पडळकरांनी मानले शिंदे फडणवीसांचे आभार

20 Oct 2022 16:47:38

गोपीचंद पडळकर
मुंबई : 'राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली होती. रामराजे निंबाळकर यांच्या समितीसमोर मांडलेल्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. सर्वसामान्य एसटी कामगारांची दिवाळी आनंदाने साजरी होणार असून त्यासाठी मी फडणवीस शिंदे सरकारचे आभार मानतो,' या शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
 
 
एसटी कर्मचाऱ्यांना विशेष दिवाळी बोनसची सरकारची घोषणा
 
पडळकर म्हणाले की, 'मी बुधवारी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिनिधींसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिवाळीसाठी बोनस देण्यात यावा अशी मागणी केली होती. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आलेल्या समितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या १८ मागण्यांपैकी १६ मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या, त्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारने ४५ कोटींची तरतूद केली आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो,' असे पडळकर यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0