पुन्हा बाळासाहेब आणि त्यांना दिलेले नवे वचन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022
Total Views |

balasaheb hindutva
 
 
ज्या हिंदुत्वाविषयी उद्धव ठाकरे बोलले, त्या हिंदुत्वाविषयी त्यांची आजची भूमिका काय? बाबरी पाडल्यानंतर जे झाले, तो आता इतिहास झाला आहे. पण, भव्य राम मंदिराचा संकल्प पूर्ततेच्या दिशेने ज्यांनी नेला, तेही आज लोकांसमोरच आहेत. हिंदूंच्या भावनांचा अपमान करून अल्पसंख्याकांचे लाड करण्याचे उद्योगही गतकाळात जमा झाले. देशभर संपलेला हा सिलसिला आता शिवसेना महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत राबवित आहे. ठिकठिकाणी उर्दू भवन उभे करण्याच्या त्यांच्या पुढाकारांना गणपती मंडळांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. मोदींनी बनारसच्या काशिविश्वेश्वराला घातलेले साकडे हिंदूंनी पाहिले, त्यांच्या त्या अर्चनेत कुणालाही खोट दिसली नाही.
 
 
जगातील सर्वोत्तम दर्जाची नशा कोणती, या प्रश्नाचे उत्तर जर कोणी शोधायचा प्रयत्न केला, तर त्याचे उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणात सापडेल. ही नशा आहे सत्तेची! दारुची नशा केलेला माणूस लडखडत का होईना, स्वत:च्या घरी तरी पोहोचतो. पण, सत्तेची नशा चढलेला माणूस किती गोल गोल फिरू शकतो, त्याचा प्रत्यय त्यांच्या भाषणातून येतो. हिंदुत्व, त्यांचा स्वत:चा पक्ष, शिवसेनेची कामगिरी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या त्यांच्या सगळ्याच मुद्द्यांत कशाशी कशाचा संबंध नसलेले एक ‘लाईव्ह’ भाषण रविवारी महाराष्ट्राच्या जनतेने ऐकले. ‘शिवसेना देशाचे राजकारण करणार’ हा संजय राऊतांचा जुनाच राग त्यांनी आळवला. पण, त्याला जोड दिली ती एका पुडीची! राजकारणात अशा पुड्या अनेक जण सोडतात. पण, त्या पुडीला जेव्हा त्यांनी सरळ बाळासाहेबांचे नाव जोडले, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. ‘बाळासाहेबांनी आपल्याला जे दिल्लीचे स्वप्न दाखविले,’ हे वाक्य ऐकताच ‘लाईव्ह’ असलेले शिवसेनेचे पदाधिकारीही चक्रावून गेले. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हा शिवसेना काकांच्या मागे गेली, तेव्हाही असाच बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचा गजर उद्धव ठाकरेंनी सुरू केला होता. ते वचन होते, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसविण्याचे. आता हे वचन त्यांनी कधी दिले होते? इतकी वर्षं ते कुणालाच का सांगितले नव्हते? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. बरं, ते शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसविणार होते, पण आता ते स्वत:च त्या खुर्चीवर जाऊन बसले आहेत. आता उद्धव ठाकरे सांगतात, ‘बाळासाहेबांनी दिल्ली जिंकण्याचे स्वप्न आपल्याला दाखविले होते.’ पण, खुद्द बाळासाहेब असतानाही त्यांनी कधीही अशा प्रकारच्या गमजा मारल्या नव्हत्या. प्रबोधनकारांसारखा प्रखर पिता लाभूनही आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी त्यांना प्रबोधनकारांच्या विधानांची ढाल करावी लागली नव्हती.
 
