शिवसेनेवर भाजपचं देवेंद्रास्त्र!

24 Jan 2022 14:40:55

Uddhav



मुंबई
: शिवसेनेच्या प्रहाराला भाजपतर्फे जोरदार प्रतिहल्ला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी टीकेचा रोख निव्वळ हा भाजपकडेच होता. मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण भाषणाला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेसोबत भाजपची युती सडली असं म्हणून जयंतीलाच बाळासाहेबांचा अवमान त्यांचेच सुपूत्र उद्धव ठाकरे करत असल्याचा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.



बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांवर झाली होती महायुती!


"उद्धव ठाकरे म्हणतात, २५ वर्षे आम्ही युतीत सडलो. २0१२ पर्यंत या युतीचे नेते स्वतः वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनीच केला. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत ही युती कायम ठेवली. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं, असं उद्धव यांना म्हणायचा आहे का?, असा प्रश्न आम्हाला पडतो. उद्धव ठाकरेंना जे सिलेक्टीव्ह विसरण्याची सवय आहे. त्याबद्दल त्यांना आठवण करुन द्यायचा आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्रात आमचे नगरसेवक आणि आमदार होते. त्यावेळी १९८४मध्ये लोकसभा निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढविली होती, शिवसेनेच्या नव्हे.", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला.


भाजपसोबत असताना क्रमांक १ आणि आता चौथ्या स्थानी!


"मनोहर जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या तिकीटावर लढले होते. भाजपसोबत सडलो, असे म्हणतात तेव्हा असताना महाराष्ट्रात क्रमांक एकवर होते. त्यानंतर भाजपशी फारकत घेतल्यावर मात्र, क्रमांक चारवर फेकले गेले. त्यामुळे आपण कुणासोबत सडतोय हे त्यांनीच ठरवावं. सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन बाबी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता?, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला.


उस्मानाबादचे धाराशिव झालं ? औरंगाबादचं संभाजीनगर कधी ?


"रामजन्मभूमीच्या आंदोलनात लाठ्याकाठ्या खाणारं कोण होतं?, तुम्ही त्यावेळी कुठे होता ?, रामजन्मभूमी बाबरी मशीद विषय सोडून द्या तुम्हाला साधा कल्याणच्या दुर्गाडीचा आणि श्रीमलंगडाचा प्रश्न सोडवता नाही आला. भाषणापलिकडे तुमचं हिंदुत्व कुठे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि धर्मवीर आनंद दिघेंनी हा विषय सोडविण्यासाठी संघर्ष केला मात्र, तेव्हाही तुमचाच मुख्यमंत्री होता आणि आजही तुम्हीच मुख्यमंत्री आहात परंतू, दोन्ही प्रश्न सोडवता आलेले नाहीत. औरंगाबादचं संभाजीनगर झाले नाही, उस्मानाबादचे धाराशीव झाले नाही, मात्र, योगींनी अलाहाबादचं प्रयागराज करुन दाखवलं, हिंदूत्व जगावं लागतं, मोदींनी ते करुन दाखवलं आहे.", असे म्हणत भाजपला हिंदुत्वावरुन घेरणाऱ्या उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.


कोण कुणासोबत सडतंयं ?


"काशी विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रमणकर्त्यांनी उध्वस्त करुन टाकलं होतं, मोदींनी त्याला पूर्णरुप दिलं. तुम्ही असं केलायं का, हिंदूंच्या आस्थेचा कुंभ प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आला. तुम्ही केलंयं का असं काही ?, तुमचे हिंदुत्व कागदावरचं. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावं लागतं. कलम ३७0 बद्दल तुमची भूमिका दुटप्पी होती. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता? शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. आज चौथ्या क्रमांकावर. कुणासोबत युतीत सडले, हे दिसतेच आहे.", असेही फडणवीस म्हणाले.


बाळासाहेबांबद्दल काँग्रेसचं एक ट्विटही नाही यालाच लाचारी म्हणतात!
आजही वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आम्हाला वंदनीय आहेत. कायम राहतील. आम्ही बाळासाहेबांना अभिवादन अभिमानानं करतो. मात्र, अभिवादन सोडा परंतू, त्यांच्यासाठी एक ट्विट राहुल गांधी, प्रियांका गांधी किंवा सोनिया गांधींनी केलेलं आम्हाला दाखवा. हे होत नाही त्याला लाचारी म्हणतात. तुम्ही जेव्हा त्यांच्या विचारधारेच्या व्यक्तीमत्वांना वंदन करता मात्र, त्यांना बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करायलाही लाज वाटते. तरीही सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. यापेक्षा मोठी लाचारी काय असेल. खरंतरं हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचे बोलणं तुमच्यापोटी शोभत नाहीत., असे फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की, "संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या विकासासाठी काय दिलं?, महाराष्ट्राला काय दिलं?, मंत्र्यांचे घोटाळे, माजी गृहमंत्री तुरुंगात ?, रोजची होणारी मुंबई महापालिकेची लूट ?, दरोडेखोरी?, त्यांना ठाऊक आहे आपण जर महाराष्ट्राबद्दल बोलायला लागलो तर तोंडघशी पडू, त्यामुळे अशी वक्तव्य करायची जेणेकरुन काही दिवस असा वादंग सुरू राहील.". केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लावल्या जातात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यालाही फडणवीसांनी टोला लगावला आहे. "चोऱ्या कराल तर ED, CBI कारवाई करणारच!', असा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या एका कार्यकर्त्याला पकडण्यासाठी २५ पोलीस पाठवता आणि दंडुकेशाहीबद्दल बोलता, असेही ते म्हणाले.



भाजपच सत्ता स्थापन करणार!

"मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छीतो की भविष्यात भाजप स्वबळावर सत्तास्थापन करेल. क्रमांक एकचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच ठरणार आहे. हे मी ठाम सांगू इच्छीतो.", असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं. शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याची खंत असू शकते मात्र, ती अशाप्रकारे व्यक्त करणे चुकीची आहे, असा टोला त्यांनी लगावला. सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग जितका महाराष्ट्रात झाला, मला काळजी वाटते, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे. तसेच दिल्लीत भगवा फडकवण्याच्या मुद्द्यावरुनही घेरत दिल्लीत २०१४ मध्येच भगवा फडकला, असाही टोला त्यांनी लगावला.






Powered By Sangraha 9.0