‘राव’ ठरणार की ‘सिंग’ होणार ?

20 Oct 2022 21:23:41
 
मल्लिकार्जुन
 
 
 
 
स्वातंत्र्यानंतर जेव्हा-जेव्हा काँग्रेसला नेहरू-गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तेव्हा बहुतेक वेळा त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले मधुर नात्याचे रुपांतर संघर्षात झाले आहे. त्याचे कारणही अगदी स्पष्ट आहे, ते म्हणजे पक्षावरील नियंत्रण हे आपल्याच हाती असावे, असा अलिखित नियम गांधी कुटुंबाने बनवला आहे. त्यामुळे स्वतंत्र बाण्याने कारभार करून ‘राव’ ठरायचे की गांधी कुटुंबाच्या सल्ल्यानेच वागून ‘सिंग’ व्हायचे, याचा निर्णय खर्गे यांना घ्यायचा आहे.
 
 
 
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी तब्बल 24 वर्षांनी निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह अन्य कोणीही गांधी कुटुंबातील सदस्य उभा राहिला नव्हता. अध्यक्षपदासाठी प्रथम राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र, राजस्थानमधील खरी सत्ता सोडून अध्यक्षपदाची लुटुपुटुची सत्ता कदाचित गेहलोत यांना नको असावी. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अस्तित्वात आणून गेहलोत यांनी आपले अध्यक्षपदाचा नाद सोडला. अर्थात, ते करताना सचिन पायलट यांना राजस्थानमध्ये फार वाव न देण्याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. त्यानंतर मग राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये लढत झाली, देशभरातील सदस्यांनी त्यात मतदान केले. मतमोजणीमध्ये खरगे यांना 7 हजार, 897 तर शशी थरूर यांना अवघी 1 हजार,72 मते मिळाली आणि 80 वर्षांचे खर्गे आता काँग्रेसला नवी दिशा देण्यासाठी सज्ज होणार असल्याचे सांगितले जाते. खर्गे हे गांधी कुटुंबाचे निकवर्तीय असल्याने काँग्रेस पक्षाचा कारभार करताना त्यांना फार अडचणी येणार नाहीत, असे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसचा इतिहास पाहिल्यास परिस्थिती वेगळी आहे.
 
 
 
स्वातंत्र्यानंतर जेव्हा-जेव्हा काँग्रेसला नेहरू-गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला, तेव्हा बहुतेक वेळा त्यांचे ’गांधी कुटुंबा’शी असलेले मधुर नात्याचे रुपांतर संघर्षात झाले आहे. त्याचे कारणही अगदी स्पष्ट आहे, ते म्हणजे पक्षावरील नियंत्रण हे आपल्याच हाती असावे, असा अलिखित नियम गांधी कुटुंबाने बनवला आहे. पक्षावर आपण नाही, तर कोणी नियंत्रण ठेवायचे हा अहंभाव त्यामागे आहे. त्यामुळे जगाला दाखविण्यासाठी जरी ‘बिगरगांधी’ व्यक्ती अध्यक्षपदी अथवा पंतप्रधानपदी आला, तरीही खरी सत्ता आपल्याच हाती असावी; ही इच्छा नेहमीच प्रबळ असते. त्यामुळेच कामराज यांचा कार्यकाळ असो किंवा अगदी अलीकडचा नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांचा कार्यकाळ असो, गांधी कुटुंबाशी अपरिहार्य असा संघर्ष झालाच आहे.
 
 
 
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्ष पूर्णपणे हताश झाला होता. अशावेळी सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्यास नकार दिला. त्यामुळे इंदिरा आणि राजीव गांधी यांच्याशी अतिशय उत्तम संबंध असलेल्या नरसिंह राव यांच्याकडे पंतप्रधानपदासह पक्षाध्यक्षपदही देण्यात आले. त्यामागे नरसिंह राव हे काही फार महत्त्वाकांक्षी नाहीत, असा अपसमज होता. अतिशय बुद्धिमान असणार्‍या राव यांना अन्य कोणाच्या कलाने काम करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी गांधी कुटुंबाचा सल्ला न घेताच स्वतंत्रपणे देशाचा आणि पक्षाचा कारभार चालविण्यास प्रारंभ केला होता. बिगरगांधी असूनही पंतप्रधानपदाची पाच वर्षे पूर्ण करणारे ते काँग्रेसचे पहिलेच पंतप्रधान ठरले. मात्र, राव यांचा हा स्वतंत्र बाणा गांधी कुटुंबाला न रुचल्याने त्यांच्यासोबत वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळेच, नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव पक्षकार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवू दिले नाही आणि अंत्यसंस्कारही दिल्लीत करू दिले नाहीत.
 
