शक्याशक्यतांचा खेळ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2022
Total Views |

impossible
 
 
सर्वसामान्यपणे आपण जाणतो की, एखादी बाब आपल्यासाठी शक्य आहे किंवा अशक्य आहे, ते आपल्या मानसिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. खरंच आहे ते.. पण, तरीही त्यात वास्तवाचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केले पाहिजे. या जगात अनेक अशक्य गोष्टी आपण शक्य झालेल्या पाहिल्या आहेत. तुम्हाला एखादे स्वप्न पाहिल्यानंतर ते स्वप्न पूर्ततेच्या मार्गावर नेण्यास, तुमची वृत्ती आणि कष्ट या दोन्ही गोष्टींची गरज असतेच.
 
 
आपल्या सगळ्यांना आपापल्या आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. पण, त्या सगळ्याच आपण करू शकतो, असेही नाही. आपल्याला अनेक संकटे आणि अडथळे समोर दिसत असतात. "Nothing is Impossible" हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा दुसऱ्यांनाही सांगतो. ऑड्री हेपबर्न या हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध नायिकेने 'Impossible' या शब्दाची विधायक फोड करत म्हटलं आहे की, "शब्दच म्हणतो की, 'I'm possible." अशा तऱ्हेने या शब्दांची सकारात्मकता आपण सगळे स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो. आपण थोडासा 'शक्यता' आणि 'अशक्यता' या शब्दांचा ऊहापोह केला आहे. अनेक वेळा आपण 'अशक्यता' अशा परिस्थितीत पाहतो, कधी कधी ती 'शक्यतेत'ही पाहतो. जिथे इतर लोक ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्या करू शकतात, पण आपल्याला मात्र त्या करण्यास जमत नाहीत. प्रश्न मग असा मनात येतो की, इतरांना ते शक्य का आहे आणि माझ्यासाठी ते अशक्य का आहे? अर्थात, याचा संबंध मानवी स्वभावाशी आहे. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, पण जेव्हा ती गोष्ट आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही किंवा ती आपल्याला जमत नाही, तेव्हा आपण आपली तुलना इतरांबरोबर म्हणजे आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांबरोबर करतो. आपल्यासारखेच आपल्याबरोबरचे लोक असतात ते आणि तरीही ते त्या गोष्टी करून दाखवतात, जमवून दाखवतात, तेव्हा आपल्याला क्षोभ होतो, तेव्हा आपण आपल्या आत्मविश्वास आणि आशा गमावतो.
 
 
शक्यतेची संकल्पना तसे पाहिले, तर खरंच किचकट आहे. आपण एखाद्या बीजात वृक्ष बनण्याची क्षमता आहे, असे म्हणतो, तेव्हा ती अंतर्गत क्षमता असते. अव्यक्त असते, म्हणजे त्यात अशा काही गोष्टींचे गुणधर्म आढळतात, ज्या भविष्यात तशाच घडतील, संभवनीय ठरतील. लहानपणी आपण मुलांच्या काही प्रवृत्ती वा गोष्टी पाहून म्हणतो की, 'हा छान गायक बनण्याची शक्यता जास्त आहे किंवा ही मुलगी ना पुढे जाऊन नक्कीच प्रोफेसर होऊ शकते.' तर हा एक अव्यक्त असा व्यक्तीचा गाभा असतो, जो पुढे भविष्यात तसा घडायची अंतर्गत संभावना दर्शवितो. पुढे अवतीभवतीची परिस्थिती जर पोषक असेल, तर ती व्यक्ती खरंच तसेच काहीतरी घडू शकते. ती बाह्य संभावना असते. आपण लोकांना असंही म्हणताना पाहतो की, यांच्यात ही क्षमता पुरेपूर होती, परिस्थिती आणखीन पोषक असती, तर ही व्यक्ती उत्तम संगीतकार झाली असती. अशा तऱ्हेने शक्यता ही जशी अंतर्गत ऊर्जेवर अवलंबून आहे, तितकीच ती बाह्य परिस्थिती किती पोषक आहे, यावर अवलंबून आहे. तरीही आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीत असतो की, जेव्हा सगळे म्हणतात की, 'हे तुला जमणार नाही' तेव्हा ते करून दाखविण्यात. तथापि, शक्यतेच्या आकाशात मनाला जरी असंच वाटलं म्हणून भरारी मारता येईल, असं नाही. कारण, शक्यतेची एक वस्तुस्थिती असते, वास्तव असते आणि त्यांचा अदमास घेणंही तितकंच आवश्यक ठरतं. एखादा भलामोठा सिंह असतो आणि एखादा एक छोटासा ससा असतो. या दोघांची आपल्याला तशी विधायक तुलना करता येत नाही.
 
 
सर्वसामान्यपणे आपण जाणतो की, एखादी बाब आपल्यासाठी शक्य आहे किंवा अशक्य आहे, ते आपल्या मानसिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. खरंच आहे ते.. पण तरीही त्यात वास्तवाचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित केले पाहिजे. या जगात अनेक अशक्य गोष्टी आपण शक्य झालेल्या पाहिल्या आहेत. तुम्हाला एखादे स्वप्न पाहिल्यानंतर तेे स्वप्न पूर्ततेच्या मार्गावरनेण्यास, तुमची वृत्ती आणि कष्ट या दोन्ही गोष्टींची गरज असतेच. पक्ष्यासारखं उडायला यायला हवं, या कल्पनेतील अशक्यतेला नाकारत ओरविले आणि विलबर या 'राईट बंधूं'नी लहान असताना हेलिकॉप्टरसदृश्य खेळण्याशी भावूकतेने खेळत शेवटी त्या दोघांनाही आकाशात भरारी मारता येईल, असे स्वतःचे विमान तयार करून आणि उडवून दाखविलेच ना! प्रथम पतंग आणि नंतर 'ग्लाइडर्स' यातून आपली कल्पना त्यांनी एकेदिवशी आकाशात भिरकावून दिलीच. काळाची अनंतता पाहताना आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे, अशी काही असंभाव्य गोष्ट खरंच या जगात आहे का? असेल का? ज्यातून संभवता शक्यच होणार नाही? हा असा निरागस आणि भाबडा प्रश्न वाटला, तरी त्याचे उत्तर तितके सरळ नाही. किंबहुना, ते अधिक गुंतागुंतीचे आहे. पण, एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की, दुसऱ्यांसाठी साधे सरळ आणि सोपे असते ते आपल्यासाठी असेलच, असे नाही.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@