मुन्नावर राणांच्या योगींबद्दलच्या वक्तव्यानंतर २४ तासांत मुलीला काँग्रेसचं तिकीट

31 Jan 2022 18:18:13

munnavar rana
 


नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. सहा जणांच्या या यादीतील दोन नावांची चर्चा आता राजकीय वर्तूळात होऊ लागली आहे. 'योगी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यास राज्य सोडून जाईन', अशी भाषा करणाऱ्या शायर मुन्नवर राणा यांच्या मुलीला काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली आहे.
 
 
उरुसा राणा हिला पुरुवा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी उरुसा उन्नाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चा होत्या. या शिवाय ह्या यादीत गायत्री तिवारी यांचेही नाव आहे. त्या कुख्यात गुंड विकास दुबेचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अमर दुबेच्या सासू आहेत. बिकरू हत्याकांडात अमर दुबे मारला गेला होता.
 
 
सीएएविरोधी आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या गायत्री दुबे यांनी ऑक्टोबर २०२०मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उत्तर प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष पद दिले होते. जूलै २०२१मध्ये उरुसा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी काँग्रेस महासचिव असलेल्या प्रियांका गांधींचे निकटवर्ती मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. लखनऊमध्ये गांधी प्रतिमेच्या समोर धरणे आंदोलन करत असताना प्रियांका गांधींना अभिवादन करायला पुढे गेलेल्या उरुसा यांना लल्लू यानी अपमानित केल्याचा आरोप उरुसा यांनी केला होता.
 
 
उरुसा यांची बहिणही वडिलांप्रमाणे योगी सरकारविरोधात वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'आपण आधी मुस्लीम आहोत, त्यानंतर बाकी, आपली ओळख विसरता कामा नये. आपल्याकडून असे काही होऊ नये की, आपण अल्लाह ला तोंड दाखवण्याच्या लायक उरणार नाही. आपल्याला तटस्थ राहून उपयोग होणार नाही.”, असे वादग्रस्त विधान तिने केले होते. उरुसा ही उन्नाव मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती पण पक्षाने आशा सिंह यांना उमेदवारी दिली. पुरुवा सुद्धा उन्नाव जिल्ह्यातीलच जागा आहे पण ह्या उमेदवारीच्या घोषणेवर उरुसा ची प्रतिक्रिया अजून तरी पुढे आलेली नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0