लातूर : ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवार, दि. २ जानेवारी रोजी उद्गीर येथे पार पडली. या बैठकीत भारत सासणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक भास्कर चंदनशिव, बाबा भांड, अच्युत गोडबोले आणि डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, अखेर भारत सासणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था सासणे यांच्यासाठी आग्रही होते. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ; तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी सासणे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे सासणे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भारत सासणे यांचा जन्म दि. २७ मार्च, १९५१ रोजी जालना येथे झाला असून त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी ही पदवी घेतली आहे. विविध शासकीय अधिकारी पदांवर त्यांनी नोकरी केली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत.