मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतील अपक्ष उमेदवाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान गाठल्याने बिनविरोध होणाऱ्या निवडणूकीत पुन्हा ट्विस्ट येतोयं की काय, अशी चर्चा रंगली आहे. या निवडणूकीतून भाजपचे उमेदवार मुरजी (काका) पटेल यांनी निवडणूकीतून अर्ज मागे घेतला होता. मात्र, आता बलाबल असलेल्या सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा, असा आग्रह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला आहे. कांबळेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी २०-२५ जणांच्या धमक्या येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अंधेरी पोटनिवडणूक तापली ती म्हणजे शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठल्यावर. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुनही वातावरण तापलं होतं. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. भाजपाने (BJP) या निवडणुकीतून अचानक माघार घेतली. पुन्हा या निवडणूकीत चर्चा होण्याचे कारण म्हणजे पोटनिवडणुकीसाठी उभा राहिलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. मिलिंद कांबळे, असे या अपक्ष उमेदवाराचे नाव असून निवडणूकीतून माघार घ्यावी यासाठी आरोप केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.