कोरोनानंतरही विक्रोळी पालिकेच्या रुग्णालयाला टाळेच !

31 Jan 2022 00:28:20

vikroli bmc




मुंबई:
विक्रोळीतील मुंबई महानगरपालिकेच्या महात्मा फुले सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस होत असलेल्या विलंबावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या विलंबामुळे रुग्णांची गैरसोय होत असून पालिका प्रशासन आणि म्हाडा यांच्यात समन्वय नसल्याने मागील २ वर्षांपासून रुग्णालय बंदच आहे. तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा या रुग्णालयाच्या भूखंडावर डोळा असल्याचा आरोपही मनसेने दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना केला आहे.


मनसेचे वार्ड क्रमांक ११८चे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर म्हणाले, २०१८ पासून हे रुग्णालय बंद आहे. पाच वर्षांपासून हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवू अशी कन्नमवार वासियांना पालिकेने ग्वाही दिली आहे. परंतु ते काम होताना दिसत नाही. मरणोसन्न अवस्थेत हे रुग्णालय आज आहे. आतातर याची पुनर्बांधणीही होईल असे वाटतं नाही. कारण २०१८-१९ साली या रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे रुग्णालय मोडकळीस येणार आहे, याचा अपघात होणार आहे यामुळे याचे स्थानांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय टागोरनगर येथे करण्यात आले.



२०१८ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून २ कोटींचा खर्च केला. मात्र त्या रुग्णालयांची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. त्या रुग्णालयाचे आयसीयू वार्ड, ओपीडी वार्ड किंवा स्टाफचे वार्ड असुदे याचे सिलिंग कोसळून आत्तापर्यँत २ डॉक्टर जखमी झाले, काही रुग्ण आणि स्टाफही या घटनेत जखमी झाला. मला वाटत नाही की मुंबई महापालिकेचे ३६ हजार कोटींचे बजेट आहे मात्र ते कुठे खर्च करतात त्यांनाच माहिती. या भूखंडावर सर्वांचा डोळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही कांजूरमार्गला सनसिटीमध्ये स्थानांतर करण्याचाही प्रयत्न झाला मात्र आमच्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला जाग आली. याजागेवर केवळ हॉस्पिटलचं राहणार, अशी त्यांनी यावेळी महापालिकेला खडसावून सांगितले.



माजी नगरसेविका प्रियांका शृंगारे यांनी सांगितले की, २०१२ ते २०१७ या कार्यकाळात २०१७मध्ये हे रुग्णालय स्थानांतर करण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. तेव्हा आम्ही सर्व मनसैनिकांनी आणि स्थानिकांनी याला विरोध केला आणि हा प्रयत्न धुडकावून लावला. कारण सर्व झोपडपट्टीतील नागरिकांसाठी, गरीब आणि मध्यमवर्गीय विक्रोळीकरांसाठी हे एकमेव रुग्णालय याभागात आहे. यांना जर पालिकेने सुविधा बंद केली तर यांनी कुठे जायचं? रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना अंथरुनही घरून घेऊया असं पालिका सांगते.



३६ हजार कोटींच्या अर्थसंकल्प असताना इतकी वाईट अवस्था आज पालिका रुग्णालयावर आली आहे का? हा भूखंड सत्ताधार्यांना बळकावयचा आहे. २०१७ला पालिकेतील सत्ताधार्यांनी हे रुग्णालय काढून टाकण्यासाठी जोर लावला तरी आम्ही ते प्रयत्न आम्ही हाणून पाडले. हे रुग्णालय इथून नेण्याचा प्रत्येक प्रयत्न कन्नमनगरवासीय आणि मनसे हाणून पडणार. सत्ताधार्यांनी हे रुग्णालय इथून हलवून दाखवावंच, असं आव्हानच त्यांनी यावेळी शिवसेनेला दिले.


हे हॉस्पिटल किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रुग्णालय सुस्थितीत असतं तर कोरोनाकाळात रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास त्याचा फायदा झाला असता. कारण त्याकाळात रुग्नांना बांद्रा, मुलुंड येथे पाठविण्यात येत होतं. पण विक्रोळीतच त्यांना उपचार मिळाला असता तर त्यांना फायदेशीर ठरलं असतं. त्याकाळात लोकांचे खूप हाल झाले. अनेकांची मुलं-बाळ कोरोनाच्या काळात वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावले. किमान रुग्णाच्या जीवाशी पालिकेने खेळ करू नये.


- स्थानिक महिला




Powered By Sangraha 9.0