'संपूर्ण वंदे मातरम्'च्या ध्वनिचित्रमुद्रणाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

31 Jan 2022 19:10:28

Sampurna Vande Mataram
ठाणे : कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'संपूर्ण वंदे मातरम्' या गीतावर आधारित नृत्याविष्कारसह ध्वनिचित्रमुद्रणाचे अनावरण सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, प्रिया प्रभुदेसाई हे उपस्थित होते. त्यासोबतच निर्माते नचिकेत अंभईकर, विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, मंदार आपटे, स्वाती आपटे व अर्चना गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
'वंदे मातरम' या कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या गीताच्या अनेक चाली प्रचलित आहेत. त्यापैकीच ज्येष्ठ संगीतकार विनायक अंभईकर यांनी बांधलेल्या चालीतील संपूर्ण वन्दे मातरम्'चे नृत्याविष्कारासह ध्वनिचित्रमुद्रण करण्यात आले आहे. गायक आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या मंदार आपटे क्रिएशन्सद्वारे हे कार्य पूर्णत्वास आले. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.ने या ध्वनिचित्र मुद्रणाचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले आहे. आनंद सहस्रबुद्धे यांनी संपूर्ण वंदे मातरमच्या ध्वनिचित्रमुद्रणाचे संगीत संयोजन केले असून मंदार आपटे, स्वाती आपटे, अर्चना गोरे यांनी हे गीत गायले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0