पाकिस्तान - पेशावरमध्ये दिवसाढवळ्या ख्रिश्चन पाद्रींवर झाडल्या गोळ्या

31 Jan 2022 15:04:23
pakisthan



पेशावर -
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावर शहरातील मदिना मार्केटमध्ये रविवारी (३० जानेवारी) एका ख्रिश्चन पाद्रीची हत्या करण्यात आली. हा परिसर गुलबहार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.


मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या पाद्रीचे नाव ऑल सेंट्स चर्चचे पास्टर विल्यम सिराज असे आहे. याशिवाय, रेव्हरंड पॅट्रिक नईम नावाचा आणखी एक पाद्री बंदुकीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाद्री रिंगरोडवर एका व्हॅनमधून वैयक्तिक कामासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सिराज यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाद्री नईम यांना तातडीने लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.


पाद्री सिराज यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या भ्याड हल्ल्याचा सोशल मीडियावर अनेकांनी निषेध केला. पाकिस्तानच्या बिशप चर्चचे अध्यक्ष आझाद मार्शल यांनी ट्विट केले की, “आम्ही पेशावरच्या डायोसीजच्या पाद्रींवर झालेल्या गोळीबाराचा आणि पास्टर विल्यम सिराजची तात्काळ हत्या आणि रेव्ह पॅट्रिक नईमला जखमी केल्याचा तीव्र निषेध करतो. आम्ही पाकिस्तान सरकारकडून ख्रिश्चनांना न्याय आणि संरक्षणाची मागणी करतो.
Powered By Sangraha 9.0