आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची नावे घोषित

17 Oct 2022 21:47:50
 
BMC - 17.10.2022
 
 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नावे जाहीर करण्यात आलेल्या शिक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. सोमवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 
 
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा दिनांक ०५ सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. त्या निमित्त ५ सप्टेंबर रोजी “आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने” महानगरपालिकेच्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते.सन २०२१-२२ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विना-अनुदानित प्राथमिक शाळांतील एकूण १०३ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
 
 
 
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या या ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये १० हजार , बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व फेटा देऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते लवकरच सन्मानित केले जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0