‘लव्ह जिहाद’द्वारे फसवणूक? सिन्नरमध्ये युवतीची आत्महत्या!

07 Jan 2022 16:20:15
LUV JIHAD.jpg



 नाशिक : ‘लव्ह जिहाद’मधून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून सिन्नरमध्ये एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपी तरुणाविरोधात तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होेत आहे. परंतु, पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असून याप्रकरणी शुक्रवार, दि. ७ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.सिन्नर येथील रहिवासी असणारी एका २४ वर्षीय युवतीने गेल्या आठवड्यात गुरुवार, दि. ३० डिसेंबर, २०२१ रोजी आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी सिन्नर पोलिसांनी तपासात ढिलाई केल्याचा आरोप करत बुधवार, दि. ५ रोजी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. युवतीच्या मृत्यूप्रकरणी समाज माध्यमांवर विविध संदेश फिरत होते. मात्र, असे असतानादेखील पोलिसांनी स्वतःहून त्याची दखल न घेता तपासात ढिलाई केल्याचा आरोप केला आहे. मुलीचे नातलग व मैत्रिणींचे जबाब का घेतले नाही? मुलीच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग’चे विश्लेषण का केले नाही? संशयित आरोपीचे नाव घेतले जात असताना त्याची चौकशी का केली नाही, याबाबत त्यांनी पोलिसांना जाब विचरला.


या युवतीचे पितृछत्र हे तिच्या बालवयातच हरपले होते. तिचे संगोपन आत्या आणि आजी-आजोबा यांनी केले. मात्र, कोरोना लाटेत तेही निवर्तले. वडील सिन्नर येथील एका दुकानात काम करत आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचवेळी त्यांची ओळख रईस इब्राहीम शेख या तरुणाशी झाली. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंधही असल्याचे बोलले जाते. परंतु, या तरुणाने आपण आधीपासून विवाहित असल्याचे पीडितेसह तिच्या कुटुंबीयांपासून लपविले. यातूनच या दोघांमध्ये वाद होऊन फसवणूक झाल्याच्या नैराश्येतून तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपवल्याचे बोलले जात आहे.मात्र, पोलिसांनी याबाबत सर्व कायदेशीर पद्धतीने तपास न करता पीडितेला न्याय दिला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी भाजप नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, ‘वंजारी फाऊंडेशन’चे प्रदेशाध्यक्ष कृष्णा दराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, नगरसेवक प्रमोद चोथवे, सोमनाथ वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम मुरकुटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाधान गायकवाड, मुजाहिद शेख, मोहसीन शेख, कुणाल हांडे, सविता कोठुरकर, रूपाली काळे, मंगल झगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला. युवतीला मानसिक, शारीरिक त्रास देण्यात आल्याची मुलीचे शेजारी चर्चा करत असताना त्यांचे जबाब का नोंदवण्यात आले नाही, असे प्रश्न उपस्थितांनी केले. यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना बोलावून निवेदन देण्यात आले.


तपासातील हलगर्जीपणाने पोलिसांविषयी संशय निर्माण झाला असून, हे मळभ दूर होण्याकरिता उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी शुक्रवार, दि. जानेवारी रोजी दुपारी २१ वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा भाऊसाहेब शिंदे यांनी केली.
 

‘लव्ह जिहाद’चेच प्रकरण
मृत तरुणी आणि आरोपी तरुण यांचे प्रेमसंबंध होते. त्या तरुणाने पीडितेला आपल्या आहारी जाण्यास भाग पाडले होते. तो तिला एका दर्ग्यावरदेखील घेऊन गेला होता. तेव्हापासून तिच्यात अनेक बदल झाले, अशी माहिती पीडितेच्या बहिणीने आपल्याला दिली व आमच्याकडे पुरावेदेखील आहेत. त्यामुळे हे ‘लव्ह जिहाद’ चेच प्रकरण आहे. या तरुणाने यापूर्वीदेखील काही तरुणींच्या आयुष्याचे नुकसान केले आहे. ही हत्या असून आरोपीवर हत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी आम्ही आज सर्वपक्षीय मोर्चा काढणार आहोत.


- भाऊसाहेब शिंदे, कार्यकर्ते, भाजप, सिन्नर


 
कायदेशीर पद्धतीने तपास सुरू; पोलिसांचे स्पष्टीकरण
 
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, “याबाबत कायदेशीर पद्धतीने तपास सुरू आहे. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी आम्ही ‘ईडीआर’ दाखल केला. मयत युवतीची बहीण व आत्या यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे यावेळी आम्हाला लेखी दिले. त्यानंतर पीडितेचे मामा यांनी शेख व पीडिता यांच्या प्रेमसंबंधांबाबत आम्हाला माहिती दिली. तक्रार दाखल झाल्यावर आम्ही संशयिताला ताब्यात घेतले आहे.




न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडितेचा व संशयितेचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. ‘कलम 306’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. पीडिता गर्भवती असल्याचेही बोलले जात आहे, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “याबाबत अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतर निश्चितपणे सांगता येईल. सध्या याबबत स्पष्टीकरण देणे कठीण आहे,” असे ते म्हणाले. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, “संशयित इतर धर्मीय आहे. मात्र, तपास चालू आहे. तपासात काही आढळल्यास वाढीव कलम लावले जाईल,” असे त्यांनी सांगितले.





 
 



 
 
Powered By Sangraha 9.0