नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी एक मॅरेथॉन आयोजित केली होती. यामध्ये 'लडकी की हु, लड सकती हु' या बॅनरखाली ही मॅरेथॉन आयोजित केली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये जिंकलेल्या मुलीला एक स्कूटर देण्यात आली. त्याच मुलीने आता सोशल मिडियावर व्हिडियो टाकत, या स्कूटरचे सर्व भाग तुटलेले असल्याचे निदर्शनास आणून दिले. गाडीचे काही भाग वेल्डिंगने जोडले गेलेले आहेत, तर काही नटच गायब आहेत. यावरून आता कॉंग्रेसवर चांगलीच टीका करण्यात येत आहे.
संबधित विजेत्या मुलीचा व्हिडियो शेअर करत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी कॉंग्रेसवर टीका करत म्हंटले आहे की, "काँग्रेसने मुलींसाठी मॅरेथॉन आयोजित केली होती. विजेत्या मुलीला स्कूटी दिली, तीही तुटलेली होती आणि तिचे कुलूपही नव्हते. भ्रष्टाचार आणि काँग्रेस… सत्ता असतानाही आणि नंतरही." असा टोला लगावला आहे.
बरेलीमध्ये काँग्रेसने आतोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत उडालेल्या गोंधळानंतर कॉंग्रेस आर टीका करण्यात आली. या घटनेवरूनच माजी महापौर सुप्रिया एरन यांनी बेताल वक्तव्य केले होते. या घटनेचा संबंध त्यांनी वैष्णोदेवीतील दुर्घटनेशी जोडला होता. या सर्व प्रकरणानंतर बाल आयोगानेही याची गंभीर दखल घेतली असून जिल्हा दंडाधिकार्यांकडे याची तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल ७ दिवसांत मागवण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
तसेच, आयोगाने २४ तासांमध्ये कृती अहवाल मागवला आहे. अशा प्रकारे आयोजित मॅरेथॉनवर त्यांनी जिल्हा दंडाधिकार्यांना पत्र लिहून राजकीय कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करण्यास मनाई असल्याने बाल संरक्षण नियमांचे उल्लंघन होत आहे. तसेच यावेळी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचेदेखील उल्लंघन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची दखल घेत काँग्रेस नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बरेलीमध्येच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिर्झा अशफाक आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहित सिंह यांनी सांगितले की, "जिल्हा प्रशासनाच्या तपासानंतर मॅरेथॉनच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे." आयपीसीच्या कलम १८८, २६९, २७० यासह विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस इतर लोकांचा शोध घेत आहेत. या मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत 200 मुलांना सहभागी होण्याची परवानगी दिल्याचा अहवाल नगर दंडाधिकाऱ्यांच्या समोर आला आहे. पण त्या शर्यतीत सहभागी झालेल्या मुलांची संख्या त्याहून कितीतरी पटीने जास्त होती.