नवी दिल्ली : एकीकडे २६ जानेवारी दिवशी संपूर्ण देश हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना दुसरीकडे तिरंगा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादिवशी आबिद हुसैन या इसमाने सरकारी शाळेत राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली होती. शाळेतील महिला शिक्षिकेने ही तक्रार दाखल केली असून त्याला विरोध केला असता शिवीगाळही सुरू केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर पत्र हे माध्यमांमध्ये व्हायरल झाले असून यात म्हंटले आहे की, "२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून काही मुले आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जात होते. त्यानंतर घनपुरा गावात राहणारा मोहम्मद आबिद हुसेन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने शिवीगाळ सुरु केला. राष्ट्रध्वज जाळण्याची धमकी दिली. त्यांनी राष्ट्रध्वज काढून फेकण्याचा प्रयत्न सुरू केला. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मला जातीवाचक शिवीगाळ करत मला ढकलले."
पुढे या पत्रात म्हंटले आहे की, "त्याने 'माझ्याऐवजी तुम्ही स्वतःहून ध्वज फडकावण्याची हिम्मत कशी झाली?' असे म्हणत त्याने राष्ट्रध्वज खाली पडण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित लोकांनी हस्तक्षेप केला नसता, तर मोठा अनर्थ घडला असता. आबिदला शाळेच्या नाईट गार्डने ध्वजारोहणाचीही माहिती दिली." ही तक्रार किशनगंजचे जिल्हा शिक्षण अधिकारी आणि ब्लॉक शिक्षण अधिकारी, कोचाधामन यांना पाठवण्यात आली. आबिद हुसैनविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
किशनगंजचे पोलिस अधीक्षक इनामुल हक यांनी याबद्दल सांगितले की, “स्वतःला न बोलवल्याचा राग आलेल्या एका व्यक्तीने असे कृत्य केले आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः घटनास्थळी गेलो. पोलिसांनी रात्री छापेमारीही केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था सामान्य आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल.”