पूरातन मुर्तींना वज्रलेप करणारा अनुभवी शिल्पकार : विकास सावंत

    07-Jan-2022
Total Views | 604

Vikas Sawant
 
 
भारतातील जुन्या पुरातन मंदिरांमधील मूर्ती कालौघात लोप पावतात, भग्न पावतात अशा मूर्तींचे पुनर्निर्माण विकास सावंत यांनी केलेलं आहे. ‘वज्रलेप’ या तंत्रशुद्ध उपचाराने भग्न-भंग पावलेली मूर्ती ही पुन्हा नव्याने उभी करण्याचे कौशल्य विकास यांनी प्राप्त केले आहे.
एखादा लेख वाचून, एखाद्या वाचकाचे आयुष्य बदलते, हे विधान ऐकायला कदाचित बोलायलादेखील, समाधान देते. परंतु, प्रत्यक्षात असं एखादं उदाहरण पाहायला मिळालं, तर जो आनंद होतो, तो शब्दातीत असतो. मागच्या महिन्यात साताऱ्यातून फोन आला. तेथील ‘न्यु इंग्लिश स्कूल’ या जुन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले शेख सर फोनवर होते. प्रासंगिक संवाद झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बाजूला असलेल्या शिल्पकार विकास सावंत यांची फोनवरच ओळख करुन दिली. खास त्यांची ओळख करुन देण्यासाठी फोन होता. विशेष या गोष्टीचं वाटलं की, शिल्पकार विकास सावंत हे ’जेव्हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडून लिहिला गेलेला, ‘मूर्तीमंत बी.एफ.ए.’ हा कलाक्षेत्राची ओळख सांगणारा लेख वाचला होता. या घडीला, मी कोणत्या नियतकालिकात ‘तो’ लेख लिहिला होता ते स्मरत नाही, परंतु, शिल्पकार विकास सावंत यांनी ते नववीत शिकत असताना तो लेख वाचला, त्यांना कलाक्षेत्रातील अभ्यासक्रम आणि व्यवसायाच्या संधी, या संदर्भात माहिती मिळाली आणि ते शिल्पकार झाले.
 
 
Vikas Sawant 1
 
 
लेखक, लेख लिहीतच असतात, त्या लेखाच्या वाचनाने, एखादा वाचक स्वत:ची ओळख निर्माण करतो हे ‘त्या’ फोनवरील संभाषणातून समजले. ऐकून फार धन्य वाटले. ‘वाचा म्हणजे वाचाल’ हा आम्हाला ऐकवलेला मंत्र, प्रत्यक्षात अनुभवण्यास आला, असे अनेक जणं, वाचनातून माहिती मिळवत स्वावलंबी होत असणार, अनेक पुस्तके, अनेक लेख, अनेक लेखक... खरं तर यांच्याकडून होत असलेल्या या कामामुळे सध्या फोफावत असलेल्या नव्हे, फोफावलेल्या ‘सोशल मिडीया’ची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही... असं म्हणायला वाव आहे.
 
 
‘वाचनाने जीवन घडते’ ज्याचं मूर्तीमंत-प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे शिल्पकार विकास सावंत होय. त्यांनी मुंबई येथील त्या वेळच्या सुपरिचित ठरलेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागातून शिल्पकलेचे पदविका शिक्षण पूर्ण केले.मूर्ती विज्ञान आणि वास्तूविज्ञान याकडे त्यांचं लक्ष केंद्रित होऊ लागलं. पंचमहाभूतं आणि सृष्टीला ‘जीवन’ बहाल करणाऱ्या ‘सूर्या’वर त्यांनी संशोधनात्मक दृष्टीने अभ्यास केला. विश्वाला उर्जा देणारी शक्ती म्हणजे सूर्य आहे, म्हणून त्यांनी ‘सूर्यप्रतिमा’ हीच वास्तुदोष दूर करुन वास्तुला आनंदी वातावरणात नेऊ शकते यावर अधिक भर दिला, सूर्यप्रतिमा आणि मूर्तीकला यांच्यासह त्यांनी वास्तूपरिक्षणावर अभ्यास केलेला आहे.
 
 
भारतातील जुन्या पुरातन मंदिरांमधील मूर्ती या कालौघात लोप पावतात, भग्न पावतात अशा मूर्तींचे पुननिर्माण विकास सावंत यांनी केलेलं आहे. ‘वज्रलेप’ या तंत्रशुद्ध उपचाराने भग्न-भंग पावलेली मूर्ती ही पुन्हा नव्याने उभी करण्याचे कौशल्य विकास यांनी प्राप्त केले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने भग्न मूर्तीचा विकास त्यांनी केलेला दिसतो.
 
 
‘वज्रलेप’ म्हणजे वज्र म्हणजे दगड, लेप म्हणजे थर वा आवरण. दगडाला, दगडावरील कोरीवकामाला वाचवण्यासाठी म्हणण्यापेक्षा अबाधित ठेवण्यासाठी लावलेला थर म्हणजे ‘वज्रलेप’ झिजलेल्या भंगलेल्या मूर्ती पुन्हा मूळ स्वरुपात दिसाव्यात म्हणून ‘वज्रलेप’ केला जातो, लावला जातो. ‘वज्रलेप’ करण्याची किंवा लावण्याची कला फार मोजक्या कलाकारांनाच अवगत होते. प्रसाद परब, श्रीकांत मिश्रा (पुरातत्व विभाग, औरंगाबाद).
 
