मंदिरं शरणं गच्छामि...

08 Jan 2022 22:03:00

temple 13.jpg
आपल्या भारतीय संस्कृतीच्या सुवर्ण साक्षीदारांपैकी एक आहेत आपली मंदिरे. प्रत्येक राज्यांमधील संस्कृतीचे समृद्धत्व, ऐतिहासिकत्व ही मंदिरे सांगतात. मागील काही दिवसांमध्ये मला आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरे अनुभवण्याचा योग आला. आजच्या भागात केवळ विशाखापट्टणममधील काही मंदिरांविषयी...


सिंहाचलम मंदिर



आंध्र प्रदेशमधील मंदिरदर्शनाची सुरुवात विशाखापट्टणममधील सिंहाचलम मंदिराकडून करुया. आंध्र प्रदेशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपतीनंतर सिंहाचलम मंदिर द्वितीय क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे. श्री वराहलक्ष्मी नरसिंह मंदिर, सिंहाचलम विशाखापट्टणम येथील अत्यंत प्राचीन मंदिर सिंहाचलम टेकडीवर वसलेले आहे. हे विष्णू मंदिर असून या मंदिरात भगवान विष्णूंची वराह नरसिंह रुपात पूजा केली जाते.सिंहाचलम मंदिर आंध्र प्रदेशातील नरसिंहांच्या अनेक मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. मध्ययुगीन काळामध्ये सिंहाचलम मंदिर वैष्णव संप्रदायाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जात असे. या मंदिराची प्राचीनता या मंदिरातील शिलालेखावरून समजते. या मंदिरातील सर्वात जुना शिलालेख अकराव्या शतकातील आहे. या शिलालेखात चौल राजा कुलोत्तुंगाच्या काळातील एका सदिच्छा भेटीचा उल्लेख आहे. तेराव्या शतकामध्ये काही राजवटी तसेच द्वैत तत्त्वचिंतकांच्या अधिपत्याखाली येऊन हे मंदिर वैष्णव धर्माचे एक आध्यात्मिक तसेच शैक्षणिक केंद्र झाले.


या मंदिराला अनेक राजघराण्यांनी संरक्षण दिलेले आहे, त्याचे उल्लेख तेथील शिलालेखांमध्ये आढळतात, ज्यापैकी एक आहे विजयनगर साम्राज्यातील तुलुवा राजघराणे. या राजघराण्याने सिंहाचलम मंदिराचे अधिकृत संस्थानामध्ये रुपांतर केले.सिंहाचलम मंदिराची रचना विलोभनीय आहे. उंच टेकडीवर, साधारण समुद्रसपाटीवरून ३०० मीटर उंचीवर हे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर तीन अंगणे आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराची वास्तुकला तसेच स्थापत्यकला मिश्र पद्धतीची आहे. यामध्ये कलिंग, चालुक्य, काकतीय आणि चौल यांच्या वास्तुकलांचे मिश्रण आढळते. या मंदिराचे मुख पूर्वाभिमुख नसून पश्चिमाभिमुख आहे. तेथील मान्यतेनुसार विजयाचे प्रतीक असल्याने हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. या मंदिराजवळ स्वामी पुष्करिणी आणि टेकडीच्या पायथ्याशी गंगाधर अशी दोन मंदिरे आहेत. सिंहाचलम मंदिरामध्ये अनेक उप-देवस्थाने आणि काही मंगल मंडप आहेत. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे वैष्णव मंदिर आहेच, पण या मंदिराच्या अनेक चालीरिती, प्रथा-परंपरा या महान वैष्णव तत्त्वज्ञानी तथा विशिष्टाद्वैती राजानुजाचार्य यांनी निश्चित केलेल्या आहेत. वैष्णव पंथीयांच्या ‘पंचरात्र आगम’च्या अनेक ग्रंथांपैकी ‘सत्त्वत’ संहितेच्या परंपरांवर या मंदिराच्या प्रथा आधारित आहेत.




