कृष्णेचे पाणी : शतकभराचा सांस्कृतिक-राजकीय दस्तावेज

29 Jan 2022 23:21:09

KrushnechePani
 
 
 
पत्रकारिता, सामाजिक कार्य, जगभ्रमण, अध्यापन आणि सामाजिक संघटन असे विविध पैलू यशस्वीपणे सांभाळणार्‍या ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे यांचे ‘कृष्णेचे पाणी’ हे एक शतकभरातील सामाजिक-राजकीय घडामोडींचा वेध घेत वर्तमानाला भिडणारे महत्त्वाचे आत्मचरित्र.
 
 
 
‘चरित्र’ आणि ‘आत्मचरित्र’ या महत्त्वाच्या वाड्.मय प्रकारातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची, त्यांच्या आयुष्याची दिशा दर्शविणारी बरीचशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘आत्मचरित्र’ हा वाड्.मय प्रकार तर स्वतःच्या आयुष्याकडे साक्षीभावाने पाहात आपल्या आयुष्याबरोबर बदलत गेलेल्या सामाजिक प्रवाहाचाही वेध घेणारा एक महत्त्वाचा प्रकार. यादृष्टीने पत्रकारिता, सामाजिक कार्य, जगभ्रमण, अध्यापन आणि सामाजिक संघटन असे विविध पैलू यशस्वीपणे सांभाळणार्‍या ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे यांचे ‘कृष्णेचे पाणी’ हे एक शतकभरातील सामाजिक-राजकीय घडामोडींचा वेध घेत वर्तमानाला भिडणारे महत्त्वाचे आत्मचरित्र. शतकाचे साक्षीदार, अतिशय संवेदनशीलता असलेल्या श्रीकृष्ण शिदोरे यांची वाचकसंवादी शैली कथात्म रंग घेऊन, त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन कृष्णेच्या प्रवाहाप्रमाणे वाचकाला सोबत नेत व्यक्त करते. आर्थिक श्रीमंतीपेक्षा जीवनमूल्य संस्कृती जपणार्‍या घरात कृष्णाकाठी वाई गावात श्रीकृष्ण शिदोरे यांनी जे संस्कार आत्मसात केले, नकळत त्यांच्यातील संघ कार्यकर्ता ठरवणारे ते ठरले. शालेय वयातच ‘व्यक्ती ते समष्टी’ असा धागा संघकार्याच्या संस्काराने त्यांच्या मनाशी जुळला. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे अनंत घटनांनी पुरेपूर भरलेले वाईतील त्यांचे वास्तव्य त्यांच्या जीवनकार्याला वळण लावणारे ठरले.
 
 
 
आत्मचरित्राच्या या पूर्वार्धात श्रीकृष्ण शिदोरे यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या अनेक दीपस्तंभांसारख्या व्यक्तिमत्त्वाचा साक्षेपी वेध घेतला आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे सरसंघचालक असलेले पूजनीय गोळवलकर गुरुजी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणता येईल. श्रीकृष्ण शिदोरे यांनी एका अर्थाने सामाजिक-राजकीय मंथनाचा कालखंड पाहिला. त्यातील संघ सत्याग्रह, गांधीहत्येनंतर वाईमध्ये उसळलेली जाळपोळ या सगळ्यांमुळे त्यांच्या घडत्या वयावर परिणाम झाला; तो असा की, त्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता कसदार होत गेला. श्रीकृष्ण शिदोरे यांच्या महाविद्यालयीन वयानंतर शिक्षक पदाच्या व्यवसायातही त्यांच्या संघकार्याची आणि संस्कारांची झलक ओघाने व्यक्त झाली आहे. विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यात डोळसपणे सहभाग घेतल्यामुळे त्याबद्दलची निरीक्षणे रोचक झाली आहेत. वेगवेगळ्या ग्रंथालयांत बसून पुस्तकांचे सान्निध्य मिळवण्यासाठी त्यांनी अक्षरशः ग्रंथालयात स्वयंसेवकाचेही कार्य केले. एका मध्यमवर्गीय सामान्य घरातील सातार्‍यातील हा मुलगा आंतरिक संघर्ष करीत करीत कसा विकसित होत आयुष्याला आकार देतो,तो प्रवासपट श्रीकृष्ण शिदोरे यांच्या प्रवाही आणि संवादी शैलीत अक्षरशः खिळवून ठेवतो. खरेतर एका अस्वस्थ अशा कार्यकर्ता मनाची ही कहाणी आहे.
 
 
 
स्थळ व क्षेत्र कोणतेही असो, श्रीकृष्ण शिदोरे तेथे स्वस्थ बसले आहेत असे झाले नाही. गोरेगावच्या मुक्कामात तेथील प्रवासी संघाचे काम असो किंवा प्रवाशांच्या सोयीसाठी विविध तर्‍हेचे बससेवेचे काम असो, शिदोरे यांनी सर्वत्र आपल्या कार्याची मोहोर उमटवलेली दिसते. या आत्मचरित्रातील समारोपाचे चिंतन महत्त्वाचे आहे. या प्रकरणात श्रीकृष्ण शिदोरे यांनी संघापुढील प्रचंड आव्हानांचा आढावा घेतला आहे. ३० वर्षांनंतर संघविचार प्रणालीची एक व्यक्ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या रुपाने पंतप्रधान झाली, हा त्यांना आशेचा किरण वाटला. प्रस्तुत आत्मचरित्र केवळ स्वतःचे आयुष्य रेखाटण्यात खर्च न करता भूतकाळाच्या नोंदी घेत, वर्तमानाचे भान ठेवून भविष्याकडे निघालेला दस्तावेजच आहे. ‘ग्रंथाली प्रकाशना’ने अत्यंत सुबक आणि देखण्या निर्मितीमूल्याने प्रकाशित केलेल्या प्रस्तुत पुस्तकाचे अर्थवाही मुखपृष्ठ संजय कुलकर्णी यांनी चित्रबद्ध केले आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची मर्मग्राही प्रस्तावना असलेल्या या पुस्तकातून संपूर्ण शतकभराचे प्रतिबिंब टिपले गेले आहे.
 
 
 
पुस्तकाचे नाव : कृष्णेचे पाणी
लेखक : श्रीकृष्ण शिदोरे
प्रकाशन : ग्रंथाली
पृष्ठसंख्या : १७१
मूल्य : २५०/-
 
 
 - वेदश्री दवणे
 
 
Powered By Sangraha 9.0