जितेंद्र आव्हाडांचे ‘हमाम’

06 Jan 2022 12:44:23

Awhad
 
 
"माझ्या घरावर मोर्चा येणार आहे. मला पोलीस बंदोबस्त द्या,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. वर ‘जय भीम’सुद्धा केले. हे सगळे का? कशासाठी? तर थोडक्यात ‘मी ओबीसींवर विश्वास ठेवत नाही. कारण, मी ‘जय भीम’ बोलतो’ असे म्हणून जितेंद्र आव्हाड यांना ओबीसी आणि मागासवर्गीयांमध्ये भांडण आणि संशयकल्लोळ निर्माण करायचा आहे. आजपर्यंत हिंदू विरुद्ध मुस्लीम किंवा ब्राह्मण विरुद्ध इतर हिंदूंमधील इतर जातगट यांना झुंजवत ठेवण्यात जितेंद्र आणि त्यांचे आका यशस्वी झाले. आता ही तोडफोड करून आणखीन महाराष्ट्राला पोखरून यश मिळवायच्या मागे हा विशेष कंपू लागला आहे. त्यामुळेच जितेंद्र यांनी ओबीसी समाजाबद्दल इतके निंदनीय उद्गार काढले. मला मारहाण होईल, मग आणखी काही होईल, असे म्हणून ओबीसींचा मोर्चा आला म्हणून ते घरातून निघून गेले.
 
 
आजपर्यंत राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून शरद पवार जितेंद्र आव्हाड यांचे चित्र उभे करत होते. पण, जितेंद्र आव्हाड ना कधी हिंदू होते, ना कधी ओबीसी होते, ना कधी इतर समाजघटकांचे प्रतिनिधित्व करत होते. उलट लोक म्हणतात की, जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या मतदारांना खूश करण्यासाठी आता फक्त कागदोपत्री ‘जितुद्दीन’ असे नाव बदलायचे फक्त बाकी आहेत. अर्थात, यात सत्य काय, तथ्य काय, हे जितेंद्र आव्हाड आणि जनतेलाच माहिती! आता काय तर म्हणे, ओबीसी समाजावर जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास नाही. पण, समाजाचा तरी जितेंद्र आव्हाडांवर विश्वास आहे का? दहशतवादी इशरत जहाँच्या नावाने रुग्णवाहिका फिरवणारे कोण देशद्रोही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. जे स्वत:च्या मातीचे होऊ शकत नाही, तिथे जात-धर्म तर दूरची गोष्ट. जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हमाम मे सब नंगे हैं।” पण, काही लोक असे असतात की, ते ‘हमाम’मध्येच नाही, तर सगळीकडेच नंगे असतात. ते नंगेपण कपडे आणि शरीराचे नसते, तर अनीती, असत्य आणि क्रूर स्वार्थाचे नंगेपण असते. ओबीसी समाजाबद्दल गरळ ओकून जितेंद्र आव्हाडांनी आपले हे नंगेपण सिद्ध केले. आता जितेंद्र आव्हाड म्हणतील, “नंगे को खुदा भी डरता हैं।‘ पण, आव्हाडांच्या नंगेपणाला ओबीसी समाज घाबरत नाही. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड मोर्चाला पाहून पळून गेले ना? बाकी काय? जितेंद्र आव्हाड आणि ‘हमाम.’
 
 
‘ओबीसीं’चे प्रतिनिधी कोण?
 
आता ओबीसी आरक्षणाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांना दिली आहे. अर्थात, हा पक्षाअंतर्गत मुद्दा असला, तरी मुळात छगन भुजबळ हा ओबीसी समाजाचा चेहरा आहे का? माळी समाजाचा एक गट भुजबळांच्या मागे आहे किंवा धनंजय मुंडेंच्या सोबत वंजारी समाजाचा एक गट आहे, म्हणून हे लोक ‘ओबीसी समाजाचे चेहरे’ होऊ शकतात का? छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली तुरूंगात गेले आणि तिथून ‘छातीत दुखते, छातीत दुखते’ असा बहाणा करून बाहेर आले. नंतर निवडणूक जिंकली म्हणून ते सगळ्या ‘महाराष्ट्राच्या ओबीसींचा नेता’ होऊ शकतात का? शक्यच नाही! ओबीसी समाज हा प्रचंड कष्टकरी आहे. पापभिरू आहे. धर्मकर्म करावे आणि समाजाच्या चौकटीत नीतिसंकेत पाळून राहणारा हा समाज! या समाजासाठी आरक्षणाचे काम कोण पाहणार तर छगन भुजबळ?
 
 
खरेतर या अशा लोकांमुळेच बहुसंख्य असतानाही ओबीसी समाजगटाला नेहमीच राजकीय उपेक्षाचा बळी व्हावे लागले. ओबीसीमधील मोठ्या जातिगटातील बेरकी लोकांनी राजकीय नेतृत्व पटकावले. आपापल्या समाजातील ठरावीक गटांतल्या ठरावीक माणसाला पोटापुरते देऊन मोठे केले. त्यात समाजाचे काय भले झाले? काहीच नाही. माळी, धनगर आणि वंजारी यापलीकडे इतर मागासवर्गीय समाजही आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे, देशाच्या धर्मकारणात, धर्मसंरक्षणात यांचे योगदान शब्दातीत आहे. पण, छोट्या समाजगटांचा विचार कोण करतो? मंडल आयोगातून यांना ‘इतर मागासवर्गीय’ म्हणून ओळख मिळाली, पण पुढे काय? काहीच नाही. आरक्षणाचा लाभ या समाजबांधवांना होतो का? राजकीय तर नाहीच नाही. कारण, पुन्हा लोकसंख्येचे गणित! राजकीय प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे सत्तेचे लाभ नाहीत. तर मुद्दा असा की, आता म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ नेतृत्व करणार आहेत. मग आतापर्यंत ते काय करत होते? त्यांनी महात्मा फुलेंच्या नावाने स्थापन केलेली ‘समता परिषद’ काय करत होती? त्यामुळे ओबीसी समाजाने यापुढे आतातरी विचार करावा की, खरेच त्यांचे प्रतिनिधी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड असू शकतात का? छे! कधीच नाही!!
 
 
 
Powered By Sangraha 9.0