सिंहाचलम मंदिराला सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास आहे. हे मंदिर जणू शिलालेखांचा खजिना आहे. या मंदिरात आढळणार्‍या शिलालेखांमधून या मंदिराचा इतिहास आणि श्रीमंती समजते. या मंदिराच्या परिसरात सुमारे ५०० शिलालेख सापडले आहेत. यातील बरेचसे शिलालेख दानधर्म तसेच राजे-महाराजांनी दिलेल्या योगदानासंदर्भात आहेत. बरेचसे शिलालेख संस्कृत, तेलुगू, उडिया, तामिळ भाषांमध्ये आहेत. चौल राजवंशानंतर पूर्वगंगा राजवंशाने या मंदिराचा विस्तार केला. त्यासंदर्भातील पुरावे येथील शिलालेखांमधून आढळतात. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात नरसिंहदेव राजाने मंदिराच्या स्थापत्यरचनेत आमूलाग्र बदल केले. नवीन गंगाद्वारे, उपदेवस्थाने तसेच गोपुरे यांचा समावेश करून या मंदिराचा त्याने विस्तार केला. काही शिलालेखांमध्ये रेड्डी घराण्याच्या राजांनी जमिनी, सुवर्णालंकार आणि गावे या देवस्थानला दान केल्याची नोंद आहे. पूर्वगंगाच्या सत्तापतनानंतर गजपती राजघराणे सत्तेवर आले. सिंहाचलम मंदिरात आढळणार्‍या उडिया भाषेत लिहिलेल्या नऊ शिलालेखांमध्ये कपिलेंद्रदेव, पुरुषोत्तम देवा आणि प्रतापरुद्र देवा यांनी मंदिराकरिता दिलेल्या योगदानाची नोंद आहे. कलिंग प्रदेशात आपल्या लष्करी मोहिमेदरम्यान कृष्णदेवरायाने सिंहाचलम येथे ‘जयस्तंभ’ (विजयाचा स्तंभ) उभारला. तोही आपल्याला येथे पाहता येतो.या मंदिरात साजरे होणारे ‘चंदनोत्सव’, ‘कामदहन’ आणि ‘कल्याणोत्सव’ हे खास बघण्यासारखे असतात. मंदिराचे वैभव या उत्सवांतून दिसून येते.




“कसे जाल?

विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध शहर आहे. येथे जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच रस्त्याद्वारे व रेल्वेनेही जाता येते. सिंहाचलम मंदिर विशाखापट्टणम शहरापासून साधरण २० किमी अंतरावर आहे. ‘इस्कॉन’ मंदिर विशाखापट्टणम विमानतळापासून 20 किमी अंतरावरच आहे. सागरी महामार्गाने या मंदिराकडे पोहोचता येते. येथे अ‍ॅपआधारित टॅक्सी तसेच खासगी टॅक्सी सुविधाही आहेत. ‘विझाग टुरिझम’ (तळूरस) द्वारेही विशाखापट्टणममधील प्रसिद्ध मंदिरांची सैर करता येते. येथील मंदिरांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करावी लागते. तसेच देवदर्शनाच्याही वेळा मर्यादित आहेत. त्यामुळे दर्शनाला जाण्याआधी वेळा आणि वेशभूषा यांची माहिती घेऊन जावे. ”



श्री कनक महालक्ष्मी मंदिर




सिंहाचलम मंदिराच्या भव्यतेनंतर खास बघण्यासारखे विशाखापट्टणम शहरातील मंदिर म्हणजे श्री कनक महालक्ष्मी मंदिर. अत्यंत शांत, प्रसन्न वातावरणाची अनामिक अनुभूती या मंदिरात येते. स्थलपुराणामध्ये कनक महालक्ष्मीविषयी आपल्याला आख्यायिका वाचायला मिळतात. एका आख्यायिकेनुसार तत्कालीन राजांच्या किल्ल्याजवळ असलेल्या विहिरीत ‘अम्मावरी’ म्हणजे श्री कनक महालक्ष्मीची मूर्ती आढळली. त्या राजांनी ती मूर्ती रस्त्याच्या मध्यभागी स्थापित केली. परंतु, नंतरच्या काळात सरकारने रस्ता रुंदीकरणाकरिता ही मूर्ती मूळ स्थानापासून दुसर्‍या जागी स्थापित केली. या घटनेनंतर म्हणजे १९१७ मध्ये विशाखापट्टणम शहराला ‘प्लेग’च्या आजाराने ग्रासले. बरेच लोक मृत्युमुखी पडू लागले. एकंदर ही स्थिती पाहून काही जुन्या जाणत्या लोकांच्या लक्षात आले की, श्री कनक महालक्ष्मीची मूर्ती स्थलांतरित केल्यामुळे हे घडले आहे. त्यांनी ही मूर्ती मूळ जागी पुनर्स्थापित केली.



 
श्री लक्ष्मीचा कनक महालक्ष्मी हा अवतार मानला जातो. दाक्षिणात्य काही राजांची ही कुलदेवताही होती. त्यातील एक म्हणजे राजा विशाखापट्टणम. येथील लोक श्री कनक महालक्ष्मीला ‘अम्मावरी’ असे म्हणतात. हे मंदिर फार प्राचीन नाही. २०१३ मध्ये या मंदिरामध्ये राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमान यांचेही मंदिर बांधण्यात आले. श्री कनक महालक्ष्मी मंदिराचे स्थापत्य आधुनिक रचनात्मक पद्धतीने केलेले आहे. गोपद्मे, गर्भगृहावरील ‘विमान’(उंच कळस) आकर्षक रंगांनी कोरीव रचनेमध्ये साकारला आहे.
श्री संपत विनयागर मंदिरविशाखापट्टणममधील वर्दळीच्या भागात श्री संपत विनयागर मंदिर एक लोकप्रिय मंदिर आहे. पवित्र आणि आश्वासक अनुभूती या मंदिरातील श्री गणेशाच्या दर्शनाने मिळते. येथे काळ्या संगमरवरामध्ये श्री गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.आंध्र प्रदेशमधील इतर मंदिरांच्या भव्यदिव्यतेसमोर कदाचित हे मंदिर कमी पडत असेल, तरीही अनेक भाविक कोणतीही नवीन सुरुवात असो, नवीन गाडी, नवीन घरासाठी श्रीफळ वाढवणे असो, अगदी परीक्षेत उत्तम गुण मिळावेत म्हणूनही विद्यार्थी या मंदिरात दर्शनाला येतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा जरी हे मंदिर नमुना नसले तरी भावभक्तीने हे समृद्ध आहे. जे श्रद्धेने श्री गणेशाची आराधना करतात, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा श्री संपत विनयागर पूर्ण करतो.



