गावडे रुग्णालय प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारात!

मक्ता रद्द करण्याची स्थानिकांची मागणी

    16-Oct-2022
Total Views |
gawde


मुंबई
: विलेपार्लेच्या महात्मा गांधी मार्गावरील बाबासाहेब गावडे रुग्णालयाचा वाद आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला आहे. रुग्णालयात अनेक अनियमितता असून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सदानंद साटम यांनी केला असून रुग्णालयाचा मक्ता रद्द करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
 
तक्रारदार सदानंद साटम यांनी या संदर्भात नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून रुग्णालयाच्या बाबतीत आवश्यक तो योग्य निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
 
सदानंद साटम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे, वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी निश्चित दरापेक्षा अधिकची अवाजवी रक्कम आकारणे, जागेचा गैरवापर करणे, रुग्णांना दिली जाणारी अयोग्य वागणूक, अन्न पुरवठ्याच्या दर्जाची तपासणी करणे आणि मराठा मंदिर व बाबुराव परांजपे मेमोरिअल ट्रस्टकडून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमधील कथित अनियमितता असे अनेक गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात साटम यांनी केले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

महापालिका प्रशासनाने रुग्णालयाला ठोठावलेल्या दंडाची रक्कम अद्याप रुग्णालय प्रशासनाने भरलेली नाही. सदर प्रकरण गंभीर असून पार्लेकर रहिवाशांसाठी महत्त्वाचे आहेत. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महापालिका आयुक्तांना योग्य ते निर्देश देऊन सदर इस्पीतळाचा, दोन्ही संस्थांचा मक्ता रद्द करुन पालिकेने इस्पीतळ ताब्यात घ्यावे, अशा सुचना देण्यात याव्यात, अशी मागणी साटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.