सूर्यनमस्कार धार्मिक नव्हे वैश्विक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022
Total Views |

AIM





कट्टरपंथी मुस्लिमांना सूर्याला ईश्वर मानायचे नसेल तर तेही ठीक, पण ते १२ आसनांचा व्यायाम तर करु शकतातच ना? की सूर्यनमस्कारासारखी व्यायामाची सर्वंकष पद्धती हिंदूंनी शोधल्याने ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ त्यालाही विरोधच करत राहणार? पण, खरे म्हणजे सूर्यनमस्कारातील १२ आसने वैश्विक व्यायाम प्रकार आहे, त्याचा धार्मिक आधारावर विरोध होऊच शकत नाही.



सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची पूजा करणे असून, इस्लाममध्ये ते मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये मुस्लीम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होऊ नये,” असा फतवा नुकताच ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने जारी केला. त्यालाच उत्तर देताना, “फर्जी फतवा फॅक्टरीने आणखी एक फुलबाजी लावली आहे. या लोकांना सूर्याविषयी अ‍ॅलर्जी आहे की नमस्काराविषयी, याचे उत्तर त्यांची बोथट बुद्धीच देऊ शकेल. मात्र, सूर्य आणि नमस्कार ऊर्जा प्रदान करणारे आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे,” अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्यकमंत्रीमुख्तार अब्बास नक्वी यांनी घणाघात केला.



नक्वी यांच्या प्रत्युत्तरातून देशाचे राजकारण योग्य वळणावर असल्याचेच स्पष्ट होते. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील विद्यमान केंद्र सरकारच्या आधी अपवाद वगळता ७० वर्षांपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती. त्यातल्या प्रत्येकानेच स्वतःला धर्मनिरपेक्ष दाखवण्यासाठी आणि एकगठ्ठा मतपेटी जपण्यासाठी मुस्लीम लांगूलचालनाचाच मार्ग पत्करला. परिणामी, संविधानातील समान नागरी कायद्यापासून मुस्लीम महिलांना अधिकार देणारे कायदेही मागेच राहिले.



१९८६ सालच्या शाहबानो प्रकरणात तर राजीव गांधींच्या सरकारने काळाची चक्रे शेकडो वर्षे मागे फिरवण्याचे कृत्य केले, तर आज मुलींचे विवाहाचे वय २१ करण्यालाही मुस्लीम प्रेमापायी काँग्रेसच विरोध करताना दिसते. पण, आपण मुस्लीम तुष्टीकरणापेक्षाही समाजाच्या आणि देशाच्या हिताला प्राधान्य देत असल्याचे नरेंद्र मोदींनी आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले आहे. त्यानुसारच केंद्र सरकारमधील विविध विभागही काम करत असून, अल्पसंख्यकमंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’वर केलेला हल्लाबोल आपले सरकार मुस्लीम लांगूलचालनाला महत्त्व देत नाही, हे सांगणाराच; अन्यथा इथे काँग्रेसचे सरकार असते तर? एक तर त्यांनी सूर्यनमस्कार विषयक कार्यक्रमाचा निर्णयच घेतला नसता.


तरीही यदाकदाचित सद्बुद्धी जागृत होऊन तसा काही निर्णय घेतला असता व त्याला ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने विरोध केला असता, तर थेट पंतप्रधानांपासून काँग्रेसाध्यक्षापर्यंत प्रत्येकाने मुल्ला-मौलवींसमोर माना झुकवून ‘हुकूम मेरे आका’ म्हणत निर्णय फिरवला असता. पण, आता तसे होणार नाही. त्यामुळे मुस्लीम समुदायानेही कट्टरतेच्या जोखडात अडकलेल्या ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’च्या मागे फरफटत जाण्यापेक्षा जे आपल्या हिताचे, मग तो सूर्यनमस्कारही का असेना, स्वीकारणेच उत्तम!


दरम्यान, ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने सूर्यनमस्काराला विरोध केला तो धार्मिक आधारावर. ‘सूर्याला हिंदू धर्मात ईश्वर मानलेले आहे व सूर्यनमस्कार म्हणजेच त्या ईश्वराचे पूजन, पण अल्लाहशिवाय अन्य कोणीही पूज्य नाही, हे इस्लामचे मूलभूत तत्त्व आहे, त्यामुळे आमचा सूर्यनमस्काराला विरोध आहे,’ अशी ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ची भूमिका आहे. मात्र, सूर्यनमस्काराला धार्मिक आधार आहे तो नैतिक बंधनाचा. सूर्यनमस्कारात एकूण १२ आसने असून ती व्यक्तीने दररोज करणे अपेक्षित आहे. पण, व्यक्ती तसे करत नसेल, तर ती आसने करावीत म्हणून सूर्याशी-ईश्वराशी त्याचा संबंध लावलेला आहे. मुख्य कृती व्यायामाचीच आहे.



व्यायाम भूतकाळाप्रमाणेच आजच्या घडीलाही प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक भाग झालेला आहे. त्यामुळे धार्मिक आधारावर सूर्यनमस्काराला विरोध करणे योग्य नाही. तसे करायचे असेल, तर ज्यू धर्मियांच्या ‘टेन कमांडमेंट्स’मध्ये, आई-वडिलांचा आदर करावा, निष्पाप व्यक्तीची हत्या करु नये, चोरी करु नये, अशी काही मूल्ये सांगितलेली आहेत, तीदेखील धार्मिक आधाराचे कारण देत धर्मांध मुस्लीम अमान्य करणार का? ही सर्व वैश्विक मूल्ये आहेत, त्याचप्रमाणे सूर्यनमस्कारातील १२ आसने वैश्विक व्यायाम प्रकार आहे, त्याचा धार्मिक आधारावर विरोध होऊ शकत नाही.



