आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घाला; कझाकिस्तान सरकारचे आदेश

08 Jan 2022 14:36:37

Kazha
नवी दिल्ली : कझाकिस्तानमध्ये इंधनदरवाढी विरोधातील विरोधकांच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले. यानंतर देशात अराजकता पसरली आहे. त्यामुळे सरकारही आता आक्रमक झाले आहे. कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम जोमार्ट तोकायेव यांनी आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जगभरातून आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
कझाकिस्तानमध्ये इंधनाच्या किंमती जवळपास दुप्पट केल्यामुळे देशात आंदोलन पेटले आहे. हजारो लोक लाठ्याकाठय़ा आणि ढालीसारखी साधने घेऊन रस्त्यावर उतरली आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून, यात आतापर्यंत २६ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ पोलिसांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात हजार लोकांना ताब्यात घेतले आहे.
 
 
दरम्यान, तोकायेव यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. ‘खूनी आणि गुंडांबरोबर काय चर्चा करणार?,’ असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सुरक्षा दलांना त्रास झाल्यास कोणतीही चेतावणी न देता त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0