देशातील सर्वांना लागू होणाऱ्या लोकसंख्या धोरणाची गरज : दत्तात्रेय होसबळे

20 Oct 2022 16:57:13

दत्तात्रेय होसबळे
नवी दिल्ली : देशात झालेला लोकसंख्या विस्फोट हा अतिशय चिंताजनक आहे. धर्मांतरणाच्या प्रकारांमुळे हिंदूंची संख्या कमी होत असून ते षडयंत्र देशातील अनेक भागांमध्ये सुरू आहे. त्यामुळे देशात सर्वांना लागू होणाऱ्या लोकसंख्या धोरणाची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह (रा. स्व. संघ) दत्तात्रेय होसबळे यांनी प्रयागराज येथे पत्रकारपरिषदेत व्यक्त केले.
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येखे पार पडली. बैठकीच्या अखेरच्या दिवशी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकरही उपस्थित होते.
देशात सध्या झालेला लोकसंख्या विस्फोट हा चिंताजनक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे असंतुलन होत आहे, याच कारणामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची वेळ आली असून भारताचेही विभाजन याच कारणामुळे झाले होते. देशातील अनेक भागांमध्ये धर्मातरणाचे षडयंत्र राबविण्यात येत आहे, त्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. धर्मांतरणाच्या आधारे सिमावर्ती भागांमध्ये घुसखोरीदेखील होत आहे. त्यामुळे देशात सर्वांना लागू असणारे लोकसंख्या धोरण गरजेचे असल्याचे मत सरकार्यवाह होसबळे यांनी व्यक्त केले आहे.
देशाच्या विकासासाठी तरुण लोकसंख्या आवश्यक असते, असे होसबळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या ६० ते ५० वर्षात लोकसंख्या नियंत्रणावर भर दिल्याने प्रत्येक कुटुंबाची सरासरी संख्या ही ३.४ वरून १.९ झाली आहे. असेच सुरू राहिल्यास एक काळ असा येईल की भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त होईल. त्यामुळे देशात तरुण ठेवायचे असल्यास लोकसंख्येच्या संतुलनावर भर देणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी सांगितले की, 2024 च्या अखेरीस भारतातील सर्व विभागांमध्ये शाखा पोहोचविण्याची योजना आखण्यात आली आहे. ते म्हणाले की, काही प्रांतांमध्ये निवडक मंडळांमध्ये हे काम 99 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. चित्तोड, ब्रज आणि केरळ प्रांतात विभागीय स्तरापर्यंत शाखा उघडण्यात आल्या आहेत. सरकार्यवाह म्हणाले की, देशात पूर्वी संघाच्या ५४३८२ शाखा होत्या, आता देशात ६१०४५ शाखा सुरू केल्या जात आहेत. त्यातही गेल्या वर्षभरात साप्ताहिक सभेत 4000 आणि मासिक सभेत 1800 ने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे 2025 मध्ये संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी देशभरातून तीन हजार युवक संघकार्यासाठी शताब्दी विस्तारक म्हणून बाहेर पडले आहेत. त्याचप्रमाणे १ हजार शताब्दी विस्तारकदेखील कार्यरत होणार असल्याचेही होसबळे यांनी यावेळी नमूद केले.
ईशान्य भारतामध्येही हिंदू स्वाभिमानाचे जागरण
ईशान्य भारतातील वनवासी समुदायामध्ये स्वाभिमान जागृत झाल्यामुळे ‘मी हिंदू’ ही भावना निर्माण झाली आहे. स्वाभिमान जागृत झाल्यामुळे ईशान्येकडील वनवासी समुदायातील लोकांनाही आता संघात सामील व्हायचे आहे. त्यामुळे मेघालय आणि त्रिपुरा राज्यातील वनवासी समाजातील लोकांनीही सरसंघचालकांना विविध कार्यक्रमांची निमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे.
Powered By Sangraha 9.0