सायबर संरक्षक शैलेश...

15 Oct 2022 10:17:35
शैलेश जारीया

 
 
‘सायबर क्राईम’पासून नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी आतापर्यंत दीड हजारांहून अधिक मोफत सेमिनार घेणार्यार आणि दीड कोटींहून अधिक नागरिकांना सायबर सुरक्षेविषयी जागृत करणाऱ्या सायबरतज्ज्ञ यांच्याविषयी.
 
 
गुजरातच्या जुनागढमध्ये जन्मलेल्या शैलेश जारीया यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण ओक स्कूलमध्ये झाले. शाळेत असताना ते वसतिगृहामध्ये राहत. आईवडील शेती करून कसेबसे घर चालवत. शाळेत शैलेश यांना नावीन्यपूर्ण गोष्ट तयार करण्याची आवड निर्माण झाली. पुढे ते मुंबईत काकांकडे राहायला आले. चेंबूरच्या ‘आचार्य कॉलेज’मधून त्यांनी २००२ साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली खरी, परंतु, शिक्षणात त्यांचे काही मन लागेना.
 
 
तसेच, घरच्या गरिबीमुळे आवश्यक तेवढे पैसेदेखील हाताशी नव्हते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण सोडल्यानंतर ते मित्रासोबत राहू लागले. पुढे त्यांनी बँकेमध्ये ‘लोन डिपार्टमेंट’मध्ये चार हजार पगारावर नोकरी केली. त्यानंतर २००२ साली त्यांनी ‘सेल्स मार्केटिंग’मध्ये ऑनलाईन डिप्लोमा केला. पुढे त्यांनी ‘एमबीए’देखील केले. स्वतःचा व्यवसाय करावा, या उद्देशाने त्यांनी २०११ साली ‘फायनान्स कन्सल्टन्सी’ सुरू केली. २०१२ साली एकदा त्यांच्या मित्राने त्यांना ‘हॅकिंग’ कसं करतात, हे सांगितले.
 
 
’हॅकिंग’पासून कसे वाचले पाहिजे, याचे धडे त्या मित्राने दिले. तसेच, पुढचे भविष्य ‘सायबरविश्व’च असल्याचे त्यांना सांगितले. शैलेश यांना ते खरे वाटले नाही. परंतु, त्या मित्राने त्यांचा ‘पासवर्ड’ ‘हॅक’ करून दाखवला. यामुळे शैलेश आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी ‘सायबर क्राईम’विषयी माहिती घेण्यास सुरूवात केली. या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने त्यांनी ‘एथिकल हॅकिंग’चे ऑनलाईन कोर्स केले.
 
 
अनेक सेमिनारला ते हजर राहू लागले. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अवघ्या काही महिन्यांत सगळे बारकावे शिकून घेतले. २०१२ साली त्यांनी सांताक्रुझला पहिला सेमिनार घेतला. ‘संदेश कॉलेज’ला त्यांनी एका आठवड्यात १३ सेमिनार्स घेतली. विशेष म्हणजे, शैलेश मोफत सेमिनार घेत होते. ‘सायबर सिक्युरिटी’ जागृतीसाठी लोक मोफत येत नाही, तर पैसे खर्च करणे दूरच, अशीस स्थिती त्यावेळी होती. हळूहळू शैलेश यांना अनेक ठिकाणी सेमिनारसाठी बोलावणे येऊ लागले. आतापर्यंत त्यांनी ‘सायबर क्राईम’विषयी दीड हजारांहून अधिक सेमिनार घेतले असून आतापर्यंत दीड कोटी लोकांपर्यंत त्यांनी ‘सायबर क्राईम आणि सिक्युरिटी’ याविषयी जनजागृती केली आहे. पुणे, नाशिक, अमरावतीसह परराज्यातदेखील त्यांनी सेमिनार घेतली आहेत. मनोहर पर्रिकर, राजनाथ सिंह, राकेश मारिया यांच्यासमोरदेखील त्यांनी ‘सायबर सिक्युरिटी’विषयी ’प्रेझेंटेशन’ दिले आहे.
 
 
मोबाईल तुमचे जगणे सोपे करतो. परंतु, ’हॅकर’ नेमके ‘हॅकिंग’ कसे करतो, हे शैलेश नेमकेपणाने सेमिनारमध्ये सांगतात. ‘सायबर क्राईम’ झाल्यानंतर त्यानंतर कोणती पावले उचलावीत, ५० प्रकारच्या ‘सायबर क्राईम’च्या प्रकारांची माहिती, सोशल मीडिया हाताळताना नेमकी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन सेमिनारमध्ये केले जाते.
 
 
सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे खरेतर पोलीस प्रशासनाचे काम आहे. परंतु, ते होत नाही. दरवर्षी अंदाजे लाखो-कोटींची फसवणूक होते. त्यामुळे लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराच्या नावानेही फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत. आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी आणि डेटा चोरी असे ‘हॅकिंग’चे तीन प्रकार आहेत. यात आर्थिक फसवणुकीचा प्रकार वाढला आहे. जेव्हा फसवणूक होते, तेव्हा लोक जागे होत असल्याची खंतही शैलेश व्यक्त करतात.
‘सायबर’ गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. इंटरनेटवर कोणतीही गोष्ट कधीही फुकट मिळत नाही, त्यामुळे तशी अपेक्षाही ठेऊ नका. ज्या गोष्टीत अडचणीत आणू शकतात त्याविषयी ‘सर्चिंग’ करू नका. ऑनलाईन ‘बँकिंग’ तसेच ‘युपीआय’चा वापर करत असाल, तर कधीही खात्यात गरज असेल तितकेच म्हणजे दहा हजारांपेक्षा कमी रक्कम ठेवावी. परिणामी, फसवणूक झाली तरी नुकसान कमी होते. ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’चा वापर करावा, असे शैलेश सांगतात.
 
 
लवकरच शैलेश ‘सायबर’ सुरक्षिततेविषयी माहिती देणारे युट्यूब चॅनेलदेखील सुरू करणार आहेत. तसेच, ’कॉर्पोरेट’ स्तरावर हे काम नेण्याचा त्यांचा विचार आहे. शासनाने आणि पोलिसांनी ‘सायबर सिक्युरिटी’विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंतीही ते करतात. विनीत जैन, विनोद काकरीया यांचे शैलेश यांना मोलाचे सहकार्य लाभते. आतापर्यंत शैलेश यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सायबर सुरक्षिततेच्या जनजागृती करण्यासाठी झटणार्यार शैलेश जारीया यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0