'स्वातंत्र्याच्या महानायकाला ‘हा’ पुतळा कृतज्ञ राष्ट्राकडून श्रद्धांजली'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022
Total Views |

MODI





नवी दिल्ली
: “नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचा विश्वास दिला. ज्यांनी मोठ्या अभिमानाने, आत्मविश्वासाने आणि धैर्याने इंग्रजांसमोर सांगितले की, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, मी ते मिळवीन. या स्वातंत्र्याच्या महानायकाला हा पुतळा कृतज्ञ राष्ट्राकडून श्रद्धांजली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा आपल्या पिढ्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देईल आणि आगामी काळात प्रेरणा देत राहील,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. २३ जानेवारी रोजी व्यक्त केला.



नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘इंडिया गेट’ येथे नेताजींच्या ‘डिजिटल होलोग्राम’ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “हा काळ ऐतिहासिक आहे. आपण उपस्थित असलेले हे ठिकाणही ऐतिहासिक आहे. आज आपण ‘इंडिया गेट’वर अमृत महोत्सव साजरा करत आहोत. ‘इंडिया गेट’वर ‘डिजिटल’ स्वरूपात नेताजींचा भव्य पुतळा बसवला जात आहे. लवकरच त्याच्या जागी ‘महाकाय ग्रॅनाईट’चा पुतळा बसवला जाईल. गेल्या वर्षी देशाने नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली. आज सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कारही यानिमित्ताने प्रदान करण्यात येत आहे.



नेताजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सुधारणांवर भर दिला आहे. तसेच मदत, बचाव आणि पुनर्वसन आदी मुद्द्यांवर भर दिला आहे. आम्ही देशभरात एनडीआरएफचे बळकटीकरण, आधुनिकीकरण, विस्तार केले. तंत्रज्ञानापासून नियोजन आणि व्यवस्थापनापर्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यात आला. याआधी प्रत्येक चक्रीवादळात शेकडो लोकांचा मृत्यू होत असे, मात्र गेल्या काही काळात आलेल्या चक्रीवादळात असे घडले नाही. प्रत्येक आव्हानाला देशाने नव्या ताकदीने उत्तर दिले. या आपत्तींमध्ये आम्ही शक्य तितके जीव वाचवू शकलो,” असे पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

“स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापूर्वी नवीन भारत घडवण्याचे ध्येय आपल्यासमोर आहे. नेताजींचा देशावर विश्वास होता, त्यांच्या भावनांमुळे मी असे म्हणू शकतो की जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला हे ध्येय गाठण्यापासून रोखू शकेल. आझादीच्या अमृत महोत्सवात हा संकल्प केला आहे की, भारत आपली ओळख आणि प्रेरणा पुन्हा जीवंत करेल. स्वातंत्र्यानंतर देशाच्या संस्कृती आणि संस्कारांसोबतच अनेक महान व्यक्तींचे योगदान पुसून टाकण्याचे काम केले गेले, हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यलढ्यात लाखो देशवासीयांच्या तपश्चर्येचा समावेश होता, परंतु त्यांचा इतिहासही मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण आज स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतर देश त्या चुका दुरुस्त करत आहे,” असे मोदींनी सांगितले.

“गेल्या वर्षी याच दिवशी मला नेताजींच्या कोलकाता येथील वडिलोपार्जित निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ज्या गाडीतून ते कोलकाता सोडून निघाले ती गाडी, ती खोली, ज्या खोलीत तो अभ्यास करत असे, त्यांच्या घराच्या पायर्‍या, त्या घराच्या भिंती, त्यांचे दर्शन हा सगळा अनुभव शब्दांपलीकडचा आहे. आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा २१ ऑक्टोबर, २०१८ चा दिवसही मी विसरू शकत नाही. लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष समारंभात मी आझाद हिंद फौजेची टोपी परिधान करून तिरंगा फडकवला होता. तो क्षण अद्भुत, अविस्मरणीय आहे. नेताजी सुभाष यांनी काही करण्याचा निश्चय केला तर कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नव्हती. नेताजी सुभाष यांच्या ‘कॅन डू, विल डू’ ही प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.








@@AUTHORINFO_V1@@