 
१९६२ मध्ये, श्री संपत विनयागर मंदिराचा पाया रचला गेला. नंतर वर्षभराच्या कालावधीत हे मंदिर उभे राहिले. हे मंदिर पूर्णत: बंधनमुक्त आहे. कोणीही, कधीही, केव्हाही या मंदिरामध्ये पूजा-दर्शनासाठी येऊ शकतो. श्री संपत विनयागराच्या दर्शनाने वास्तुदोष आणि सांपत्तिक दोष नाहीसे होतात, अशी येथील लोकांचा श्रद्धा आहे.श्री संपत विनयागराच्या दर्शनाने अनेक लोकांना दैवी अनुभव आलेले आहे. मासे घेऊन बाजारात जाण्याआधी कायम या मंदिरात दर्शनाला येतो, असे येथील अनेक स्थानिक मच्छीमारांनी सांगितले आहे. त्यातून त्यांना कायमच चांगले अनुभव, कल्याणकारी अनुभूती येते. येथील स्थानिक लोकांना अनेक चमत्कारिक दैवी अनुभूती आल्या आहेत. त्यामुळे अगदी डामडौल, श्रीमंत नसले तरी साधारण दोन-तीन लाख पर्यटक दरवर्षी या मंदिराला भेट देतात. मध्यंतरीच्या काळात चंद्रशेखरन सरस्वती यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तथापि, १९७१ मध्ये त्या वेळी पूर्व नौदल कमांडचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या अ‍ॅडमिरल कृष्णन यांनी शहराला पाकिस्तानी हल्ल्यापासून वाचवण्यासाठी श्री संपत विनयागर गणपतीसमोर १००१ नारळ वाढवले होते. त्यानंतर हे मंदिर अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आले. १९७१ मध्येच पाकिस्तानी पाणबुडी ‘गाझी’ भारतावर हल्ला करण्याआधी पाण्यात बुडाली आणि विशाखापट्टणम शहरावरील संकट टळले. तेव्हापासून मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे म्हणून हे मंदिर नावारुपाला आले.


 
इस्कॉन मंदिर
 
विशाखापट्टणम या सुंदर शहराची ‘इस्कॉन’ मंदिर अधिकच शान वाढवते. २००५ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. विशाखापट्टणम किनार्‍यापासून थोड्याशा दूर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हिरव्यागार टेकड्यांमध्ये ‘इस्कॉन’ मंदिर वसलेले आहे. मंदिरामधील शांतता, समोर बंगालचा उपसागर आणि निसर्ग यामुळे हे मंदिर अधिकच भावते. प्रशस्त सभामंडपात राधा-दामोदर आणि जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा या देवतांची प्रतिष्ठापना केलेली आहे. शेजारीच प्रसाद हॉल (भोजनालय), अन्नदानासाठी स्वयंपाकघर, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, दवाखाना आणि आश्रम यांच्या वास्तू आहेत. तसेच ‘इस्कॉन’चे अतिथीगृह आहे. तेथेच बाजूला गोशाळा असून त्यात तब्बल ६४ गाई-वासरे आहेत. या मंदिरातील शांतता आणि समोर श्रीकृष्णाचे मनोहारी रूप आपल्याला अंतर्मुख करते. या मंदिरात विविध उत्सव असतातच, तसेच दर रविवारी सर्वांसाठी स्वादिष्ट जेवणही असते, जे कधीही चुकवू नये. विशाखापट्टणमच्या एक दिवसीय पर्यटनामध्ये ही चार मंदिरे सहज बघून होऊ शकतात. अर्थात, सिंहाचलमची भव्यता नेत्रदीपक असल्याने तिथे अधिक वेळ देऊन नंतर श्री कनक महालक्ष्मी आणि श्री संपत विनयागर मंदिरांचे दर्शन घ्यावे. रम्य संध्याकाळ ‘इस्कॉन’ मंदिरामध्ये घालवावी.... आणि जीवाचे विशाखापट्टणम करावे...
 
(क्रमश:)


- वसुमती करंदीकर





Powered By Sangraha 9.0