मानसिक आजारांवर हवी जनजागृती

11 Oct 2022 11:29:25
 
Mental illness
 
 
 
 
मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक तोडण्यासाठी आणि सामाजिक भेदभाव टाळण्यासाठी आपण स्वतःला आणि इतरांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षित केले पाहिजे. आपली भाषा एक प्रकारे त्यांच्यासाठी पोषक बनविली पाहिजे. त्यांचे नैतिक खच्चीकरण ना होता, त्यांचे आत्मिक बळ वाढविणे या मानसिक रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सांत्वनदायक आहे, आणि एकूणच इतरांनाही ते पोषक समर्थन देते.
 
 
 
मानसिक समस्येबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी दि. 10 ऑक्टोबर रोजी ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणजेच ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जात आहे. या वर्षी (2022) जागतिक मानसिक आरोग्य दिन ’मानसिक आरोग्य आणि सुस्वास्थ्य हे सर्वांसाठी जागतिक अग्रक्रमाची बाब बनवा’ या थीमसह जगभरात साजरा केला गेला.
 
 
गेल्या अडीच वर्षांत ‘कोविड-19’ साथीच्या आजाराने मानसिक आरोग्यासाठी जागतिक संकट निर्माण झाले आहे. ज्यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन तणाव निर्माण झाला. लाखो लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले. अंदाजानुसार, साथीच्या आजाराच्या पहिल्या वर्षात चिंता आणि नैराशाच्या विकारांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्याचवेळी, आलगाव, सामाजिक अंतर यांसारख्या उपायामुळे मानसिक आरोग्यसेवा गंभीरपणे विस्कळीत झाल्या होत्या आणि मानसिक आरोग्य स्थितींसाठी उपचारांची संख्यादेखील वाढली आहे. आत्महत्येच्या कल्पना अनुभवणार्‍या लोकांचे प्रमाण केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर वाढत आहे आणि मानसिक आरोग्याचा अनुभव असलेले लोक, त्यांची कुटुंबे आणि इतर लोकसंख्या हेच दर्शविते की, त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहणे, यासाठी सरकार, नेहमीच मोठ्या प्रमाणावर आघाडीवर नसते. तथापि, प्रतिबंधात्मक मानसिक आरोग्यासाठी कार्य करणे व याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आपण सर्वजण आपली भूमिका बजावू शकतो.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार, वाढती सामाजिक आणि आर्थिक असमानता, प्रदीर्घ संघर्ष, हिंसाचार आणि सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा संपूर्ण लोकसंख्येवर परिणाम होतो, ज्यामुळे लोकांच्या मानसिक कल्याणासाठी हवी असलेली सर्वांगीण प्रगती धोक्यात येते. 2021 मध्ये जगभरातील तब्बल 84 दशलक्ष लोकांना बळजबरीने विस्थापित करण्यात आले. आपण मानसिक आरोग्य सेवेला बळकट केले पाहिजे, जेणेकरुन मानसिक आरोग्याच्या गरजांचा संपूर्ण ‘स्पेक्ट्रम’ सर्वसामान्य आणि गरीब लोकांना मिळू शकणार्‍या, परवडणार्‍या आणि दर्जेदार सेवांमधून त्यांना मिळणे आवश्यक आहे.
 
 
सामाजिक कलंक आणि भेदभाव हे सामाजिक पातळीवर लोकांना मानसिक आरोग्याच्या योग्य सेवा आणि काळजी मिळण्यासाठी अडथळा आणत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक मानसिक आरोग्यसेवा जास्तीत जास्त लोकांना मदत पुरवू शकतात, याबद्दल जागरूकता वाढविण्यात आपण सर्वजण आपली भूमिका बजावू शकतो आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ही सर्वांनी एकत्रितपणे करण्याची संधी आहे. आपण अशा सुंदर जगाची कल्पना नेहमीच करतो, ज्यामध्ये मानसिक आरोग्याचे सामाजिक मूल्य वाढेल, प्रोत्साहन मिळेल आणि त्याचे संरक्षण केले जाईल. आपण अशा जगाची स्वप्ने पाहतो, जिथे प्रत्येकाला मानसिक आरोग्याचा आनंद घेण्याची आणि त्यांच्या मानवी हक्कांचा वापर करण्याची समान संधी आहे आणि जिथे प्रत्येकजण त्यांना आवश्यक असलेल्या मानसिक आरोग्यसेवेत लाभ घेऊ शकतो. आपल्या मानसिक आरोग्याचा आपण कसे विचार करतो, अनुभवतो आणि कसे वागतो, यावर थेट परिणाम होत असतो. शिवाय त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही अत्यंत परिणाम होतो.
 