कट्टरपंथी मुस्लिमांना सूर्याला ईश्वर मानायचे नसेल तर तेही ठीक, पण ते १२ आसनांचा व्यायाम तर करु शकतातच ना? की, सूर्यनमस्कारासारखी व्यायामाची सर्वंकष पद्धती हिंदूंनी शोधल्याने ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ त्यालाही विरोधच करत राहणार? तसे असेल तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला, तो नियम फक्त न्यूटनसाठीच नाही, तर सर्व जगासाठी आहे, वैश्विक आहे, तोही कट्टरपंथी मुस्लीम अमान्य करणार का? ‘वंदे मातरम्’चा मुद्दाही तसाच आहे. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रप्रेमाची भावना प्रकट करणारे गीत आहे, त्याचाही संबंध धर्माशी जोडणे गैरलागू. सूर्यनमस्कारही त्याच पठडीतील, त्यातील व्यायाम प्रकार फक्त हिंदूंसाठी नव्हे, तर सर्वांसाठी आहेत.



सूर्यनमस्काराप्रमाणेच योगासनांचेही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांसमोर ‘योग दिना’चा प्रस्ताव ठेवला होता आणि तो हिंदू नसलेल्या जगातील सर्वच देशांनी मान्य केला होता, कारण धर्मापेक्षाही त्याची वैश्विकता. आज जगातील सर्वच देशांत अगदी मुस्लीम देशांतही ‘योग दिन’साजरा केला जातो. सौदी अरेबियातील योग प्रशिक्षक नौफ मारवाई यांनी तर स्वदेशासह अरब जगतातील अनेक देशांत योगाचा प्रचार-प्रसार केला आहे. विशेष म्हणजे नौफ मारवाई यांनी सौदी अरेबियातील इस्लामी सत्ताधीशांकडून योगासनाला कायदेशीर मान्यतादेखील घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या नेतृत्वाने सांगितले तरच ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ सूर्यनमस्कार करणार का, हा प्रश्न विचारावा लागेल. कारण, कट्टरपंथी मुस्लिमांचे डोळे सौदी अरेबियाकडेच लागलेले असतात.



दरम्यान, केवळ हिंदूच सूर्योपासना करतात असेही नाही. जगातील बहुतेक सर्वच धर्म/संस्कृतींमध्ये सूर्योपासनेचेप्रचलन होते. आज इस्लामी देशांत विभागलेल्या अरेबियात तसेच पर्शिया म्हणजे इराण-इराक-इजिप्तमध्ये हजारो वर्षांपासून सूर्योपासना होत असे, तिथे सूर्याला ‘शम्स’ किंवा ‘शम्सम’ नावाने संबोधले जाई. इजिप्त, तुर्कस्तानमध्ये मित्र मंदिराचे अवशेष आढळलेले आहेत. म्हणजेच, इस्लामपूर्व कालावधीत इथे सूर्योपासना होत असे, तर ख्रिस्तपूर्व काळातील ग्रीक संस्कृतीत ‘अपोलो’, ‘हेवियस’, ‘फोबस’ या नावाने सूर्याला पूजले जात असे.



इतकेच नव्हे, तर दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतील आदिम संस्कृती, माया संस्कृतीतही सूर्योपासना केली जाई. जपानच्या शिंटो धर्मातही सूर्याला पूजनीय मानलेले आहे, तर आता तिथल्या बौद्ध धर्मीयांतही सूर्योपासना केली जाते. म्हणजेच, सूर्याला ईश्वर माननारी हिंदू संस्कृती एकमेव नाही, तर वैश्विक आहे. अर्थात, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या अब्राहमिक, एक ईश्वर, एक प्रेषित मानणार्‍या धर्मांच्या उदयानंतर वरील जवळपास सर्वच प्रदेशातील सूर्योपासना बंद झाली, पण त्यांचे पूर्वज तसे नव्हते.
म्हणजेच, ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने सूर्य हिंदूंचा ईश्वर असल्याने केलेला विरोध चुकीचा आहे. पण, जे चूक तेच करण्याचा वसा ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने घेतलेला आहे. त्याला केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधाचे, द्वेषाचेही कारण आहे. पण, ‘फर्जी फतवा फॅक्टरी’ने लावलेल्या विरोधाच्या फुलबाजीला मुस्लीम धर्मीयांतून विरोध झाल्याचे दिसले नाही.



कारण, दि. १ ते ७ जानेवारीदरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील ३० हजार सरकारी शाळेत सूर्यनमस्काराच्या आयोजनाचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व शाळेत सूर्यनमस्कार कार्यक्रम पार पडलाही. मुस्लीम विद्यार्थ्यांनीही आपल्या व समाजाच्या हितासाठी सूर्यनमस्कार स्वीकारल्याचे यावरुन म्हणता येते. अशा परिस्थितीत ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ला मुस्लीम धर्मीयच गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येते, जे देशाच्या वाटचालीत महत्त्वाचे म्हटले पाहिजे.






@@AUTHORINFO_V1@@