म्हणून श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला!

21 Oct 2022 18:43:23

narakchaturdashi
दिवाळी पाडव्याप्रमाणेच नरक चतुर्दशीलासुद्धा आपण सुगंधी उटणे व सुगंधी तेलांचे मर्दन करून मंगल स्नान करतो. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? मानवांना हर प्रकारे पीडा देणारा असुर भौमासुर म्हणजेच नरकासुर. या नरकासुराचा वध अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला. मृत्यूपूर्वी नरकासुराने कृष्णाची प्रार्थना करून वर मागितला. त्यादिवशी जो मनुष्य सूर्योदयापूर्वी मंगल स्नान करेल त्याला नरकवास होणार नाही तसेच दारिद्य आणि संकटांपासून त्याची मुक्ती होईल असा वर श्रीकृष्णाने नरकासुराला दिला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
 
 
कृष्णाने ज्या सोळा सहस्र् नारींशी विवाह केला त्या उपवर स्त्रियांना नरकासुराने पळवून नेऊन माणिपर्वतावर बंदिवासात टाकले होते. स्त्री व संपत्तीच्या तृष्णेपोटी त्याने अगणित संपत्ती लुटली. देवमाता अदितीची कुंडले व वरूणदेवाचे विशाल छत्रही लुटले. त्याने मिळवलेल्या वरामुळे त्याने मानव, गंधर्व व देवांनाही मोकळे सोडले नाही. संपूर्ण पृथ्वीला तापदायक ठरणाऱ्या या नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. गिरीपर्वतांमध्ये अनेक दुर्जय डोंगररांगांनी वेढलेली प्राग्जोतिषपूर ही त्याची राजधानी होती. अनेक दुर्धर डोंगर खंदकांची ही जमीन जिंकून घेण्यास कठीण अशी होती. गरुडझेप घेऊन कृष्णाने नरकासुराचा वध केला. या शक्तिमान असुराच्या वधाने सर्व देव, गंधर्व व मनुष्य साम्राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. भगवान कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
 
 
या कथेचे अजून एक कारण असेही आहे की या तिथीस चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर होते. हा स्थित्यंतराचा काळ नकारात्मक विचार, दूषित-कलुषित वातावरणाने युक्त असतो. ही नकारात्मकता आणि अंधार प्रकाशाने व्यापून टाकण्यासाठी पहाटेस उठून शुचिर्भूत होऊन मंगल स्नान उरकून तुपाचा दिवा दारात लावला जातो. हा दीपरूपी अग्नी चेतवून वाईट शक्तींचे निराकरण केले जाते. पहाटवेळेस ब्राह्म मुहूर्तावर दारासमोर दीप प्रज्वलित करून निरामय पहाटेची कामना केली जाते. स्नान करताना नरकासुराचे प्रतीक म्हणून चिरोटे पायाखाली फोडण्याची प्रथा काही समाजात पाहायला मिळते. असुर शक्तीचा संहार म्हणजे मांगल्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या दिवशी होते. या दिवशी अंधकाररूपी अलक्ष्मीचे निर्दालन करून येत्या अमावास्येच्या लक्षमीपूजनाची सिद्धता केली जाते. आकाशजत तारे तेवत असतानाच भल्या पहाटे उठून मूळ असलेल्या आघाडा या झाडाच्या फांदीने संपूर्ण शरीरावर जलप्रक्षालन केले जाते. अलक्ष्मीच्या रूपाने आपल्या तना-मनात वास करून असलेली नकारात्मकता, द्वेष, चिंता व पापवासनांचा त्याग करून लक्षमीपूजनाची सिद्धता केली जाते.
 
 
नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्याकडे साजरी केली जाणारी वेगळी परंपरा कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
 
Powered By Sangraha 9.0