दीनदुबळ्यांच्या आयुष्यातील ‘प्रकाश’

21 Oct 2022 21:49:09
mansa


एसटीचे तिकीट काढण्यासाठी ज्यांच्या खिशात पैशात नव्हते, तेच प्रकाश काकड यशोशिखरावर पोहोचल्यानंतर सेवाभावी वृत्तीने दीनदुबळ्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करीत आहेत. त्यांच्याविषयी...


सिन्नर तालुक्यातील ठाणगावात जन्मलेल्या प्रकाश गबाजी काकड यांचे आई-वडील शेती करत. पाच भाऊ आणि चार बहिणींचे कुटुंब सांभाळताना आई-वडिलांना मोठी कसरत करावी लागे. एके दिवशी तर भाजीसाठी मीठ नसल्याने सर्वांनी अळणी भाजी खाल्ली आणि नंतर आई उपाशी झोपली. असे अनेक प्रसंग बालपणी झेलत असलेले प्रकाश काकड अभ्यासातही जेमतम होते. ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’त त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

शालेय वयात खास वर्तमानपत्र वाचण्यासाठी ते ‘आप्पा केदार टी-स्टॉल’वर जायचे. एवढंच नाही, तर रस्त्यावर काहीही वाचण्यासारखे दिसले तरीही ते वाचत बसत. त्याचदरम्यान जनता पक्षाचा उदय झाला आणि त्यांना राजकारणाची गोडी निर्माण झाली. पुढे ते शिक्षणासाठी बहीण विठाबाई पंढरीनाथ आव्हाड यांच्याकडे राहू लागले. दहावीपर्यंतचे शिक्षण ‘रूंग्टा हायस्कूल’मधून पूर्ण केले. यादरम्यान सामाजिक कार्याची आवड जोपासण्यासाठी त्यांनी 1979 साली गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. यावेळी ते गणेश आरतीला प्रसिद्ध व्यक्तींना बोलवत. त्यामुळे त्यांच्या ओळखी वाढत गेल्या.

दहावीनंतर ‘बी.वाय.के. कॉलेज’मध्ये वाणिज्य शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. आधीपासूनच प्रकाश यांना व्यापार करायचा होता. “मी गोळ्या-बिस्किटे विकेन. परंतु, व्यापारच करेन,” असे ते आईला सांगत. अनेक सामाजिक उपक्रमांत ते सहभाग घेऊ लागले. 1987 साली वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये ’रिसेप्शन मॅनेजर’ म्हणून नोकरी सुरू केली. व्यापार करण्यासाठी अनुभव गाठीशी हवा, ही गोष्ट ध्यानात घेऊन त्यांनी पाच वर्षे नोकरी केली. यावेळी त्यांना अनेक वाईट अनुभव आले. लोकांकडून तुच्छ लेखणे, चुकीची वागणूक मिळणे, दुर्लक्षित होणे, गलिच्छ असल्याची जाणीव करून देणे अशा अनेक गोष्टी त्यांनी सकारात्मक पद्धतीने आणि संयमाने स्वीकारल्या. हॉटेलमध्ये नोकरीला असल्याने लग्नासाठी अनेक नकार पचवले. परंतु, निफाड तालुक्यातील शिंगवे गावातील मुलीचे स्थळ आले खरे. परंतु, त्यांनी त्याला नकार दिला. 2,700 रुपये पगारात कसे घर चालवायचे, हा विचार करून त्यांनी लग्नाला नकार दिला. नंतर, व्यवसायासाठी 50 हजारांची मागणी त्यांनी कुटुंबीयांकडे केली आणि ती मान्य झाल्यानंतर ‘ओम फर्निचर’ नावाने राजेंद्र विश्वकर्मा यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला.

पुढे 1993 साली ते त्याच मुलीसह विवाहबंधनात अडकले. फर्निचर व्यवसायातील काहीही ज्ञान नसल्याने सुरुवातीला मोठा तोटा झाला. अनेकदा भाडे भरण्यासाठीही पैसे नसायचे. 1995 साली ‘आयटीसी’ कंपनीच्या ब्रॅण्डिंगच्या कामाला सुरुवात केली. 1998 साली कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांचा व्यवसाय प्रचंड वाढला आणि त्यांनी समाजकार्याला सुरूवात केली. मुलगी ऋतुजाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी अनाथाश्रमात जेवण दिले. एकदा शाळेतील एका मुलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत संकलित करताना प्रकाश यांची दुसरी मुलगी सोनल हिने परस्पर वडिलांतर्फे दहा हजार रुपये आणि स्वतःच्या ‘पॉकेटमनी’तील हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. घरी आल्यावर वडिलांनी विचारणा केल्यावर वडील मदत करतील, असा विश्वास असल्याने शब्द दिल्याचे सोनलने सांगितले. पुढे गरजू, दीनदुबळ्यांना मदत करण्याचा त्यांनी संकल्प केला. चार-पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीत गेले असता ती मदत स्वीकारण्यास ‘काऊंटर’ नसल्याने ती स्वीकारली गेली नाही. पुढे काकड यांच्यामुळे ठिकठिकाणी मदतनिधीचे केंद्र सुरू झाले.

एका सलूनवाल्याच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक 35 लाख रुपये त्यांनी स्वतः एक लाख रुपये देऊन बाकीचे संकलित केले. मोरवाडीतील अभ्यासिकेसाठीही त्यांनी मदत केली. दापूर येथील शाळेत ’ई-क्लास’ सुरू करण्यासाठी त्यांनी दोन लाखांहून अधिकची मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अंधशाळेत जेव्हा रेशन, कपडे आदी गोष्टींची गरज भासते तेव्हा ते मदत करतात. ठाणगावच्या शाळेत 150 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे शालेय साहित्य दिले.

दवाखान्याचा खर्च, शेत लागवडीसाठीही ते मदत करतात. प्रकाश यांना बहीण विठाबाई, राजेंद्र विश्वकर्मा, बाळासाहेब कराड, साहेबराव टोपे, शंतनू वडनेरकर, अशोक शिरसाठ, रवी साळुंके, भास्कर गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभते. “जितकी मदत आणि दान करतो, त्यापेक्षा मला नेहमीच जास्त मिळते. मदत करताना कोणताही जातिधर्म बघत नाही. मी कठीण काळ बघितला असल्याने गोरबगरिबांना मदत करणे, मी माझे कर्तव्य मानतो. मदतीसाठी दररोज हमखास दोन-तीन सामाजिक संस्थांचे फोन येतात. दुर्बल, मजबूर आणि गरजूंना मदत करण्यास मी प्राधान्य देतो. दीनदुबळ्या लोकांची सेवा करणे हा एकमेव उद्देश आहे,” असे प्रकाश सांगतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.



Powered By Sangraha 9.0