 
आपली कार्यसंस्कृती आणि अवतीभोवतीचे वातावरण आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते. त्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण सहज संवादी साधण्यासाठी मोकळे आणि कोणालाही त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मदत मागता येणे सुलभ व्हावे, अशा पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.
 
 
सामान्य मानसिक आरोग्य कलंकांमध्ये अनेक घटक समाविष्ट आहेत. परंतु, ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत.
 
 
सामाजिक कलंक
 
 
सोशल माध्यमांमध्ये, आपल्या संस्कृतींमध्ये आणि समाजात अनेक सामाजिक कलंक पाळले जातात. यांचा खालीलप्रमाणे समावेश होऊ शकतो. मानसिक आजार असलेल्यांचे हिंसक, आक्रमक कमकुवत, मूर्ख, अक्षम असे वर्गीकरण करणारे गैरसमज त्यांच्या भाषेत दिसून येतात. त्यांचे आत्मनियंत्रण कमी झालेले असल्याने ते दुसर्‍याला इजा करू शकतील, असे समाजात पसरविल्याने बर्‍याच वेळा या लोकांवर हिंसक अत्याचार केले जातात.
 
  
स्वत:ला कलंक लावणे
 
 
जर आपल्या समाजाकडून आपण मानसिकदृष्ट्या आजारी आहोत म्हणजे आपण हिंसक किंवा नालायक आहोत, असे आपल्याला वारंवार सांगितले जाते, तर अखेरीस आपण स्वतःबद्दल त्या गोष्टींवर नकळत विश्वास ठेवू लागतो. याचा भयानक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. आपला स्वतःचा स्वाभिमान आणि मदत घेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
 
 
संस्थात्मक कलंक
 
 
आम्ही सामाजिक समस्या संबोधित करण्यासाठी तयार केलेली अनेक धोरणे आणि संस्थात्मक पद्धती, त्या संस्थेत कलंक वाढवू शकतात, कमी करू शकतात किंवा अवरोधित करू शकतात. काही लोकांना नोकरीत घेतले जात नाही, काहींना काढून टाकले जाते. काहींचा तिरस्कार केला जातो. काहींची खिल्ली उडवली जाते.
 
 
कलंक आणि सामाजिक भेदभाव आपले मानसिक आरोग्य आणखी बिघडवू शकतात. हे कलंक आपल्याला हताश करू शकतात, जेरीस आणतात. मानसिक आजार असलेल्यांना समाजापासून अलिप्त वाटू शकते. लोकांबद्दल संशयास्पद वाटल्यामुळे सामान्यपणे त्यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे हे रुग्ण सामाजिक आधार मिळविण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान होते. अनेक सामाजिक संधी त्यांच्या हातून निसटून जातात
 
 
हे मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक तोडण्यासाठी आणि सामाजिक भेदभाव टाळण्यासाठी आपण स्वतःला आणि इतरांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षित केले पाहिजे. आपली भाषा एक प्रकारे त्यांच्यासाठी पोषक बनविली पाहिजे. त्यांचे नैतिक खच्चीकरण ना होता, त्यांचे आत्मिक बळ वाढविणे या मानसिक रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सांत्वनदायक आहे, आणि एकूणच इतरांनाही ते पोषक समर्थन देते. शास्त्रीय दृष्टिकोनातून कलंक आणि सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी आपले वैयक्तिक ज्ञान, कौशल्ये आणि वागणूक या मानसिक रोगाच्या अनुषंगाने बळकट करणे, समाविष्ट आहे.
 
 
या संबंधित काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे,
आपण मानसिक आजारासाठी जी भाषा वापरतो, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणे आवश्यक आहे.
लवकरात लवकर उपचार आणि मदत घेणे. पुराव्यावर आधारित मनोसामाजिक आधार मिळवणे.
मानसिक समस्या असलेल्या सहकार्‍यांना अडचणी येत असताना त्यांचे मोकळेपणाने ऐकणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे.
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0