इगतपुरीच्या विकासाचा किरण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022   
Total Views |

Kiran Falatankar
 
 
प्रत्येक गोष्ट करताना ती समाजाच्या अंत्यज स्तराच्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाशकिरण घेऊन येईल, यासाठी सदैव झटणारे इगतपुरीचे किरण फलटणकर यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा मागोवा...
 
 
इगतपुरी तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विविध सेवा उपक्रम राबविणारे, डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे संचालक आणि ‘जनसेवा प्रतिष्ठान’चे संस्थापक किरण फलटणकर. ते जनकल्याण रक्तपेढीचे सदस्यही आहेत. इगतपुरीमधील एक सेवाभावी आणि तितकेच लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. आज इगतपुरी आणि परिसरातील दुर्गम भागामध्ये किरण यांचे कार्य खरेाखरच सेवेचा दीपस्तंभ ठरले आहे.
 
 
ग्रामीण भागात मुलीचा विवाह म्हटला की, तिच्या आईवडिलांसमोर विवाहाचा खर्च हा मोठा प्रश्न असतो, तर अशा गरीब मातापित्यांच्या मदतीला धावून जाणारे, त्यांच्या मुलींच्या विवाहाचा खर्च उचलणारे, दिव्यांग आणि ज्येष्ठांना मदत होईल, असे साहित्य वितरण करणारे, सामाजिक एकता, रक्तदान, अवयवदान अशा विविध समाजोपयोगी कार्यांत इगतपुरी तालुक्यातील किरण यांचे योगदान मोठे. महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये किरण आपल्या सहकाऱ्यांसमवेत मदतकार्यात पुढाकार घेत असतात. मग तो कोल्हापूरला आलेला भयंकर प्रलय असो की, कोरोना काळातले भयग्रस्त लोकजीवन. या सगळ्या आपत्तींमध्ये किरण हे भक्कमपणे समाजासाठी ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या व्रतासह कार्यरत राहिले.
 
किरण यांचे मूळ गाव फलटण. पण, पाच-सहा पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज इगतपुरीला आले आणि इगतपुरीकरच झाले. किरण यांचे वडील पद्माकर यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला, तर किरण यांची आई पुष्पा ही गृहिणी. फलटणकर दाम्पत्याला चार अपत्ये. त्यापैकी तीन मुली आणि एकुलता एक मुलगा किरण. पद्माकर टेलरकाम करत असले तरी इगतपुरीसारख्या तालुक्यात असे कितीसे शिवणकाम असणार? त्यामुळे पद्माकर यांना इतर वेळी काम शोधावे लागे. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती तशी यथातथाच. पण, या अशा आर्थिक तणावाच्या वातावरणातही पद्माकर मुलांना सांगत की, “नेहमी सत्याच्या मार्गाने जा. काहीही झाले तरी सत्याची वाट सोडू नका.” हे संस्कार किरण यांच्यात मनात अगदी खोल रूजले. याच काळात शाळेत असताना किरण यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी आला. संघ विचारांनी त्यांचे बालपण अगदी उजळून गेले. गरिबीमध्येही संस्कारांची श्रीमंती त्यांना लाभली. त्यामुळेच कुटुंब, समाज आणि देश याबद्दलची त्यांची निष्ठा आणि प्रेम आणखी प्रखर झाले. त्यामुळेच पाचवी-सहावीला असतानाच काही ना काही उद्योग किंवा श्रमदान करून किरण आपल्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा प्रयत्न करायचे. ते दहावी उत्तीर्ण झाले आणि त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात पूनम शिंदे या अभाविपच्या पदाधिकारीच्या संपर्कातून किरण अभाविपचे कार्यकर्ते झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे किरण यांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडून आला. त्यांच्यात नेतृत्वगुण आणि हाती घेतलेले कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करण्याची वृत्ती वृद्धिंगत झाली. परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क असू देत की आंदोलन, किरण नेहमी पुढकार घेत. मात्र, याचवेळी किरण यांच्या घरची आर्थिक परिस्थिती वेगाने ढासळत होती. घरातला कर्ता मुलगा म्हणून आईवडिलांची आणि तीन बहिणींची सर्वस्वी जबाबदारी घेणे किरण यांना भागच होते. त्यामुळे मग अभाविपच्या माध्यमातून त्यांनी ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ’ येथे नोकरीला सुरुवात केली. नोकरी करत असतानाही किरण यांनी आपला समाजसंपर्क कायम ठेवला. अभाविपच्या पदाधिकारी पुनम शिंदे आणि सहकाऱ्यांनी इगतपुरीवासीयांना मदत व्हावी म्हणून ‘स्वामी विवेकानंद पतपेढी’ सुरू केली. त्यामध्ये सुरुवातीला किरण हे सचिव होते. त्या काळात प्रचंड मेहनत करून ‘स्वामी विवेकानंद पतपेढी’च्या संपूर्ण टीमने ५००च्या वर सभासद गोळा केले. पुढे डॉ. हेडगेवार पतसंस्थेत ‘स्वामी विवेकानंद पतपेढी’ समाविष्ट झाली आणि किरण आज इगतपुरीच्या या पतपेढीचे संचालक आहेत. पतपेढीमध्ये तीन हजार सभासद असून जवळ जवळ ५५ कोटींच्या ठेवी आहेत.
 
 
इगतपुरीचा विकास आणि प्रगती कशी होईल, हेच किरण यांचे ध्येय. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक समस्यांचा अभ्यास करून त्या कशा सोडवता येतील, हा प्रयत्न ते करतात. काही वर्षांपूर्वी इगतपुरीतील स्मशानभूमीची एक समस्या होती. ही स्मशानभूमी गावापासून पाच किलोमीटर लांब होती. त्यावेळी किरण यांनी खूप प्रयत्न करून त्यांच्या ‘जनसेवा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वैकुंठ रथ गावात आणला. त्यामुळे स्मशानभूमीपर्यंत जाण्या-येण्यासाठी गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाली.
 
 
कोरोना काळात नाशिकची वेस ओलांडून महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या लोकांची अगदी रीघ लागली होती. मोठ्या प्रमाणात कष्टकरी बांधव पायी चालत दुसऱ्या राज्यात जात होते. या थकलेल्या, भुकेलेल्या कष्टकरी बांधवांना अन्न मिळावे, यासाठी किरण कामाला लागले. स्वतःच्यापदरातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातनूही किरण यांनी इगतपुरीमध्ये अन्नछत्रच उभारले. त्याकाळात नाशिकमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला होता. मात्र, किरण यांच्यातला संघ स्वयंसेवक त्यांना ‘सेवाकार्यात समीधा बन’ म्हणून बळ देत होता. त्यामुळेच कोरोनाग्रस्तांची सेवा करणे किंवा कोरोनामुळे मृत पावलेल्यांचे अंतिम संस्कार करणे, यासाठी किरण यांनी पुढाकार घेतला. तसेच गावातल्या होतकरू तरूणांना नोकरी मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले. या सगळ्या कार्याबद्दल किरण म्हणतात की, “हे कार्य म्हणू शकत नाही, ही तर माझी जबाबदारी आहे. कारण, हा समाज माझे कुटुंब आहे. येणाऱ्या काळातही मला माझ्या समाज-कुटुंबाचा विकास करायचा आहे.” त्याअनुषंगाने किरण यांचे जगणे इगतपुरीच्या समाजजीवनाच्या समस्यांना भेदणारे आशेचे किरण आहे, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@