जगात भारत हा असा देश आहे जो दार महिन्यात कोणता ना कोणता सण साजरा करतो. अनेक धर्माच्या आणि पंथांच्या लोकांनी बहरलेल्या भारतात अनेक चालीरीती आपण पाहतो. भारतातील सर्वच राज्यांमध्ये विविध धार्मिक श्रद्धा आणि चालीरिती आपणास पाहायला मिळतात. अशा अनेक परंपरा भारतात आहेत ज्याबद्दल ऐकल्यावर प्रथम त्यावर आपला विश्वासच बसणार नाही. यातीलच एक म्हणजे नाग दिवाळी. आता नाग दिवाळी म्हणजे काय? नाग दिवाळी कधी आणि कुठे साजरी केली जाते? नाग दिवाळीचे महत्त्व काय? हे जाणून घेऊया…
उत्तराखंडातील चामोली जिल्ह्यामध्ये नाग दिवाळी साजरी करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीवर नाग दिवाळी साजरी करण्यात येते. हिंदू दिनदर्शिकेनुसार नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. या दिवशी नागांची विशेष पूजा करण्यात येते. यंदाच्या वर्षीही देव दिवाळीनंतर वीस दिवसांनी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी नाग दिवाळीची तारीख आलेली आहे.
नाग दिवाळीमागे असणाऱ्या पौराणिक कथेनुसार नागांना पाताळ लोकचा देव मानले जाते. तसेच घरात नागाची रांगोळी काढून त्यासमोर दिवा लावल्याने मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास यामागे असतो. त्याचप्रमाणे नाग देवताची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या सुटतात. त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष हा पूर्णपणे निघून जातो, असा चामोली जिल्ह्यातील लोकांचा विश्वास आहे.
चामोली जिल्ह्यातील वान गावामध्ये नाग देवतेचे एक रहस्यमय मंदिर आहे. आजही असे म्हटले आणि मानले जाते की नागराज येथे वास्तव्यास असून स्वत: च्या रत्नाचे रक्षण करत आहे. त्याचबरोबर असेही मानले जाते की नागमणीचे रक्षण करत असताना नागराज नेहमीच दंश करतात आणि त्यामुळे लोक आजही जवळजवळ ८० फूट अंतरावरून नमस्कार करतात. उत्तराखंडाची आराध्य देवता नंदा देवी यांच्या धर्म भावाच्या म्हणजेच लाटूच्या नावाने हे मंदिर बांधले गेल्याचे सांगण्यात येते.
याबाबत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील पुजारीदेखील स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. यामागे येथील नागरिकांचा असा समज आहे की रत्नाचा तेजस्वी प्रकाश हा माणसाला आंधळा बनवतो. एवढंच काय तर पुजाऱ्याच्या तोंडाचा वास देवतेपर्यंत पोहोचू नये आणि तसेच नागराजाचा विषारी वास पुजाऱ्याच्या नाकापर्यंत पोहोचू नये म्हणून रोज पूजेच्या वेळी नाकाला आणि तोंडाला पट्टी बांधूनच पुजाऱ्यांकडून पूजा केली जाते. सर्व भाविकांसाठी दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षातून एकदा या मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात. त्याचबरोबर या दिवशी येथे एक मोठी यात्रा देखील भरते. तसेच हे मंदिर समुद्रसपाटीपासून तब्बल ८५०० फूट उंचीवर आहे.