 
 
राव यांच्या निधनानंतर सीताराम केसरी यांच्याकडे पक्षाची सूत्रे आली, तोपर्यंतही सोनिया गांधी यांनी राजकारणास प्रवेश केला नव्हता. विशेष म्हणजे, त्यावेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केसरी यांनी राजेश पायलट आणि शरद पवार या त्याकाळाच्या दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव केला होता. आणखी विशेष बाब म्हणजे केसरीदेखील गांधी कुटुंबाचे निकटवर्तीयच. मात्र, केसरी यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि त्या गांधी कुटुंबास न रुचल्याने त्यांना अतिशय अपमानास्पद रितीने, कपडे फाडून वगैरे पक्षाध्यक्षपदावरून घालविण्यात आले होते.
 
 
 
भूतकाळातील या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते ते निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग. त्यांनीच नरसिंह राव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेस नवी दिशा दिली होती. मात्र, गांधी कुटुंबापुढे स्वतंत्र बुद्धीने काम केल्यास काय होते; हे अगदी जवळून अनुभवलेले असल्यानेच कदाचित पंतप्रधानपदी असताना त्यांनी गांधी कुटुंबास न दुखावण्याचे आणि त्यांच्या सल्ल्यानेच कारभार करण्याची भूमिका स्वीकारली असावी. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांना आता ठरवायचे आहे की स्वतंत्र बाण्याने कारभार करून ‘राव’ ठरायचे की गांधी कुटुंबाच्या सल्ल्यानेच वागून ‘सिंग’ व्हायचे?
 
 
 
मल्लिकार्जुन खर्गे हे संसदेमध्ये केंद्र सरकारवर जोरदार हल्ले नेहमीच चढवत असतात. बिदर आणि गुलबर्ग्यात त्यांना जनाधार आहे, 1995 पासून ते राजकारणात आहेत. 1972 साली विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर 2008 पर्यंत नऊ वेळा आमदार झाले. पुढे 2014 साली गुलबर्गा येथून खासदार झाले, 2019 साली पराभूत झाल्यानंतर राज्यसभेत आले. संसदीय आयुधांचा त्यांचा अभ्यासही उत्तम आहे, त्यासोबतच प्रशासकीय कौशल्यही आहे. मात्र, त्यांच्यापुढे असलेली आव्हाने ही या वैशिष्ट्यांपेक्षाही मोठी आहेत.
 
 
 
काँग्रेसचे नेतृत्व करताना खर्गे यांच्यापुढे भाजपचे पहिले आव्हान आहे, ज्या पक्षाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रचंड जनाधार आणि लोकप्रियता असलेला नेता आहे. त्याचप्रमाणे भाजपकडे अमित शाह, योगी आदित्यनाथ, हिमंत बिस्वा सर्मा, देवेंद्र फडणवीस, अनुराग ठाकूर अशा नेत्यांची दुसरी फळी तयार आहे. त्या तुलनेत काँग्रेसकडे नेतृत्वाची पहिली फळीदेखील अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे खर्गे यांच्यापुढे खरे आव्हान हे राहुल गांधी यांची प्रतिमा तयार करण्याचे आहे.
 
 
 
त्यानंतर दुसरे आव्हान म्हणजे खर्गे यांना पक्षामध्ये विविध स्तरावर सक्षम नेते उभे करावे लागणार आहेत, प्रक्रियेमध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये अपरिहार्यपणे संघर्ष होणार. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधणे खर्गे यांना साध्य करावे लागेल. कारण, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2019 साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ‘राहुल ब्रिगेड’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तरुण नेत्यांनी पक्ष सोडण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद यांचा प्रमुख समावेश आहे.
 
 
 
तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे आव्हान म्हणजे नवे मतदान. तरुण नवे 30 वर्षांहूनही कमी वयाचे 52 टक्के मतदार हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण, हे मतदार अतिशय काळजीपूर्वक नेता निवडतात, अशा परिस्थितीमध्ये 80 वर्षीय खर्गे यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वास स्विकारार्हता मिळवून देण्यासाठी कुशल रणनीती आखावी लागणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारत, मध्य भारत, ईशान्य भारत, पश्चिम भारत यात जनाधार गमवत असलेल्या काँग्रेसला दक्षिण भारतामध्ये मजबूत करण्यासाठी खरगे यांना सज्ज व्हावे लागणार आहे. त्याचप्रमाणे तोंडावर आलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका, राजस्थानमधला गेहलोत- पायलट वाद, काश्मीरमध्ये भाजपचा वाढता प्रभाव, पक्षातील उर्वरित ज्येष्ठ नेत्यांची कधीही उफाळून येऊ शकणारी नाराजी आणि गांधी कुटुंबाच्या मनात किंतु निर्माण होऊ न देणे ही खरगे यांच्यापुढील ताजी आव्हाने आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0