जाणून घ्या! काय आहे धनत्रयोदशीचं महत्व?

21 Oct 2022 17:46:25


dhanatrayodashi
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि नात्यांचा उत्सव आहे. दिवाळीच्या चार दिवसात आपण गोधनाची, धन्वंतरीची, लक्ष्मी व कुबेराची पूजा करतो. नरक चथुर्दशी साजरी करून पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करतो. बलिप्रतिपदेनंतर भाऊबीज साजरी करून आपल्या बहीण भावांच्या सानिध्यात दिवाळी सणाची सांगता होते. चंद्र कालगणनेनुसार अश्विन आणि कार्तिक मासात दिवाळी साजरी केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात धनत्रयोदशीचं महत्व....
 
 
अश्विन महिन्यातील त्रयोदशीला आपण धनत्रयोदशी साजरी करून दिवाळी सणाची सुरुवात करतो. वसुबारस नंतर येणारा हा दुसरा सण आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन धान्याची पूजा करतो. तसंच उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीची पूजा करतो. देव वैद्य भगवान धन्वंतरी यांचा धनत्रयोदशी हा जन्मदिवस. या दिवशी काही ठिकाणी धणे व गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो तर काही समाजात किसलेला ओला नारळ व त्यात साखर घालून खिरापत वाटली जाते.
 
तसंच काही ठिकाणी या दिवशी धन्वंतरीची पूजा मृत्यू येऊ नये म्हणून साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे काय? अंगणात दारासमोर सडा घालून मध्यभागी चार वाती असलेला दिवा लावला जातो. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही दिशांना या वाती खंड पडणार नाही याची दक्षता घेऊन तेवत ठेवल्या जातात. अंधकार संपून चहू दिशा प्रकाशाने उजळून जातात. दिवाळीची उत्साहात सुरुवात झालेली असते.
 
या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी तीन महत्वाचे योग आलेले आहेत. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाबरोबरच योगायोगाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सुद्धा याच दिवशी आला आहे. यावर्षी दिनांक २२ ऑकटोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी सुरु होते. २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत केव्हाही तुम्ही धान्य पूजा करू शकता. परंतु शास्त्रधारानुसार धनत्रयोदशी आणि प्रदोष व्रताचे पालन करणाऱ्या उपासकांनी २३ ऑक्टोबर रोजी उपवास ठेवणे इष्ट असल्याचे समजते.
 
या दिवशी सोन्या रूप्याचे दागिने बनवले जातात. धन आणि धातू यांची या शुभ मुहूर्तावर खरेदी केली जाते. घरातील भांडी, शस्त्र, नाणी यांची घरातल्या देव्हाऱ्यात पूजा केली जाते. धनत्रयोदशी ही येणाऱ्या अमावास्येच्या लक्ष्मीपूजनाची पाऊलखुण आहे. या दिवशी नव्या वस्तूंची व कपड्यांची खरेदी होते, घरा-दारावर शुचिर्भूत होऊन तोरणे लावली जातात. संपूर्ण घर नव्या पणत्यांनी उजळले जाते. घरे, कार्यालये रांगोळी रेखून दिवे-कंदील लावून सजवली जातात. घराच्या कोपऱ्या- कोनाड्यात अंधकार रूपाने साचून राहिलेली नकारात्मकता सुगंधी तेल घातलेल्या मातीच्या पणत्यांद्वारे दिव्यांच्या रोषणाईने पळवून लावली जाते.
 
व्यापारी या दिवशी धनाची पूजा करतात, शेतकरी शेतीच्या अवजारांची आणि धान्याची पूजा करतात तर विध्यार्थी पुस्तकांची पूजा करून विद्यादेवीची आराधना करतात. खेड्यांतून कित्येकदा गाई गुरांची पूजा करून गोठ्यात तसेच शेतातल्या रक्षणकर्त्या ब्रम्हदेवाच्या देवळात दीप प्रज्वलित केला जातो. प्रत्येकजण आपापल्या मुख्य उत्पन्नाच्या उपकरणांची पूजा करतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी देव दानवांनी अमृतासाठी सागर मंथन केल्याची कथा हिंदू संस्कृतीत प्रचलित आहे. याच दिवशी मंथनातून देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी दूध सागरातून प्रकट झाले. दीर्घ आयुष्यासाठी अमृताचे भांडे घेऊन धन्वंतरींनी जन्म घेतला अशी आख्यायिका प्रचलित आहे. धनत्रयोदशीनिमित्त तुमच्याकडे साजरी केली जाणारी वेगळी परंपरा कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
 
 
Powered By Sangraha 9.0