 
 
Vikas Sawant 2
 
मूर्तींवर केला जाणारा अभिषेक, त्या अभिषेकाद्वारे मूर्तीला जे स्नान घातलं जातं त्या द्रावणात पाण्यासह दूध-दही, पंचामृत-मध-साखर-गुळ-अत्तर-मिठाई असे इतरही पदार्थ असतात, साधं साखरेचंच उदाहरण घ्या. ज्या साखरेत रसायनं असतात, ज्या साखरेने माणसाला जिवंत असताना मधुमेह आणला असं ‘पॅथी’ सांगतात, तीच साखर ‘आश्माला’ म्हणजे ‘दगडाला’ही सोडत नाही. अत्तरात जितका सुगंध मनाला भावतो तितकाच त्याच्यातील असलेल्या रसायनांमुळे ते घातकही बनते. त्यात समाविष्ट रसायनांमुळे... त्या अत्तरांमुळे दगडांनाही झिजावं लागतं. अशा ‘भावनिक’ उपचारांमुळे सुंदर-सुबक-मूर्तीमधील ‘धार्मिक भाव’निघून जातो. ‘देव भावाचा भुकेला’ असं जरी असलं तरी ‘भावाचा अतिरेक’ देवातील भावाचाच नाश करायला लागतो. मग ‘भाव’ पुन्हा आणण्यासाठी उरतो तो उपचार फक्त ‘वज्रलेपाचा’...!
 
 
पूर्वी मेण आणि राळ वापरुन मूर्तीवरील ‘वज्रलेपा’ची प्रक्रिया पूर्ण केली जायची. आता ‘इफॉक्सी’ नावाचे रसायन आणि मोत्यांची भुकटी यांचा वापर करुन मूर्तीवर लेपन केले जाते. मूर्ती पुन्हा नव्या मूर्तीप्रमाणे दिसू लागते. अत्यंत संवेदनशीलतेने ‘वज्रलेपा’चं काम करावं लागतं. ‘सिलिकॉन रेझिन’ जो वाळूपासून तयार केलेला पदार्थ असतो त्याचा उपयोगही या लेपनात केला जातो. आयुर्वेदीय पद्धतीने फार प्राचीन काळापासून, मूर्तीचं पुनर्निर्माण केलं जायचं. परंतु, या विषयीची माहिती फारशी उपलब्ध नाही. ज्यांना ही माहिती आहे ते, ती प्रसिद्ध करण्यास इच्छुक नसतात.
 
 
‘वज्रलेपन’ करणाऱ्या काही मोजक्याच कलाकारांमध्ये शिल्पकार विकास सावंत यांचं नाव आहे. आज अशा कलाकारांचं महत्त्व संस्कृती जतन करणाऱ्या आणि धार्मिकता जपणाऱ्या मंदिरांसह धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना तसेच समाजाला पटलेलं आहे. आपल्याला अनेक पुरातन मंदिरे आणि तेथील शेकडो वर्षं जुन्या असलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्तीप्रती समाजाची भावना दृढ झालेली असते. अशा मूर्तींचा खूप बारकाईने विचार करावा लागतो. निरीक्षण करावे लागते. आपल्याकडे, मूर्तींच्या वैशिष्ट्यांवरून त्यांची नावे ठरविण्याची प्रथा आहे. त्या मूर्तीच्या कोणत्या हातात कोणते आयुध आहे किंवा वस्तु आहे? त्या आयुधाचं वा वस्तूचं नाव काय आहे? ती मूर्ती कोणत्या काळात निर्माण झालेली असावी? त्या मूर्तीची ऐतिहासिक व पौराणिक माहिती मिळवून अभ्यासावी लागते.
 
 
त्या मूर्तीचे नाव, तिची उपासना, प्रकार आदी गोष्टींचाही विचार ‘वज्रलेपना’चे वेळी केला जातो. अशा या पूरातन मूर्तींचा ठेवा जतन करणे ही काळाची आणि सांस्कृतिकते साठीची गरज आहे. आज दुर्दैवाने आपल्याकडे मूर्तींची आणि प्राचीन मंदिरांची अवस्था फारशी समाधानकारक नाही. नवीन मंदिरे उभी करण्याच्या तुलनेने आहे तीच मंदिरे आणि मूर्तींचे जतन करणे, यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे भंग पावलेल्या वा झिजलेल्या मूर्तींचा विकास करणे, पुनर्निर्माण करणे होय, या विषयातील आणि कला प्रकारातील अनुभवी शिल्पकार विकास सावंत, यांची जबाबदारी मोठीच म्हणावी लागेल. त्यांच्या ‘वज्रलेपन’ कलेमुळे अनेक पूरातन-धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या आणि झिजलेल्या मूर्ती, नव्याने दृश्यस्वरूपात येवो... ही इच्छा व्यक्त करतानाच त्यांच्या कलाप्रवासाला वज्रलेपी साथ मिळो हीच सदिच्छा...
 
- प्रा. गजानन शेपाळ
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121