कुठल्याही खेळाडूची फक्त खेळ आणि खिलाडू वृत्ती उत्तम असून चालत नाही, तर त्यासाठी गरज असते ती ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ या दोन्हींची. खरंतर तुम्ही खेळाडू असाल अथवा नसाल तरी ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ यांना जीवनशैलीत स्थान देणे तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, आजच्या भागात ‘फिटनेस’ आणि ‘डाएट’ यांच्या बळावर खिलाडी ठरलेल्या क्रीडापटूंविषयी...
कोविड-१९’च्या महामारीत आपण काही गोष्टी जगण्यासाठी शिकत गेलो. यावर्षी सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपण २०२१ साल पाहू शकलो, नव्या वर्षात प्रवेश करु शकलो, यासाठी परमेश्वराचे आभार प्रदर्शित करणारे संदेश एकमेकांना पाठविले. दरवर्षी ‘आपली सगळ्यांची सगळ्या बाबतीत भरभराट होवो,’ या जुनाट रटाळ तांत्रिक संदेशापेक्षा आपले सगळ्यांचे पृथ्वीतलावरचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव आपल्यासह आपल्या मित्रमंडळींनाही झाली आहे, याचा खूप खूप आनंद वाटला. शिवाय या जगण्याच्या संधीचे आपण काय करायचे, हेही महत्त्वाचे आहे. क्रीडामानसशास्त्रात ‘मिळालेल्या संधीचे सोने करायचे’ हा मंत्र मनाच्या गाभ्याशी ठेवत प्रत्येक खेळाडू जीवाचे रान करत असतो. पण, स्वत:ची काळजी घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब.कोरोनाच्या या महामारीने जगण्यातील अनिश्चितपण खरंच प्रकर्षाने अधोरेखित झाले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर या काळात जगातल्या प्रत्येकाने मृत्यूला थोडं जवळून, तर कधी खूप दूरवरुन पाहिलं, अनुभवलं. प्रत्येकाच्या मनाला मृत्यू किंवा मृत्यूची छाया नक्कीच शिवून गेली. आपण सर्वांनी मृत्यूचा 'flying kiss' कळतनकळत अनुभवला आहे. यात आणखी एक मनोरंजक, पण प्रासंगिक सचित्र. संदेशही सध्या फिरत आहे. ज्यात यम ज्यांनी मास्क लावले, त्यांना ओळखू शकला नाही. म्हणून मास्क न लावलेल्यांना यमलोकात घेऊन जातो.
ही जी मास्क लावून यमाला टाळण्याची प्रक्रिया आहे, ती आपण स्वत:ची काळजी घेऊन स्वत:च्या प्राणांचे रक्षण कसे करतो, याचे प्रतिकात्मक उदाहरण आहे. स्वत:ची काळजी ही केवळ आपला जीव वाचवते, यापेक्षाही अधिक अर्थपूर्ण व विधायक आहे. भारताचा सर्वोत्तम सर्वकालिन ‘टॉप’वर राहिलेला फुटबॉल खेळाडू ज्याच्या केवळ नामोच्चाराने त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्साह संचारतो, त्या सुनिल छेत्रीच्या बाबतीत एक गोष्ट जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ती म्हणजे तो स्वत:च्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी उत्तमपणे घेतो. तो फुटबॉलच्या जगातला अत्यंत तंदुरुस्त खेळाडू मानला जातो. गेली १६ वर्षे तो भारतीय संघासाठी खेळतोय. सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून फुटबॉल हा खेळ भारतात क्रिकेटइतका प्रसिद्ध नाही. या खेळाला भारतात आशा वा भविष्य नाही. अशा खेळात जगाने दखल घ्यावी अशी कारकीर्द घडवून, भारतीय संघात आपले स्थान मिळवून ते अढळ ठेवून संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचण्याची क्षमता बाळगणार्या या खेळाडूला भारताचा क्रीडा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ २०२१ साली राष्ट्रपती रामनाथकोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा ‘फुटबॉलचा राजा’ एकट्याचा बळावर टीमला अविस्मरणीय गोल आणि धाडसी क्षणाचा चित्तथरारक असा अनुभव त्याच्या चाहत्यांना देत आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात ‘फुटबॉलचा देव’ पेले यांचे रेकॉर्ड त्याने मोडले आणि आज त्याच्य पुढे फुटबॉलचा अप्रतिम खेळाडू ख्रिस्टीनो रोनाल्डो हाच आहे. ३६ वर्षांचा हा ‘ब्लू टायगर कॅप्टन’ पूर्ण ‘वेगन’ झाला आणि त्याला ते ‘डाएट’ खूप आवडते. स्वच्छ, व्यवस्थित योग्य अन्न आणि योग्यवेळी (Eating clean, Eating light & eating on time) खाण्याकडे तो कायम लक्ष देतो.वेळोवेळी फुटबॉल खेळताना आवश्यक असलेली विश्रांती तो कधीच चुकवत नाही.
