उस्मानाबाद : "तानाजी सावंतांनी मराठ्यांबद्दल नीट बोलावं नाहीतर चौकात उगडा करुन मारु" अशा शब्दांत राज्याच्या विद्यमान आरोग्यमंत्र्याला धमकी दिली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ही धमकी दिली आहे. तानाजी सावंतांचा मुजोरीपणा उतरावालाच पाहिजे असेही सुरेश पाटील पुढे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या एका नेत्यासमोर ही अशी धमकी दिली गेली आहे, त्याने राज्याचे वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाबद्दल बोलत असताना सुरेश पाटील यांची जीभ घसरली. "एक माजलेला मंत्री मराठा समाजाबद्दल बेभान बोलतो, आरक्षण आताच आठवले का? मराठ्यांना माज आला का? असे म्हणतो" असे म्हणत पाटील यांनी सावंतांना लक्ष्य केले. पुढे तर चक्क धमकीच दिली. याचबरोबरीने त्यांनी उघडपणे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. तानाजी सावंतांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व पार्थ यांनीच करावे म्हणजे आपल्याला यश मिळेल असा दावाही सुरेश पाटील यांनी केला आहे.
यानिमित्ताने विरोधी पक्षातील लोकांबद्दल राष्ट्रवादीचे नेते किती खुनशी मानसिकता ठेवून असतात हेच दिसून आले आहे. तानाजी सावंत शिंदे गटाकडे गेल्याने याआधीही जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. आधी शिवसैनिक आणि आता राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या उठावाने महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचा राग अजूनही तसाच आहे हे ते सातत्याने उघड करत आहेत. हेच या घटनेतून दिसून येते.