 
बाळासाहेब बेदरकारपणे स्वत:चे राजकारण करीतच होते आणि त्यांचे चाहते आणि विरोधक दोघेही आपापली कामे नंतर करीत होते. इथे मात्र आता काही आगळेच चालू आहे. दिल्लीत बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी हे सारे चालू आहे, असे ही मंडळी एकमेकांना सांगत आहेत. दिल्लीत बाळासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि अन्य कुणाच्या कुबड्यांशिवाय स्वत:चे नेतृत्व उभे करणार्‍या माणसाच्या प्रेरणा अधिक प्रेरणादायी असतात. दिल्लीत अशा अनेक प्रादेशिक नेत्यांचे पुतळे आहेत. तामिळनाडूच्या कामराज यांचाही असाच भव्य पुतळा आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ही सगळीच कर्तृत्वमान माणसे! मग बाळासाहेबांचा पुतळा आजतागायत का लागला नाही, याचे चिंतन शिवसेनेनेच करावे. एकदा का सत्ता मिळाली की, मग अन्य कशाचेही भान नसलेली ही मंडळी! लढाया आल्या की, मग यांना भावनेचे राजकारण करायचे असते. उद्धव ठाकरेंचेही सध्या तेच चालले आहे. आपल्या पक्षाची स्थिती काय? गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या कमी झालेल्या आकड्यांची इतकी भीती सतावत होती की, त्यांनी सरळ आपल्या चुलत भावाचा अख्खा पक्षच फोडला! मनसेचे जवळ जवळ सगळे नगरसेवक पळविले. भाऊही इतका गपगुमान की, त्यालाही अद्याप या अपमानाचा सूड घ्यावा, असे वाटत नाही. त्यामुळे माणूस एकदा भावनेचे राजकारण करून स्वत:चे अस्तित्व टिकवायला लागला की, अशीच वेळ येते!
 
 
‘भाजपने माझा चेहरा वापरला’ हा तर मुख्यमंत्र्यांनी केलेला अगदी खास विनोद! त्यावर कोणी काय म्हणायचे? आता स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा जो चंग शिवसेनेने बांधला आहे, त्याला एक मजेशीर कारण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत ज्यांच्यावर विश्वास ठेवून हे महाशय भाजपला फसवून गेले, तो पक्ष आता शिवसेनेच्या पुढे गेला आहे. सत्तेचे पाणी जोखून कोणाची वाढ झाली, हे आता समोर दिसणारे वास्तव आहे. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी शिवसेनेची सध्याची स्थिती. लहान-मोठ्या पक्षांनाही यात यश मिळते, पण त्यासाठी आधारभूत मानण्याच्या विषयाबाबत आस्था असावी लागते आणि त्यासाठी तसे कामही करावे लागते. मोदी-शाहंच्या ताकदीला ‘एकाधिकारशाही’ संबोधून त्याची उत्तरे सापडत नाही. असे हे सगळ्यात असुरक्षित भावनेने ग्रासलेले सरकार सध्या महाराष्ट्राच्या बोकांडी येऊन बसले आहे. कोणाला कशाचाही मेळ नाही, पण शिवीगाळ करण्यात मात्र ही मंडळी अगदी पुढे! लहान- मोठ्या ब्लॉगर्सनादेखील अटक, चौकशी, हल्ले... राजकीय विरोधकांवर तर गुन्हे दाखल करण्याची पद्धत महाराष्ट्रात नव्यानेच सुरू झाली आहे. पण, हीच मंडळी जेव्हा देशात आणीबाणीची भाषा बोलतात, तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. मूळ मुद्दा राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आहे. पुढील दोन महिन्यांत जे काही घडेल, ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. ही सगळी तडफड त्यासाठी सुरू आहे. यश कोणाला मिळेल ते येणारा काळच ठरवेल. पण, इतरांचा द्वेष करून स्वत:चा पक्ष वाढविणार्‍यांना नियतीने देदिप्यमान राजकीय यश दिल्याची जगाच्या इतिहासात नोंद नाही. मुद्दा हिंदुत्वाचा असेल किंवा आपल्या कच्च्याबच्च्यांच्या भविष्यासाठी पळण्याचा, मुंबईकरांचे आयुष्य सुकर करण्यासाठी आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुकीचा, आपण काय देऊ शकतो, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मात्र पुढची भूमिका ही मतदारांनाच निभावावी लागेल!
 
 
@@AUTHORINFO_V1@@