उकडलेल्या भाज्या, ताजी फळं डाळ, पोळ्या, चीज-ओट्स अशा प्रकारचा ‘डाएट प्लान’ तो मोठ्या हुशारीने वापरतो. प्रथिनं कार्ब आणि चरबी व ऊर्जात्मक ‘डाएट’ या सगळ्याचे त्याला स्वतःला उत्तम ज्ञान आहे. याशिवाय जिम व उत्तम व्यायाम यांचा वापर तो आपले ‘फिटनेस रेजीम’ राखण्यासाठी कसोशीने करतो. सुनिल छेत्रीला ‘दि कॅप्टन फॅन्टॅस्टिक’ म्हणूनही ओळखतात. या खेळाडूचे करिश्माई आणि अत्यंत गूढ असे फुटबॉलमधील कौशल्य जितके अतुलनीय, तितकेच त्याचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता आकाशाला गवसणी घालणारी! प्रचंड धाडसी असणार्या सुनिल छेत्रीवर प्रेक्षकांच्या शिव्या खाण्याची वेळ आली, तेव्हा त्याने अजब आव्हान दिले की, “तुम्हाला शिव्या घालायचा इतका हव्यास असेल, तर ‘स्टेडियम’मध्ये येऊन द्या.” त्याच्या या हटके आव्हान देण्याच्या ‘स्टाईल’ला दर्दी प्रेक्षकांनीही उदात्त प्रतिसाद दिला आणि तो सामना ‘सोल्ड आऊट’ झाला. ही त्या टीमसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय खेळाडू आणि दर्दी यांच्यातील खेळपूर्ण रोमान्सचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःचीकाळजी घेण्याची ‘स्टाईल’ ही केवळ ‘फीजिकल’ नाही, तर ती भावनिक पातळीवर का असावी, हे सर्वाथाने ‘फीट’ असलेल्या देदीप्यमान यशाचा मुकूट डोक्यावर शांत मनाने मिरवूू शकण्याची ताकद असणार्या सुनिलकडून शिकावे.
अॅशले जॉन्सन ही २६ वर्षांची आफ्रिकन-अमेरिकन स्त्री २०१६ साली ‘वॉटर पोलो’मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि २०२१ सालीसुद्धा ती ऑलिम्पिक सुवर्ण पदक घेऊन मोकळी झाली. तिच्या जगप्रसिद्ध असण्याचा आणि तिच्याकडून सुवर्णपदक मिळविण्याच्या दबावाखाली ती दबली का गेली नाही, याचं उत्तर देताना ती म्हणाली की, “माझ्या मनाची लवचिकता मी सावरुन धरली आहे.” याचे कारण, ती आपल्या मनोकायिक संकेतांकडे बारकाईने लक्ष देते. आहार, विहार आणि व्यायाम या गोष्टी आपला ‘फिटनेस’ आणि खेळातली क्षमता सांभाळण्यासाठी व्यवस्थित वापरते. स्वतःकडे ती कधीच दुर्लक्ष करत नाही. ती म्हणते, “मला सुखदायक आणि शांतचित्त वाटण्यासाठी जे जे करायला पाहिजे, ते ते सगळं मी करते, मग तो व्यायाम असो वा पाण्याची बाटली असो, ‘बॉडीक्रीम’ असो, मी ते करतेच.” अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा नाही का? तुम्ही खेळाडू आहात, पण खेळापेक्षाही महत्त्वाचा आहे तो म्हणजे ‘खिलाडी!’ खिलाडी टिकवायचा असेल, तर मेहनत घ्यायला लागणारच; स्वतःसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी. लक्षात ठेवा- ‘‘You Yourself as much as anybody in the entire universe, deserve your love and affection’’
(क्रमशः)
डॉ. शुभांगी पारकर