शिंदेंनी हिम्मत असेल तर बाळासाहेबांचं नाव वगळून पक्ष चालवावा!
11 Oct 2022 18:36:09
मुंबई : "एकनाथ शिंदे गटात जर हिम्मत असेल तर शिंदे गटाने बाळासाहेबांचं नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावे.", असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. ते म्हणाले, "ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालेले आहे. आता एकनाथ शिंदे गट हा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची शिवसेना आणि चिन्ह मागत आहे. आमची त्यांना नम्र विनंती आहे की, बाळासाहेब ठाकरेंचे नाव वगळून, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नावाने चिन्हे आणि नावे मागा," अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदेंवर केली.
ते म्हणाले, "जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे तिथे लोकांचा जनाधार मिळेल. लोकांच रक्त सळसळून उठेल. त्यांनाच जनतेचा पाठींबा मिळेल. सध्याच्या निवडणूकीपूरता हा निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मशाल हे चिन्ह क्रांतीचे प्रतिक आहे. त्यामुळे हे चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. एकनाथ शिंदे गटाची अंधेरी पोटनिवडणूकीत तारांबळ उडणार आहे हे जवळपास निश्चित आहे.", असेही मिटकरी म्हणाले. तसेच मित्र पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गटाला आमचा पाठींबा असल्याचेही मिटकरी म्हणाले.