भारताला 'ऊर्जा सक्षम' बनविण्याचे सुदर्शनजींचे स्वप्न; त्याची पूर्तता करण्याचे माझे प्रयत्न - नितीन गडकरी

31 Jan 2022 21:20:46
NG

नवे तंत्रज्ञान समजून घेण्याचा सुदर्शजींचा स्वभाव
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : ऊर्जा सक्षम होणे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यातही जीवाष्म इंधनावरील अवलंबित्व कमी केल्यास अनेक प्रश्न सुटतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक कुप्प सुदर्शन नेहमी सांगत असत. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी नविकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी मनमोकळ्या गप्पांमध्ये सांगत होते.
 
 
देशाचे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २०१४ सालापासून 'मिशन मोड'मध्ये काम करीत आहेत. देशाच्या तिजोरीतील फार मोठा वाटा हा क्रुड ऑईलच्या निर्यातीवर खर्च होतो; त्यापासून तयार होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलमुळे प्रदूषणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल, ग्रीन फ्युएल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहने असे पर्याय नितीन गडकरी निर्माण करीत आहेत. चारचाकी गाड्या १०० टक्के इथेनॉलवर धावण्यासाठी त्यांच्यामध्ये 'फ्लेक्स इंजिन' बसवावे, असा आदेशही त्यांनी नुकताच दिला आहे. त्याचप्रमाणे इथेनॉल वापरास चालना मिळाली की देशातील शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढेल, यावरही गडकरी यांचा भर आहे.
 
 
मात्र, अशाप्रकारे 'मिशन मोड'वर काम करण्याची प्रेरणा सुदर्शनजींकडून मिळाल्याचे नितीन गडकरी सांगतात. ते म्हणतात, "भारताचे जीवाष्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सध्या आपण अरब राष्ट्रांवर अवलंबून आहोत. मात्र, त्यातून आता बाहेर पडण्याची गरज आहे. कारण, तसे झाल्यास देशापुढील दोन महत्वाचे प्रश्न - दहशतवाद आणि बेकायदेशीर धर्मांतर; हे आपोआप थांबणार आहे".
 
 
सुदर्शनजींनी साधारणपणे आजपासून २० वर्षांपूर्वी किंवा त्याहीपेक्षा आधी नवीकरणक्षम उर्जेविषयी आपली अभ्यासपूर्ण भूमिका मांडली होती. इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल - डिझेलला पर्याय निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. मात्र, त्याकाळी सुदर्शनजी मांडत असलेला विचार हा अतिशय क्रांतिकारी होता. त्यामुळे साहजिकच त्याविषयी प्रत्येकाच्या मनात संभ्रम होता. मात्र, त्यांच्या सान्निध्यात राहून माझ्या मनात या विषयाबद्दल कुतूहल निर्माण झाले. नव्या विषयांचा सखोल अभ्यास करणे ही माझी सवय, त्यामुळे मी या विषयाचा तेव्हापासूनच अभ्यास करत होतो. त्याचा लाभ मला आज देशाला ऊर्जा सक्षम बनविण्यासाठी होत आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0