‘कोव्हॅक्सिन’विषयी फेक न्यूज पसरविणाऱ्या प्रसारमाध्यमांना ‘भारत बायोटेक’चा दणका

द वायर, टाइम्स ऑफ इंडिया, डेक्कन हेराल्ड आणि मनीकंट्रोलचा खोटेपणा पकडला

    दिनांक  09-Jan-2022 12:19:55
|
fn


खोट्या वार्तांकनाचा बुरखा फाटला
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : वैद्यकीय, विज्ञान, लस, औषधे, सार्वजनिक आरोग्य आदी विषयांवर वार्तांकन करताना त्यास शास्त्रीय माहिती व आकडेवारीचा आधार असावा. त्यास राजकीय, आर्थिक आणि वैचारिक मुलामा देऊन फेक न्यूज पसरविणे योग्य नाही, अशा शब्दात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनविषयी फेक न्यूज पसरविणाऱ्या ‘द वायर’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘डेक्कन हेराल्ड’ आणि ‘मनीकंट्रोल’ या प्रसारमाध्यमांना दणका दिला आहे.
 
 
करोना महामारीमध्ये भारताला लक्ष्य करण्याची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांची जुनी सवय उफाळून आली आहे. मात्र, दुर्दैवाने काही भारतीय प्रसारमाध्यमेही त्यांच्या नादी लागून भारताचे करोना संसर्गाचे व्यवस्थापन, उपचारपद्धती, औषधोपचार आणि लस यांची खिल्ली उडविण्यात आघाडीवर आहेत. करोनावरील स्वदेशी लस – ‘कोव्हॅक्सिन’ विकसित करणाऱ्या ‘भारत बायोटेक’ने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अशा प्रसारमाध्यमांना उघडे पाडले आहे.
 
 
कोव्हॅक्सिनविषयी सातत्याने नकारात्मक, चुकीचे आणि खोट्या माहितीवर आधारित वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांमध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘डेक्कन हेराल्ड’, ‘मनीकंट्रोल’ आणि सातत्याने हिंदूविरोधी अजेंडा राबविणाऱ्या ‘द वायर’ या कथित प्रसारमाध्यमाचा समावेश आहे. भारत बायोटेकने त्याविषयी सविस्तर निवेदन प्रकाशित करून या प्रसारमाध्यमांचा खोटेपणा उघडकीस आणला आहे.

bbb 
 
 
द वायरचा खोटेपणा
 
 
‘द वायर’मध्ये २९ डिसेंबर, २०२१ रोजी प्रकाशित एका अहवालामध्ये कोव्हॅक्सिनद्वारे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती याविषयी कोणत्याही प्रकारची आकेडवारी अथवा विश्लेषण उपलब्ध नसल्याचे साथरोगतज्ज्ञांचे मत आहे. नेहमीप्रमाणे संबंधित साथरोगतज्ज्ञ कोण, त्याचे नाव – गाव याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती ‘द वायर’ने दिली नाही.
 
मात्र, ‘भारत बायोटेक’ने त्याविषयी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. त्यानुसार, लसीपासून किती प्रतिकारशक्ती निर्माण होते यासंबंधीचे अहवाल २०२० आणि २०२१ सालामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय बुस्टर मात्रेची आकडेवारीदेखील उपलब्ध असून ती संबंधित नियामक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली आहे.
 
 
मनीकंट्रोलच्या खोटेपणावर हवा कंट्रोल
 
 
‘मनी कंट्रोल’ने २९ डिसेंबर, २०२१ रोजीच्या लेखामध्ये १५ ते १८ वयोगटातील सुमारे १० कोटी भारतीयांना लस पुरविण्याची ‘भारत बायोटेक’ची क्षमता संशयास्पद असल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे लसनिर्मिती क्षमता वाढविण्यात कंपनीस अपयश येत असल्याचा आणि लसीची चाचण्या केवळ १८ वर्षांच्या पुढील वयोगटावरच केली असल्याचा दावा केला होता.
 
‘भारत बायोटेक’ने प्रत्युत्तरात म्हटले, त्यांनी लसीकरण मोहिमेच्या गेल्या ११ महिन्यांत करोडो डोस दिले आहेत आणि १५ ते १८ वयोगटातील लसीकरण मोहीम देखील यशस्वी करण्याची क्षमता भारत बायोटेकमध्ये आहे. त्याचप्रमाणे ‘भारत बायोटेक’ने सांगितले की ते ३ कंपन्यांसोबत तंत्रज्ञान हस्तांतरण प्रकल्प करत असून त्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे २ ते १८ वयोगटातील कोवॅक्सिनची चाचणी केली असल्याचेही ‘भारत बायोटेक’ने स्पष्ट केले.
 
 
bb 
 
 
टाइम्स ऑफ इंडिया
 
 
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २५ डिसेंबर, २०२१ रोजीच्या लेखात बंगळुरू येथील खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिनच्या ५.५ लाखांहून अधिक मात्र असल्याचा त्यांची एक्स्पायरी नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये होत असल्याचा दावा केला होता.
त्यावर, उपलब्ध आकडेवारीनुसार एक्स्पायरी झालेल्या मात्रांची संख्या १ लाखांहून कमी असल्याचे ‘भारत बायोटेक’ने स्पष्ट केले.
 
 
डेक्कन हेराल्ड
 
 
‘डेक्कन हेराल्ड’ने ५ जानेवारी, २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या लेखामध्ये मानवी चाचण्यांच्या घेण्यात आलेल्या अल्प नमुन्यांमुळे पालकांच्या मनात भिती निर्माण झाल्याची दावा केला होता. त्याचप्रमाणे शेल्फ लाइफविषयी प्रश्नचिन्ह असल्याचा आणि बंगळुरूमध्ये सहा लाख ‘एक्स्पायर्ड – लेबल’ मात्रांपैकी ९० टक्के मात्र कंपनीने परत घेतल्याचा दावा केला होता.
 
हा सर्व खोटेपणादेखील ‘भारत बायोटेक’ ने खोडून काढला. त्यानुसार, आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लोकांवर क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत आणि त्यांचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरील पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाले असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शेल्फ लाइफचा डेटा सादर केल्यानंतर सीडीएससीओने अत्यंत पारदर्शक पद्धतीने शेल्फ लाइफची मुदतवाढ दिली असल्याचेही स्ष्ट करण्यात आले.
  
प्रसारमाध्यमांनी जबाबदार वार्तांकन करावे
 
 
 
 
‘भारत बायोटेक’ने म्हटले आहे की प्रसारमाध्यमांद्वारे पसरवल्या जाणार्यास खोट्या बातम्यांची ही केवळ उदाहरणे आहेत. अनेक लोकांनी लस आणि कंपनीबद्दल खोटा प्रचार केला असून अशा बनावट दाव्यांविषयी सत्यता नेहमीच पुढे आणली जात राहणार आहे. मात्र, वार्तांकन करताना माध्यम संस्थांनी जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. औषध, विज्ञान, लस यासारख्या गोष्टींवरील लेख वैज्ञानिक तथ्ये आणि आकडेवारीवर आधारित असले पाहिजेत. त्यामध्ये वैचारिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरून विचार नसावा, असाही सल्ला ‘भारत बायोटेक’ने दिला आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.