लक्ष्मीपूजन अमावस्येलाच का केलं जातं?

    21-Oct-2022   
Total Views |

LAKSMIPUJAN 
 
दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण. आठ महत्वाच्या सणांचा एकत्रित उत्सव. या चार दिवसांत लक्ष्मी पूजनाचे महत्व उल्लेखनीय आहे. लक्ष्मी पूजन हा सनातन धर्मातील महत्वाच्या सणांपैकी एक सण. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. अमावास्येच्या दिवसापासून चंद्र ज्याप्रमाणे कला कलाने वाढत जातो, त्याच प्रकारे घरच्या लक्ष्मीची आपल्यावरील मर्जी दिवसा गणिक वृद्धिंगत व्हावी हा त्यामागचा हेतू. या अमावास्येच्या संध्यासमयी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते अशी मान्यता आहे.
 
 
लक्ष्मीच्या आगमनाची तयारी दारात विविधरंगी रांगोळी रेखून तसेच आकाश कंदील व दिव्यांची रोषणाई करून केली जाते. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे घरात आगमन व्हावे म्हणून रांगोळी भोवती पाच दिवे लावून घराच्या मुख्य दारापासून देव्हारा आणि तिजोरीपर्यंत लक्ष्मीची शूभ पावले रेखली जातात. अश्विन आणि कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी करण्यामागे अजून एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे भगवान श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपल्यानंतर राक्षस राजा रावण याचा वध करून अयोध्येस परतले. त्यावेळी लोकांनी दारात व रस्त्यांवर असंख्य दिव्यांची रोषणाई केली. श्री रामाच्या अयोध्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. तेव्हापासून दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली जाते.
 
 
या वर्षी लक्ष्मी पूजनाचा अमृत मुहूर्त २४ ऑक्टोबर रोजी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरु होतो. ८. पासून १०. १६ पर्यंतच्या काळात लक्षमी पूजन करणे श्रेयस्कर. लक्ष्मी पूजन विधिवत केलेले केव्हाही उत्तम. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनासाठी चौरंगावर लाल रंगाचा कोरा कपडा अंथरावा. कुंकूमिश्रित अक्षतांचे अष्टदल कमलपुष्प रेखून त्यावर हळद कुंकू व फुले वाहावीत. अष्टदल न जमल्यास स्वस्तिक रेखला तरीही चालतो. एका चांदी किंवा तांब्याच्या भांड्यात गंगाजल घेऊन श्रीफळाच्या बाजूला विड्याच्या किंवा आंब्याच्या पानात नाणे ठेऊन त्यावर श्री लक्षमीच्या मूर्तीची स्थापना करावी. मूर्ती स्थापित करताना कलशाच्या डाव्या बाजूस करणे गरजेचे आहे. इतर मौल्यवान वस्तू व नैवेद्य पुढील भागात मांडून घ्यावेत. कोपऱ्यात समयी तेवत असावी. यानंतरच लक्ष्मी, गणपती व इतर स्थापन केलेल्या देवतांचे आवाहन करावे. सर्व मांडलेल्या साहित्यावरून व देवतांच्या प्रतिकांवरून जल प्रक्षाळून घ्यावे. शुद्धी होताच श्री लक्ष्मीच्या श्रीसूक्ताचे पठण करून पंचामृताने षोडशोपचारे सर्व दैवतांची पूजा करावी. पूजेने प्रसन्न झालेल्या लक्ष्मीची आरतीनंतर घरात आगमनासाठी प्रार्थना करावी.
लक्ष्मी पूजनानिमित्त तुमच्याकडे साजरी केली जाणारी वेगळी प्रथा कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.