'सामाजिक बंधुभाव रुजविण्यासाठी 'समता वारी'चा उपक्रम स्तुत्य : डॉ.भागवत कराड

06 Jan 2022 12:30:05

Karad

संभाजीनगर : 'सामाजिक बंधुभाव रुजविण्यासाठी 'समता वारी'चा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे,' अशा शब्दांत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी 'समता वारी'चे कौतुक करत या वरील शुभेच्छा दिल्या आहेत. संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे आणि वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “संत चोखोबा ते संत तुकोबा”- एक वारी समतेची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

१ जानेवारी २०२२ रोजी या “समतावारी”ने संत चोखामेळा महाराज कर्मभूमी, मंगळवेढा येथून प्रस्थान केलेले आहे. दरम्यान, गुरुवार, दि. ६ जानेवारी रोजी या वारीच्या पोस्टरचे अनावरण भारत सरकारचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते औरंगाबाद (संभाजीनगर) येथे करण्यात आले.

यावेळी संत चोखामेळा अध्यासन केंद्र,पुणे व 'संत चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची' या वारीचे संयोजक श्री.सचिन पाटील, विवेक विचार मंच चे सागर शिंदे, निखिल आठवले, रवी काळे, आप्पासाहेब पारधे, भीमराव मोटे उपस्थित होते. शनिवार, दि. १ जानेवारी रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या या 'समता वारी'ची सांगता मंगळवार, दि. १२ जानेवारी, २०२२ रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज जन्मभूमी, देहू येथे होणार आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0