांची, नवरदेवाची चाल अशा प्रकारच्या त्या चाली असतात.
कालौघात ‘वाघबारस’ ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्यासारखी परिस्थिती राहणार का, हा प्रश्न आपल्यासमोर असणार का? ‘वाघबारस’ साजरी करण्याची प्रथा आता हळूहळू लोप पावत आहे का? वनवासींमध्ये जनावरांची संख्याही रोडावत आहे का? त्यामुळे गतवैभवातला हा सण आता साजरा होताना दिसेनासा झाला तर आपण अचंबित होण्याची गरज नसेल कारण कालौघात वाघबारस ही प्रथा नैवेद्यापुरती मर्यादित राहण्याची शक्यता असेल. आपण सारे ग्रामवासी व शहरवासी यांनी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. या लेखाच्या अनुषंगाने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
- श्रीपाद पेंडसे
(लेखक वनवासी कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, खेलकूद आयाम प्रमुख आहेत)