अंधेरी पोटनिवडणूक : भाजपच्या भूमिकेवर राज ठाकरेंनी दिली मोठी प्रतिक्रिया!

17 Oct 2022 16:40:53
 
Devendra Fadnvis and Raj Thackeray
 
 

मुंबई :
अंधेरी पूर्व येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र भाजपने घेतलेल्या स्तुत्य भूमिकेमुळे सर्वच राजकीय पक्षांकडून भाजपचे कौतुक होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह विविध घटकांनी भाजपच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. 
 
 
देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, 'प्रिय मित्र देवेंद्रजी, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार मानतो.'
 
 
'चांगली - सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या प्रयत्नाला तुम्ही जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार' या शब्दांत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0